

अमृत जवान सन्मान अभियान अनंतर्गत सैनिकांसाठी मेळावा
प्रमोद गाडगे
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी बुलढाणा व उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14 जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात अमृत जवान सन्मान मेळावा संपन्न झाला.
शेगाव तालुक्यातील आजी व माजी सैनिकांना विविध विभागातील समस्या बाबत मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकातून पवन पाटील परीविक्षाधीन तहसीलदार यांनी मेळाव्याचे आयोजनाबाबत भूमिका विशद करून आजच्या मेळाव्यात विविध विभाग सहभागी असल्याचे सांगितले. त्यानंतर आजी व माजी सैनिकांना त्यांच्या शेती व घराचे बाबतीत नोंदी बाबत येणाऱ्या समस्या बाबत के एस तांबारे मंडळ अधिकारी यांनी फेरफार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर आजी व माजी सैनिकांचे घरकुल बाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री शेख यांनी मार्गदर्शन करून घरकुल योजनेचे निकषाबाबत सभागृहात माहिती दिली. त्यानंतर तलाठी श्रीकांत हाके यांनी इ हक्क प्रणाली बाबत माहिती सांगितली.
या प्रणालीनुसार सामान्य नागरिकाप्रमाणे सैनिकांना सुद्धा आहे त्या ठिकाणावरून आपले नोंदी बाबतचे अर्ज संबंधित कार्यालयाकडे पाठवता येतील याबाबत माहिती दिली. त्यानंतर सैनिकांना विविध विभागांमध्ये येणाऱ्या समस्या बाबत अर्ज स्वीकारण्यात आले. व आलेले अर्ज तात्काळ संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आले एकूण 9 अर्ज आले त्यापैकी 1 अर्जावर तत्काळ कार्यवाही करून रेशन उपलब्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उर्वरित अर्ज नोंदवून घेण्यात आलेले आहेत ते तत्काळ निकाली काढण्यात येतील. सैनिकांचे मनोगतात के एम हेलोडे यांनी सैनिकांना येणाऱ्या समस्या सांगितल्या व सर्व विभागांनी प्राधान्याने या समस्या सोडवाव्यात असे आवाहन केले तसेच सैनिकांसाठी असलेल्या सर्व सवलती त्यांना मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
मान्यवरांचे मार्गदर्शनात डॉ सागर भागवत नायब तहसीलदार यांनी सांगितले की कार्यरत सैनिकांना सुट्टीवर आल्यावर वेळ कमी मिळत असल्याने त्यांचे आपापल्या विभागाशी संबंधित काम प्राधान्याने पूर्ण करावे असे आवाहन केले. त्यानंतर गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांनी घरकुल योजना व नमुना 8 बाबत सैनिकांना मार्गदर्शन करून सैनिकांचे काम त्वरेने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे श्री गायकवाड यांनी सैनिकांचे पाल्यांना असणाऱ्या सवलती व शिष्यवृत्ती याबाबत माहिती देऊन सैनिकांच्या प्रत्येक अर्जाची प्रत जिल्हा सैनिक कार्यालयाला पाठवण्याचे आवाहन केले तसेच बुलढाणा जिल्ह्यातून सर्वप्रथम शेगाव तालुक्यात हा मेळावा घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात समाधान सोनवणे तहसीलदार शेगाव यांनी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल अमृत महोत्सवी वर्षात हा मेळावा होत असून या मेळाव्यात प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर तातडीने कार्यवाही करून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. आजी-माजी सैनिकां साठी नियमानुसार जे करता येईल ते प्राधान्याने करण्याचे आश्वासन देऊन सर्व उपस्थित विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. या मेळाव्या दरम्यान सैनिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून समाधान सोनवणे तहसीलदार शेगाव यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख उपस्थिती म्हणून सतीश देशमुख गटविकास अधिकारी शेगाव, भूतपूर्व सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे महासचिव के एम हेलोडे व कोषाध्यक्ष कैलासराव पिसे, नायब तहसीलदार डॉ सागर भागवत, दुय्यम निबंधक विजय सूर्यवंशी, उपाधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती खंडेलवाल, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती घनोकार व विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा सैनिक कार्यालयाचे श्री गायकवाड हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचलन नितीन देशमुख मंडळ अधिकारी शेगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय ढमाळ मंडळ अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील बहुसंख्येने आजी-माजी सैनिक व वीरमाता वीरपत्नी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, व इतर सर्व विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।