Home नागपूर गोंदिया गोंदियात धान केंद्रे सुरु; पण धान खरेदी बंद

गोंदियात धान केंद्रे सुरु; पण धान खरेदी बंद

135

गोंदियात धान केंद्रे सुरु; पण धान खरेदी बंदपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शेतक-यांच्या भटकंतीकडे शासनाचे दुर्लक्ष_

विदर्भ/ गोंदिया: जिल्ह्यात मोजकेच धान केंद्र सुरु असूनही धान खरेदी बंद असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामातील धान खरेदीच्या मर्यादेचा तिढा अद्यापही सुटला नाही. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. 107 धान खरेदी केंद्रापैकी आतापर्यंत केवळ २७ धान खरेदी केंद्र सुरु झालेत. 1 हजार 247 शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. आदिवासी विकास महामंडळाचे 44 केंद्र बंद आहेत. त्यामुळे अजूनही 57 हजार शेतकरी (Farmers) धानाच्या विक्री करण्यासाठी प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली. खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. पण रब्बीतील धान खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळं धान घरात तसाच पडला आहे. पावसाळ्याला सुरुवात होत आहे. उन्हाळ्यातील धान पावसाळ्यात विकायचा का असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.

*कमी दरात विकावे लागते धान*

गोंदिया जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. रब्बीतील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा 107 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. आदिवासी विकास महामंडळाने 44 केंद्राना मंजुरी दिली. रब्बीतील धान विक्रीसाठी जिल्ह्यातील 68 हजार 280 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. यंदा प्रथमच केंद्र शासनाने 4 लाख 79 हजार क्विंटलची मर्यादा ठरवून दिली. त्यामुळं धान खरेदीची प्रक्रिया संकटात आली आहे. त्यामुळेच आतापर्यंत 107 पैकी केवळ 27 धान खरेदी सुरू झाले. या केंद्रावरुन 57 हजार क्विंटल धान खरेदी झाली. 80 धान खरेदी संस्थांनी अद्यापही केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. गरजेपोटी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विक्री करावा लागत आहे.

*शेतकऱ्यांपुढे समस्याचा डोंगर*

यंदा रब्बी हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन झाले. हेक्टरी 43 क्विंटल धानाचे उत्पादन झाल्याचे अंदाजित आकडेवारी कृषी विभागाने काढली आहे. रब्बीत 68 हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यातून जवळपास 30 लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारने केवळ 4 लाख 79 हजार क्विंटल धान खरेदीला मंजुरी दिली. त्यामुळं 25 लाख क्विंटल धान विकायचा कुठे अशी समस्या निर्माण झाली आहे. असं भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितलं.