

पावसाच्या कहराची व्याख्या बदलणारी ‘माणुसकी’
स्वाती मराडे, पुणे
पाऊस म्हणजे वसुंधरेला प्रेमात चिंब भिजवणारा, सृजनाचा सोहळा थाटणारा, हिरवळीने नटलेल्या डोंगरावरच्या रानफुलावर दवबिंदूचा सडा घालून मन मोहित करणारा, आकाशी इंद्रधनूचा गोफ विणणारा, आभाळी बिजलीचे व धरणीवर मयुराचे नर्तन दाखवणारा, अवनीच्या हिरव्या शालूवर नवनवीन वेलबुट्टीची नक्षी रेखाटून त्यावर गवतफुलांचे रंग भरणारा.. फुलपाखरांचे थवे बागडायला लावणारा.. सावळ्या मेघातून रिते होऊन शुभ्र ढगांचे चित्र रेखाटणारा.. कृषीवलाच्या चेह-यावर हसू फुलवणारा.. नदी, नाले, ओहोळ, तळी यांचे पोट तुडुंब भरणारा.. कधी रिमझिम बरसणारा..कधी रिपरिप करणारा.. कधी अवकाळी येऊन धिंगाणा घालणारा.. तर कधी.. कधी त्याचं रौद्र रूप दाखवणारा… तो पावसाचा कहर.
आठवतो ना..२००५ साली मुंबईची तुंबई करणारा महापूर.. दिवसभर पाऊस थांबायचे नावच घेत नव्हता. संध्याकाळच्या वेळी जेव्हा रस्ते, रेल्वेरूळ पाण्याने गच्च भरले तेव्हा सगळेच जागेवर अडकले.. असं म्हणतात मुंबई कधी थांबत नाही पण त्या दिवशी थांबली होती.. माणसांचे केविलवाणे चेहरे पाहून तिच्याही डोळ्यात पाणी आले होते.. तो पावसाचा कहर पाहून.. पण तेव्हाच तिने हेही पाहिले.. पुरात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी पुढे आलेले हात.. भुकेल्यांना अन्न, चहा, पाणी पुरवण्यासाठी धडपडणारे चेहरे.. या पावसाच्या वेढ्याने माणसातील माणुसकी दाखवली हेही तितकेच खरे..!
२०१४ साली झालेली माळीण गावची दुर्घटना.. संध्याकाळपर्यंत घराघरात विसावलेले गाव पावसाच्या कहरात रात्रीचेच केव्हातरी धरतीच्या पोटात कायमचे विसावले होते.. अजूनही ती बातमी आठवली तर अंगावर काटा येतो.. असे थरारक अनुभव देणारा हा पाऊस.. पावसाच्या या प्रलयंकारी रूपाने.. माणूस कुठे चुकतोय.. निसर्गात कितपत ढवळाढवळ करणे योग्य आहे.. याबरोबरच हे सगळं टाळण्यासाठी काय करायला हवं या सगळ्याचा अभ्यास करायला भाग पाडलं.
२०१९ साली कृष्णा खो-यात आलेल्या पुराने सांगली, कोल्हापूर परिसरातील लोकांना हादरवून सोडले. वाचवायला आलेले सैन्यातील जवान म्हणजे माणसातले देवदूत भेटले..त्यांच्यापुढे आपोआप कर जुळले नि डोळ्यातून पाणी ओघळले. निसर्गापुढे आपण किती तोकडे आहोत याची पुन्हा एकदा प्रचिती आली.. किती धडे दिले या पावसाने.. कदाचित त्यामुळेच किती पावसाळे पाहिले यावर माणसाचं वय सांगितलं जातं. आवडत्या ऋतूला गालबोट लावणारं पावसाचं रूप.. ‘कहर पावसाचा’ या विषय रूपाने आले. पावसाला या रूपात पाहताना होणारी मनाची तगमग सर्व रचनांमधून अनुभवायला मिळाली. संवेदनशील कवीमनातून आलेले शब्द मनाला भावणारे असेच.. हा शब्दप्रपात असाच मनाला लुभावत राहो हीच सदिच्छा.
स्वाती मराडे, पुणे
सहप्रशासक, परीक्षक, संकलक