
गडकोट संवर्धनासाठी संभाजीराजेंच्या भेटीगाठी सुरू
कोल्हापूर: राज्यातील गडकोट संवर्धनासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका विद्यावतीजी यांची आणि पुरातत्त्व विभागाच्या मुख्यालयाची भेट घेतली. रायगड विकास प्राधिकरणाशी निगडीत दुर्गराज रायगड वरील उत्खनन, गडावरील विद्युत व्यवस्था, अद्ययावत रोपवेसाठीची आवश्यक तरतूदसंदर्भात सविस्तर चर्चा केली. राज्यातील गडकोटांची होत असलेली दुरावस्था व काही अनुचित प्रकार याबाबतचे मुद्दे देखील संभाजीराजे यांनी बैठकीत उपस्थित केले.
राज्यातील पन्हाळगड, विजयदुर्ग अशा महत्त्वाच्या गडांवर वारंवार तटबंदी कोसळणे, बुरुज ढासळणे असे प्रकार होत आहेत. यावर दूरगामी प्रभावकारक ठरणाऱ्या उपाययोजना करणे नितांत आवश्यक आहे. यासाठी संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या फोर्ट फेडरेशन व पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त सहभागाने गडकोटांवर संवर्धन व देखभालीचे काम करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीत करण्यात आली.
पुरातत्त्व विभागामार्फत किल्ले दत्तक योजना व तत्सम योजनांमधून केवळ पर्यटनाच्या दृष्टीने काम केले जायचे. मात्र मूळ ऐतिहासिक वास्तूंची दुरावस्था तशीच राहायची. यामुळे पर्यटन बरोबरच प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन व जतन कार्यावर अधिक भर द्यावा, यासाठी मी नेहमी पाठपुरावा करीत होतो. याचसाठी फोर्ट फेडरेशन काम करणार आहे. पुरातत्त्व विभाग व फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून किल्ल्याची नियमित देखभाल व प्रत्यक्ष संवर्धनावर काम केले जाणार आहे. राज्यातील गडकोटांच्या देखभाल, जतन व संवर्धनामध्ये फोर्ट फेडरेशन मोलाची भूमिका पार पाडणार असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी भावना संभाजीराजे यांनी भेटीनंतर व्यक्त केली.