Home गावगप्पा ✍️बळीराजाचे वारसदार उरले कुठे?

✍️बळीराजाचे वारसदार उरले कुठे?

120

✍️बळीराजाचे वारसदार उरले कुठे?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ परीक्षण

बहरलं सारं शेतशिवार
फुललं डोळ्यात सपान
वारसदार आम्ही तिचे नि
ही धरणी आमची प्राण..

कुठलेही बी मातीआड केले की त्यातून नवीन पीक येते. नवं धान्य मिळते. याच निरीक्षणातून माणसाने शेतीला सुरूवात केली. सुरुवातीला हाताने जमेल तसे.. नंतर तयार केली ओबडधोबड अवजारे व हत्यारे.. अन् कष्टण्यासाठी सोबतीला घेतले काही मुके जीव‌‌.. त्यातलाच अजूनही मानवाची शेतीसाठी साथ देत आहे तो म्हणजे बैल.. केवळ मशागतच नव्हे तर ओझी वाहणे, ओढणे, रहाटगाडगे चालवणे यासाठीही त्याने मनापासून साथ दिली. तेव्हापासून ते अलीकडच्या काळातील ऊस वाहतूकीपर्यंत.. पिढ्यानपिढ्या कृषीवलाच्या सोबतीचा वारसदार ठरलेला..

काळ्या आईची सेवा करताना कधीच पाय मागे खेचत नाही.. तर मालकाच्या साथीने एकेक पाऊल पुढे टाकताना धरणीपुत्राचा जणू तो बंधूच शोभतो. कदाचित म्हणूनच देवाधिदेव महादेवाने ज्याला स्वतःचे वाहन म्हणून स्थान दिले तो नंदीसुद्धा यांच्याच कुळातील. कष्ट तर करतोच पण तितकाच इमानदारसुद्धा.. मालकावर जिवापाड प्रेम करणारा.. प्रसंगी मालकाचे जीव वाचवणारा.. कधी जंगली श्वापदांपासून वाचवणारा.. तर कधी मालकाच्या मृत्यूनंतर स्वतः अन्नपाणी सोडणारा.. कष्टाचा, इमानदारीचा, स्वामिनिष्ठेचा वारसा चालवणारा.. वारसदार

🐄त्याच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी श्रावण महिना एक खास सण घेऊन येतो.. पोळा… शेतीच्या मशागतीचा त्याच्या खांद्यावर भार टाकून कास्तकार निश्चिंत होतो.. म्हणूनच या सणाची सुरूवात होते ती खांदेमळणीपासून.. सजूनधजून धन्याच्या हातात हात घालून मिरवणूक निघते.. गोडाधोडाचा घास प्रेमाने भरवला जातो.. याशिवाय गृहलक्ष्मीकडून कौतुकाने ओवाळून घेण्याचा मान फक्त याच प्राण्याला मिळतो.. परंपरेपेक्षाही त्याच्या गुणांमुळे ठरलेला मान-सन्मानाचा तो वारसदार

काळाच्या ओघात बरेच बदल होऊ लागले. सुका चारा खाऊन जगणारा असलो तरी मला सांभाळणं त्यामानाने जिकिरीचं होऊ लागलं.. धावण्याच्या युगात माझी चाल कमी पडू लागली.. माणसाच्या प्रगतीच्या वेगाशी जुळवून घेणे मला आता जमेना.. त्यामुळेच बैलाच्या जागी शेताशेतातून‌ ट्रॅक्टर फिरू लागले. अन् सुरू झाली माझी गच्छंती. एकेकाळी घराचे वैभव सांगणारा अंगणातील मी..आता क्वचितच एखाद्या अंगणात दिसत आहे. आजवर चालवत आणलेला वारसा आता किती दिवस चालेल.. की हे पहायला आता केवळ चित्रातच उरेल..!

वारसदार आम्ही जरी नामशेष होत चाललोय
बळीराजाच्या अंगणात तरी.. कुठे आम्ही उरलोय..!

श्रावण महिन्याचे औचित्य साधून चित्रचारोळी स्पर्धेसाठी बैलांचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘वारसदार आम्ही’ हा विषय आला‌. वेगळा विचार करून लिहिण्यासाठी प्रेरित करणारा हा विषय. एखाद्या प्राण्याचीही व्यथा जाणता येते ते खरे संवेदनशील मन.. अन् ही व्यथा नेमक्या शब्दात टिपते ते कवीमन.. आज मान सन्मान, कौतुक, कष्ट याबरोबरच बैलाची व्यथाही लेखणीतून जाणवली.. त्या चार ओळीही गर्भित अर्थ सांगून गेल्या. धरणीमातेची सेवा करणा-या या पुत्रास अभिवादन अन् सध्याच्या परिस्थितीत होत असणारे बदल आपण टिपले. सर्व सहभागी स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

✍️सौ स्वाती मराडे आटोळे, पुणे
सहप्रशासक/कवयित्री/परीक्षक/ संकलक/लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह

https://chat.whatsapp.com/Ls5q69dSaG8B4cHcDsAG0A