
नात्यातलं आयुष्य जपतांना…!!
‘मराठीचे शिलेदार’ समूहाचा पन्नासावा साप्ताहिक ‘साहित्यगंध’ आणि साहित्यगंधाचा प्रमुख म्हणून आपणाशी ही हितगूज. ‘खरे तरं, आपणाशी तसा माझा संवाद नसतोच,’ परंतु कधी कधी तर, मला माझा परीचय विचारणारे आपलेच शिलेदार निष्क्रीयतेचा नमुना ‘पेश’ करून जातात. आनंदही होतो की, चला अजून तरी आपल्याला ओळखलेलं नाही. खरे पाहता तेच खरे साहित्यिक असे मी आजही समजतो. “माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतूपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात.” कशाच्या तरी निमित्ताने आपण एकत्र येतो. त्यामागे नियतीचा काहीतरी उद्देश असतो. तो साध्य झाला, की आपण निघून जाणंच अपेक्षित असतं. हा स्वार्थ नसतो. माणसांकडून आपण अपेक्षा ठेववायच्याच नसतात. त्या नियतीनं ठेवायच्या. त्यांच्या पूर्तीनंतर माणूस माणसाला केवळ ओळखीपुरता ओळखतो. असंच माझ्या बाबतीत नेहमीच घडत आलंय. त्याचं फारसं वाईट वाटत नाही. कारण या समूहाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या नात्यानेच आयुष्य जगायला शिकवलं हे त्रिवार सत्य आहे.
मला आलेल्या, येत असलेल्या अनुभवातून कधी कधी वाटतं, प्रत्येक गोष्टीचं ठराविक असं आयुष्य असतं. माणसाचं असतं, औषधांचं असतं. तसंच नात्यांचं असतं. पण मन किंवा मेंदू या नात्यांच्या आयुष्याला ठिगळं लावत बसतात अन् मग गुंता वाढत जातो. नाती टिकवण्याच्या शक्यता पडताळल्या जातात आणि माणसं भरडली जातात. आयुष्याचे संदर्भ बदलत जातात तशी आयुष्यातली माणसंपण. परंतु, मनात बसलेली नात्याची घडी विस्कटणे कधी जमलेच नाही; किंबहुना जमणारही नाही.
नवीन दिवस, नवीन विचार, नवीन व्यक्ती, नवी नाती. पुन्हा नवीन दिवस येणारच असतो. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवी नाती तयार होत जातात. तर काही नात्यांचं स्वरुप बदलत जातं. शाश्वत असं काही नसतंच. नाती तरी त्याला कशी अपवाद असतील? पण पुसली जाणार म्हणून रांगोळी न काढता राहतो का? अडकून राहिलो की गुंता वाढतो अन् गुंत्यात अडकत जातो. तिथला घास संपला की रेंगाळू नये आणि जाणाऱ्याला अडवण्याचा अट्टहासही करु नये. माणसं ‘टाळायची’ नाहीत फक्त कोणती नाती ‘कवटाळायची’ हे ओळखायला शिकावं. आपण सर्व ‘साहित्यगंध’च्या निमित्ताने एका नात्यात जोडल्या गेलोय हे आमच्यासाठी आनंदनीय बाब आहे. कारण माणसं आपल्याला घडवतात, शिकवतात, ती जोडण्याइतकंच ती जपणं – जोपासणं महत्वाचं असतं. कारण ती तितक्याच सहजतेनं दुरावतात. आयुष्य फार कमी उरलंय. आनंदाची देवाण घेवाण करणे म्हणजेच दु:खाला वाट मोकळी करून देणे होय. घट्ट विणलेल्या नात्याला तडा जाणार नाही, असे आनंदी विचार मनामनात रूजवावे हीच आकांक्षा…!!!
मुख्य संपादक
राहुल पाटील
marathicheshiledar6678@gmail.com