ओबीसी हिंदूच आहे, त्याला शेंडी जाणव्याच्या हिंदूत्वापासून वाचवलं पाहिजे!

ओबीसी हिंदूच आहे, त्याला शेंडी जाणव्याच्या हिंदूत्वापासून वाचवलं पाहिजे!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*(पुर्वार्ध)*

ओबीसी हिंदू आहे, असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याचा संबंध धर्माशी नसतो तर संस्कृतीशी असतो. कारण मानवाच्या विकासाच्या अनेक टप्प्यांमध्ये सुरूवात संस्कृतीपासून होते. मानव समाजाच्या सर्व विकासाचे टप्पे हे सांस्कृतिक विकासाचे टप्पे असतात. शेकडो वर्षांच्या टप्प्यानंतर एक धर्माचा टप्पा येतो. संस्कृतीचा एक छोटासा भाग म्हणजे धर्म होय! *श्रमातून ज्याप्रमाणे भौतिक वस्तू निर्माण होतात, त्याप्रमाणे संस्कृतीही निर्माण होते.* श्रमसंस्कृती पुढे श्रमण संस्कृती बनते. श्रमन संस्कृतीतून पुढे जैन धर्म व बौद्धधम्म येतो. हे दोघे धर्म शूद्रादिअतिशूद्रांचे धर्म होते कारण ते श्रमिक होते व सृजनशील होते.

उत्पादक श्रम सर्वप्रथम शेतीसाठी होऊ लागलेत. शेतीचा शोध स्त्रीयांनी लावल्यामुळे संस्कृतीची निर्मातीही स्त्रीच आहे. भारतखंडात सिंधूच्या खोर्‍यात संस्कृतीच्या निर्मितीची सुरूवात झाली! या संस्कृतीने आद्य मातृसत्ताक कूलसमाज जन्माला घातला. एकाच स्त्रीपासून जन्मलेल्या स्त्री-पुरूषांची टोळी म्हणजे कूल समाज होय! ही स्त्री आद्यमाता कूलमाता ठरली. हाताच्या सहाय्याने शेती करणारी कूलमाता आपल्या लेकरांमध्ये धान्याचे समान वाटप करीत होती. म्हणून हा कूलसमाज समतावादी होता. *कूलसमाज शेती करण्यासाठी नद्यांच्या भोवतालच्या गाळाच्या जमीनीत पोहोचला, तेव्हा गाळाच्या सुपीक जमीनीमुळे उत्पादन वाढले व कूलसमाजाचा विकास झाला. अशाच अनेक मातृसत्ताक कूलांच्या विकासातून व संघटनातून पुढे स्त्रीसत्ताक गणराज्यांची निर्मिती झाली.* पहिल्या गणराज्याची निर्मिती करणारी गणराज्ञी निऋ्ति होती, असा शोध सुप्रसिद्ध प्राच्याविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी लावलेला आहे. अणकूचीदार काठीच्या साहाय्याने हस्त-शेती करणारा समाज स्त्रीसत्ताक गणसमाज म्हणून ओळखला जातो. निऋती चौपट, अक्ष वा शलाका यांचा वापर करून गण जमीनीचे व गणधनाचे समान वाटप आपल्या कुलांमध्ये करीत होती. आपल्या गणाचा राज्यकारभार करण्यासाठी तीने दोन सभागृहांची लोकशाही पद्धत विकसीत केली होती.

गणसमाजाच्या पुढच्या विकासाच्या टप्प्यात लाकडी नांगराचा शोध लागला. पाळीव प्राण्यांना नांगराला जुंपल्यामुळे शेतीचा विस्तार झाला. त्यातून उत्पादन वाढले. *नांगराचा शोध पुरूषांनी लावल्यामुळे शेती स्त्रीयांकडून पुरूषांकडे आली.* शेतीच्या विस्तारासोबत शेतीच्या उत्पादन साहित्यांचाही विकास झाला. ही उत्पादन साहित्ये निर्माण करण्यासाठी समाजातून सुतार, लोहार, कुंभार यासारख्या समुहांचे गठण होऊ लागले. या उत्पादक समुहांची सशूल्क सेवा करण्यासाठी नाभिक, धोबी असे समाजघटक निर्माण होऊ लागलेत. हे सर्व कष्टकरी समूह शेतीकेंद्रीत संस्कृतीचे निर्माते आहेत. *हे सर्व कष्टकरी समाजघटक आजच्या ओबीसींचे पूर्वज आहेत.* बाहेरून आलेल्या परकीयांनी सिंधू संस्कृतीचे नामकरण हिंदू असे केले. *म्हणून आजचे ओबीसी हे आपल्या पूर्वजांच्या गोरवशाली सिंधु-हिंदू संस्कृतीचे वारसदार आहेत.*

