
पडळकरांना पवारांवरील टीका पडली महाग, गुन्हा दाखल
कर्जत :- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त काल चोंडी येथे चांगलाच राडा झाला. आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवले. त्यामुळे ‘एकच छंद गोपीचंद’ अशी नारेबाजी करत पडळकर व खोत यांच्या समर्थकांनी पोलीसांसमोर जोरदार नारेबाजी केली होती.
दरम्यान, चोंडी येथील आ. रोहित पवार यांनी आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित केलेल्या कार्येक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात शरद पवार आणि पडळकर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला होता. या कार्यक्रमात शरद पवार यांच्याविरोधात पडळकरांनी भाषण केले होते. त्या संदर्भात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करने महागात पडले आहे. एका समाजाला एका व्यक्तीच्या विरोधात भडकवल्याबद्दल कर्जत पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली होती. तक्रारीनुसार कर्जत पोलिसांनी पडळकरांविरोधात ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.