
महाराष्ट्रात अप्रदूषित शहराच्या यादीत चंद्रपूर दुस-या स्थानी
_चंद्रपूर शहरातील प्रदूषणात सुधारणा नाहीच_
चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूर शहर आणि परिसरातील प्रदूषणात पुन्हा सातत्याने वाढ होत आहे. चंद्रपूर २०२०-२०२१ दरम्यान कोविड टाळेबंदीनंतर चंद्रपूर शहरातील वायू प्रदूषणात पुन्हा वाढ होऊ लागली असल्याचे प्रदूषण मंडळांच्या जानेवारी ते मे २०२२ ह्या ५ महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जानेवारी ते मे या १५१ दिवसात चंद्रपूर शहरात ४७ दिवस चांगले तर ९८ दिवस प्रदूषित होते. आकडेवाडीनुसार शहर हे राज्याच्या यादीत अप्रदूषित म्हणून सध्या दुस-या स्थानी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
करोना संक्रमण काळात टाळेबंदीमुळे सलग दोन वर्षे शहरातील प्रदूषण कमी होते. मात्र टाळेबंदी उठताच जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत चंद्रपूर शहरात ४५ दिवस चांगले तर ९८ दिवस प्रदूषणाचे होते. चंद्रपूर, ताडाळी, घुग्गुस आणि बल्लारपूर या औद्योगिक शहरात केवळ ३३ दिवस चांगले तर ११५ दिवस प्रदूषित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण कमी होण्यासाठी काहीही प्रयत्न होत नसल्यामुळेच प्रदूषित दिवसांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
शहरालगतच्या औद्योगिक क्षेत्रात उन्हाळय़ातील १५१ दिवसात चांगले दिवस केवळ ३३ तर ११५ दिवस प्रदूषित होते. चंद्रपूर शहरातील प्रदूषणसंबंधी रोग आणि मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता हे प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे औद्योगिक आणि नागरी प्रदूषण कमी झाले होते.
आता सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, ताडाळी, घुग्गुस आणि बल्लारपूर हे ४ औद्योगिक क्षेत्र गेल्या १२ वर्षांपासून सतत अतिप्रदूषित क्षेत्र म्हणून जाहीर होत आहेत. अनेक कृती आराखडे आखले तरी प्रदूषणात फारसी सुधारणा नाही. आजही चंद्रपूरचा सेपी स्कोर (सीईपीआय) हा ७४.४१ असून तो महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील उद्योग हे त्यांचे प्रदूषण मापन करतात, म.प्र.नि. मंडळ आणि के.प्र.नि. मंडळ स्वतंत्रपणे प्रदूषण मापन करतात. चंद्रपूर शहरात आणि खुटाळा औद्योगिक क्षेत्रात हवा प्रदूषण मापन यंत्रणा लावलेली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक ठरवताना कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त ६ प्रदूषकांचा समावेश होतो. चंद्रपूर शहराचे मागील ५ महिन्यांचे प्रदूषण निर्देशांक (एक्यूआय) पुढील प्रमाणे आहे.
शहरातील नोंद झालेल्या प्रदूषण मापन केंद्राच्या २०२२ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात चांगले दिवस १३ असून प्रदूषित दिवस १८ (त्यात अति प्रदूषित २ दिवस) होते. फेब्रुवारी महिन्यात चांगले दिवस १३ तर प्रदूषित दिवस १५. मार्च महिन्यात चांगले दिवस ६ तर प्रदूषित दिवस २५. एप्रिल महिन्यात ८ दिवस चांगले तर १७ दिवस प्रदूषित होते.