आजचा ओबीसी समाज आजही आपली मातृ-संस्कृति प्राणपणाने जपतो आहे. आजही तो आपल्या कूलमातेला विसरलेला नाही. लाकडी नांगरांच्या साहाय्याने कृषी संस्कृतीचा विकास करणार्‍या बळीराजाची स्मृती आजही जागृत आहे. कूल संस्कृती व गणसंस्कृतीच्या इतिहासाच्या पाऊलखूणा आजही स्पष्टपणे दिसतात. त्यासाठी महाराष्ट्राचे उदाहरण पुरेसे आहे. ते पुढीलप्रमाणे-

महाराष्ट्रात *‘‘96 कूळी मराठा’’* असा एक वाक्प्रचार प्रसिद्ध आहे. याचा साधा सरळ अर्थ असा होतो की, *‘96 कूळांचे मिळून बनलेले मराठा गणराज्य’* होय! महाराष्ट्रात पवार, भामरे, चव्हाण, सोनवणे, सपकाळे, खोब्रागडे, कांबळे अशी 96 कूळे आहेत. 96 कूळांच्या 96 कूलमाता आहेत. या कूलमातांचे वर्षातून दोन महोत्सव असतात. पहिला नवरात्रौत्सव व दुसरा एप्रिल-मे महिन्यातील वार्षिक यात्रोत्सव. हे दोन्ही उत्सव शेती हंगामाच्या समाप्तीला येतात. म्हणजे शेतीच्या पहिल्या खरीप हंगामातील आलेले धान्य आपल्या कूलाच्या लेकरांमध्ये समान वाटपासाठी जो उत्सव साजरा केला जातो तो नवरात्रौत्सव व दुसर्‍या रब्बी हंगामातून आलेले धान्य आपल्या कूळप्रजेमध्ये समान वाटप करण्यासाठी वार्षिक यात्रा महोत्सव! आजही गावातील अलुतेदार-बलुतेदार आपलं बलुतं धान्याच्या रूपात घेण्यासाठी खळ्यात एकत्र जमा होतात. एकाच कूलातील सदस्य हे कूलबंधू व कूलबहीणी असतात. त्यांच्यात विवाह संबंध होत नाहीत. *कूलसमाज जेव्हा गणराज्य म्हणून संघटित झाला तेव्हा गणाच्या सभागृहात ज्या पहिल्या कायद्याचे विधेयक मंजूर झाले ते या कूलबाह्य विवाहाचे होते. भारतीय मूलनिवासी समाज हा गटबाह्य विवाही होता व आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.* हा मुद्दा समजण्यासाठी मी माझ्याच देवरे सरनेमचे उदाहरण देतो. मी जेथे जेथे देवरे शब्द वापरेल तेथेतेथे प्रत्येक वाचकाने आपले सरनेम घालावे. म्हणजे ज्या वाचकाचे सरनेम भामरे आहे, त्याने देवरे शब्दाच्या ठिकाणी भामरे शब्द घालावा, म्हणजे सिंधू-हिंदू संस्कृतीच्या कूलसमाजाचा व गणसमाजाचा इतिहास आपल्याला चांगला समजेल-

माझे सरनेम देवरे आहे. देवरे कूलाची कूलमाता धनदाई माता आहे. धनदाई म्हणजे धान्य देणारी! कारण त्या प्राचीन काळात धन हे सोने-चांदीच्या स्वरूपात नव्हते तर धान्याच्या रूपात होते. आमच्या देवरेंच्या कूलमातेचे मंदीर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी गावाच्या सीमेवर आहे. तेथे वर्षातून दोन यात्रा संपन्न होतात. एक नवरात्र उत्सवात व दुसरी उन्हाळ्यात वार्षिक यात्रा उत्सवात. जगभर पसरलेले सर्व देवरे सरनेम असलेले लोक या यात्रेत जमतात.

