
मुंबई: विधानपरिषद निवडणूकीच्या मतदानाला सोमवार, २० जून रोजी सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान सुरु आहे. यावेळी राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,अशा प्रकारचं ट्विट भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी आज दहा जागांसाठी मतदान आहे. मात्र यावेळी विधानपरिषदेसाठी रिंगणात अकरा उमेदवार आहेत. यामुळे कोणाचा उमदेवार जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा नक्की पराभव होणार, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जात आहे. तसेच महाविकास आघाडी देखील त्यांच्या परीने त्यांचे प्रयत्न करत आहे. या सर्व राजकीय वर्तुळातून अनिल बंडे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ” काळ आला होता भाऊ किंवा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,” असं ट्वीट अनिल बोंडे यांनी केलं आहे. मात्र मिशीवाला मावळा कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अनिल बोंडेच्या या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, आज दुपारपर्यंत विधानपरिषदेचे मतदान पूर्ण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे..