
भाजपा नगरसेविकेच्या यजमानाची बौद्ध कुटुंबांना शिवीगाळ; तक्रार दाखल
_नगरसेविकेच्या मद्यपी यजमांनांवर कारवाईची मागणी_
✍️प्रमोद गाडगे/प्रतिनिधी
नागपूर: हिंगणा तालुकांतर्गत येत असलेल्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील वैभव नगर प्रभाग क्र.९ मधील रहिवाशी प्रगती मुकेश कोथरे व मुकेश चौकीनाथ कोथरे यांनी आपल्याच प्रभागातील नगरसेविका सुलोचना झाडे यांच्या यजमानाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त नागपूर शहर , पोलीस उपायुक्त परी.क्र.१ ला आज दि.१२ जून २०२२ रविवार रोजी ई-मेल द्वारे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की शनिवार दि ११ जून रोजी सायंकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान नगर परिषद अंतर्गत टँकर द्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या टँकरचे पाणी घरोघरी वाटप सुरू असताना नगरसेविकेचे पती गजानन झाडे दारू पिऊन आले व आपल्या मर्जीच्या लोकांना मोठया प्रमाणात पाणी साठा वितरीत करीत होते.
दरम्यान, कोथरे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, एक ड्रम असताना त्यांनी अर्धाच ड्रम पाणी त्यामध्ये टाकले. याबाबत कुटुंबातील सदस्यांनी विचारणा केली असता कोथरे पती पत्नीला शिवीगाळ केली. त्या वेळेस गजानन झाडे मोठ्या प्रमाणात दारू पिऊन होते. कोथरे कुटुंबाचे म्हणणे समजून घ्यायला तयार नव्हते. दरम्यान दारूच्या नशेत झाडे म्हणाले, की, ‘तुमच्या एका बौद्ध समाजाच्या एका घरातील तीन मताने मला व माझ्या पक्षाला काहीही फरक पडणार नाही.
आमच्या बौद्ध समाजाचे एकटे घर असल्यामुळे आम्हास पाणी दिले नाही व आम्हाला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून आमचा अपमान केला असल्याचे कोथरे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेविकेचे यजमान यांच्यावर एट्रासिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोथरे कुटुंबियांनी इ-मेल द्वारे तक्रार करून केली आहे.