उत्पादन साधनांच्या विकासात व शेतीच्या विस्तारात कूलसमाजाचे विविध व्यवसायामध्ये वर्गीकरण झाले. प्रत्येक कूळाची शेती होती. शेतीच्या विस्तारासाठी व *शेतीसाठी लागणार्‍या उत्पादन साधनांच्या निर्मितीसाठी देवरे कूळाचे काही लोक सुतार बनलेत, काही देवरे लोहार तर काही कुंभार, चांभार बनलेत. या कूलाची सेवा करण्यासाठी काही देवरे नाभिक बनलेत, काही धोबी बनलेत.* यामुळे आजही देवरे सरनेम हे कुणबी, माळी, तेली, सोनार, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, महार अशा सर्व जातींमध्ये दिसून येते. हे सर्व जातीचे देवरे आजही धनदाई मातेच्या यात्रेमध्ये एकत्र जमतात व आपल्या कूलमातेचा उत्सव साजरा करतात. देवरे कुटुंबाच्या सूख-समूद्धीसाठी व पोरा-बाळांच्या सूख-संपन्नतेसाठी आद्यमातेला नवस करतात व फेडण्यासाठी यात्रेत जमतात. विविध जातीतील हे सर्व देवरे एकाच कूलमातेची प्रजा असल्यामुळे ते एकमेकांचे दुधाचे भाऊ व बहिण असतात. या कूलसंस्कृतीने आपल्याला जगातील पहिले पवित्र नाते दिले ते आई-मुलाचे! दुसरे पवित्र नाते दिले ते भाऊ-बहिणीचे! मातृसत्ताक व स्त्रीसत्ताक गणसमाजात नवरा-बायको हे नातेच नसल्यामूळे पिता-बाप कुणीच नव्हते. मातृवंशक पुरूषसत्ताक समाजाच्या निर्मितीनंतरच नवरा-बायको हे नाते आले.

सुरूवातीच्या काळात एकाच कूळातील स्त्री-पुरूष आपसात शरीरसंबंध ठेवत होते. त्यातून होणारी संतती दुर्बळ व शारिरीक व्यंग घेऊन जन्मते, हे लक्षात आल्यावर स्त्रीसत्ताक गणसमाजात गटबाह्यविवाहाचा कायदा झाला. या कायद्यानुसार एकाच कूळातील स्त्री-पुरूषांमधील शरीरसंबंधांवर बंदी आली. *आजच्या विज्ञानाने गटबाह्य विवाहामागील हे संशोधन मान्य केलेले आहे. यावरून आपला हा हिंदू-सिंधू संस्कूतीमधील प्राचीन गणसमाज किती विज्ञानवादी होता, हे लक्षात येते.* ओबीसी बहुजनसमाज आजही हा गटबाह्य विवाहाचा कायदा तंतोतंत पाळतो. माझे सरनेम देवरे आहे, त्यामुळे मी देवरे सरनेम असलेल्या मुलीशी विवाह करू शकत नाही, कारण ती मुलगी माझी दुध-बहिण आहे. परंतू मला लग्नासाठी देवरे कूळ वगळता बाकिची 95 कुळे खुली आहेत. मी भामरे आडनाव असलेल्या मुलीशी लग्न करु शकतो, सोनवणेच्या मुलीशी लग्न करू शकतो. *आजही लग्नासाठी स्थळ जुळवतांना पहिला प्रश्न कोणता विचारला जातो? मामाचे कूळ काय?* म्हणजे लग्न करू ईच्छिणार्‍या मुलीच्या मामाचे कूळ जर देवरे असेल तर त्या मुलीची आई देवरे कूळात जन्मलेली आहे, म्हणजे मुलगीसुद्धा देवरे कुळातच जन्मलेली आहे. ती मुलगी माझी दुधबहिण आहे, तिच्याशी मी लग्न करू शकत नाही.

आजही आईच्या कुळावरून शरिरसंबंध नाकारले जातात अथवा स्वीकारले जातात. पुरूषसत्ताक समाज आल्यावर स्त्री लग्न करुन दुसर्‍या कुळात जात असल्यामुळे आईचे मूळ जन्मकूळ तिच्या भावाच्या नावाने सांगू लागलेत. आईचा भाऊ मामा, म्हणून मामाचे कूळ विचारले जाते. *96 कुळांचे 96 गट आपसात गटबाह्य विवाह करू लागल्यामुळे हे सर्व 96 कुळी लोक एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक बनलेत. 96 कुळांमध्ये सख्खे भाऊ-भाऊ, सख्खे बहिण-भाऊ, सख्खे मामा-भाचे, काका-चुलते, सासू-सासरे, दीर-भावजय वगैरे रक्ताची नाती फुलली व बहरलीत, त्यासोबत आपली हिंदू-सिंधू संस्कृतीही फुलली व बहरली.* या सूखी व समृद्ध असलेल्या हिंदू संस्कृतीला कोणाची नजर लागली, ज्यामुळे सख्ख्या दुधाच्या व रक्ताच्या नातेवाईकांमध्ये वर्ण-जातीभेद पडलेत. एक भाऊ दुसर्‍या सख्ख्या भावाचा जाती-द्वेष करू लागला! कुणबी देवरे हा माळी देवरेला कमी लेखतो, माळी देवरे हा महार देवरेला अस्पृश्य समजतो. भाऊ भावाचा वैरी का झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण उद्याच्या उत्तरार्धात पाहू या, तोपर्यंत जय जोती, जयभीम, सत्य की जय हो!

*लेखक- प्रा. श्रावण देवरे*
s.deore2012@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles