

वडिलांचे छत्र हरवलेल्या भाग्यश्रीला कर्मयोगीचा सायकलरूपी आधार
_कोरोना काळात वडिलांचे छत्र हरवलेल्या भाग्यश्रीच्या चेहऱ्यावर कर्मयोगीने फुलविले हास्य_
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे मोठ्या प्रमाणात आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींसाठी त्यांच्या शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. याच दरम्यान मौजा सालई ता. रामटेक जिल्हा नागपूर येथील राधेश्याम नेवारे यांचे २०२१ मध्ये मूलं शिक्षणाच्या दारावर उभे असताना कोरोनामुळे निधन झाले.
घरची परिस्थिती अतिशय हालाकीची, राधेश्यामजी व त्यांची पत्नी कल्पना नेवारे शेतमजुरी करून चार भिंतीच्या एका घरात संसाराचा गाडा चालवीत होते. राधेश्यामजी एकाएकी निघून गेल्यामुळे या परिवारावर संकटाचा डोंगर येऊन पडला. यातही आपले व आपल्या दोन मुलांच्या शिक्षणाचे काय होईल याचा कल्पनाताईला सर्वात मोठा विचार होता. मुलगी भाग्यश्री दहाव्या वर्गात आहे तर मुलगा सागर आठव्या वर्गात आहे. भाग्यश्री ही आपल्या गावावरून ३ कि.मी. हिवरा येथे शिक्षणासाठी पायदळ जाते. गरिबीच्या परिस्थितीमुळे वडील शाळेत जाण्यासाठी सायकल घेऊन देऊ शकले नाही. आता तर वडील गेल्यामुळे वडील सायकल घेऊन देतील ही आशा देखील संपली होती.
तेव्हा ही सर्व परिस्थिती जाणून व नेवारे यांच्या घरातील कोणीतरी शिक्षणात पुढे गेल्याशिवाय त्यांचे दिवस बदलणार नाही ही बाब लक्षात घेऊन कर्मयोगी फाऊंडेशनचे मार्गदर्शक तुळशीदास भानारकर हे गावातील प्रमुख मंडळीसह भाग्यश्रीच्या घरी सायकल घेऊन पोहोचले. हि सायकल आपल्याला शाळेत जाण्यासाठी मिळणार आहे. हे समजताच भाग्यश्री व नेवारे परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. गावातील प्रमुख मंडळींच्या हस्ते कर्मयोगी तर्फे भाग्यश्रीला सायकल देऊन तिची शिक्षणासाठीची पायपीट थांबविण्यात आली. या आनंदाच्या क्षणी कर्मयोगी फाऊंडेशनचे मार्गदर्शक तुळशीदास भानारकर, रामटेक पंचायत समिती सदस्य रामकृष्ण वरकडे, सामाजिक कार्यकते अरुण बावणे, ग्रामपंचायत कर्मचारी कैलास परतेती, अमोल नेवारे तसेच नामदेव सोनवणे, ईश्वर नेवारे, रवींद्र मेहर, अनिल बमचेर, विजय बिटकुरे पवन मेहर ही गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.