

‘साहित्यप्रेमींच्या वाणीतील गोडवा आणि लेखणीने मराठी भाषा अजरामर’; सविता पाटील ठाकरे
_प्रकाशन समारंभाच्या प्रमुख अध्यक्षा यांचे प्रतिपादन_
संपादक:पल्लवी पाटील,नागपूर
नागपूर/ लातूर: महाराष्ट्रात आज इंग्रजाळलेल्या मानसिकतेतून मातृभाषेतले शिक्षण अडगळीत पडत आहे. पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छिते.अशा बिकट परिस्थितीत सुद्धा मराठी साहित्यिकांची मायबोलीच्या सामर्थ्यावरील अढळ निष्ठा, दृढ विश्वास व भाषेबद्दलचा सार्थ अभिमान कणभर देखील कमी झालेला नाही. एक सांगते बोआ या अंदमानमधील महिलेचा 2010 मध्ये अंत झाला, आणि जेरू भाषा बोलणारी शेवटची ही एकमेव महिला गेल्यानंतर त्या भाषेचाही शेवट झाला. पण महाराष्ट्रात जोवर साहित्यप्रेमींच्या वाणीत गोडवा आणि लेखणीत प्राण आहे तोवर मराठी भाषा अजरामर आहे. आपल्याला केवल मराठी भाषेचं जतन, संवर्धन नव्हे तर पोषण करायचं आहे. अन नेमकं हेच कार्य करणारे अनेक मराठीचे शिलेदार या ठिकाणी उपस्थित असल्याचे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेड सिलवासाच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सविता पाटील ठाकरे यांनी केले. त्या भालचंद्र रक्तपेढी, रेडक्रॉस भवन सभागृह, गांधी मार्केट, मध्यवर्ती बस स्थानक, लातूर दि ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने संपन्न झालेल्या साहित्यगंध दीपोत्सव अंकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अध्यक्षा म्हणून बोलत होत्या.
लातूर येथे आयोजित समारंभास प्रमुख अतिथी मा.डाॕ.सुनिल गायकवाड, माजी खासदार, लातूर मार्गदर्शक: माजी प्राचार्य डाॕ.माधव गादेकर, ज्येष्ठ साहित्यिक, लातूर, मार्गदर्शक: मा.सुधाकर भुरके, नागपूर, प्रमुख अतिथी: मा. नरेश शेळके, बुलढाणा, संस्थेचे विश्वस्त: मा.अरविंद उरकुडे, गडचिरोली, राज्यस्तरीय कवी संमेलनाध्यक्ष: मा.शर्मिला देशमुख, बीड, संस्थेचे अध्यक्ष: राहुल पाटील, नागपूर, मार्गदर्शक मा.प्रदिप ढगे, प्रसिद्ध शिवव्याख्याते,उदगीर, प्रमुख पाहुणे मा. नागोराव कोम्पलवार, ज्येष्ठ कवी, यवतमाळ तसेच गटशिक्षणाधिकारी सगट साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सवचे प्रकाशन थाटात संपन्न झाले.मराठीचे शिलेदार समूहातील खालील प्रशासक, परिक्षक व सहप्रशासक १) प्रा तारका रूखमोडे, गोंदिया,२) सौ उर्मी घरत, पालघर,३) सविता पाटील ठाकरे, सिलवासा ४) प्रशांत ठाकरे ५) अरविंद उरकुडे, गडचिरोली, ६) वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर, ७) सुधा मेश्राम, गोंदिया, ८) संग्राम कुमठेकर, लातूर, ९) हंसराज खोब्रागडे, गोंदिया, १०) स्वाती मराडे, पुणे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी कवयित्री वसुधा नाईक पुणे यांच्या ‘गुंजन मनीचे’ या कवितासंग्रहाचे तर गणेश कुंभारे, ब्रह्मपुरी यांच्या विचारक्षण या सुविचार संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सविता पाटील पुढे म्हणार्यात की, तसं पाहता भाषा संवर्धनार्थ काम करणारे अनेक यज्ञ रोज पेटतात; त्यातले काही तर निखारा होण्याआधीच विझतात. पण गेल्या 10 वर्षापासून भाषा सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेले मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा मा. राहुलसर व शिलेदारींचे योगदान शब्दात बांधणे कठीण आहे. सरांची अस्मिता बोलघेवडी नसून कार्यप्रवण आहे. भाषेची समृद्धी तिच्या साहित्यातूनच ठरते हे राहुल सरांनी खूप आधीच ओळखलं होतं. म्हणूनच दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी ते नेहमी आग्रही असतात. नुकताच प्रकाशित झालेला साहित्यगंध दीपोत्सव अंक म्हणजे तमाम मराठी सारस्वतांसाठीचा ज्ञानामृत कलशच आहे. मराठीचे शिलेदार समूहांसोबत जोडले गेलेले अनेक पारंगत आज या ठिकाणी आहेत. उत्तम कवी बननं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मला नेहमी वाटतं, वास्तववादी कविता, उजव्या ठरतात त्यासाठी मात्र हवी असते शब्दांची अचूक निवड,लवचिकता,गर्भीत अर्थ.हे सर्व टाकलं की,कवितेला खरी लकाकी येते असेही त्या आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्यात.
आयोजित प्रकाशन समारंभ, पुरस्कार वितरण व राज्यस्तरी कवी संमेलनात 91 कवी कवयत्रींना साहित्यगंध पुरस्कार प्रदान करण्यात आले , 35 शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , 10 संपादकांना उतकृष्ट पत्रकारिता पुरस्कार , 5 जणांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. या सत्राचे सूत्रसंचालन सेंट फ्रांसीस विद्यालय दुधनी, सिलवासा दादरा नगर हवेली येथील विज्ञान शिक्षक प्रशांत ठाकरे यांनी केले, तर आभार मुख्य परीक्षक व मुख्य सहसंपादक वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर यांनी मानले. दुस-या सत्रात मुख्य आयोजक संग्राम कुमठेकर यांनी सूत्र संचालन करून उपस्थितीतांचे आभार मानले. या संमेलनात राज्यभरातून आलेल्या ५५ कवी कवयित्रींनी काव्यरचना सादर केली.