
‘संवेदना’ म्हणजे अश्रूंचे संदर्भ..!; सविता पाटील ठाकरे
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
सर्वसमावेशक, सहिष्णू, प्रजाहितदक्ष, कर्तव्यपरायण, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम भारतीयांचं हृदयातलं मानाचे स्थान. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडसद्रष्टेपणा असे उच्च कोटीचे अनेक गुण शिवाजी महाराजांमध्ये होते. पण हल्ली का कुणास ठाऊक कधी कुणी त्यांचा आदर्श टाळते, कुणी त्यांचे जन्माचे ठिकाण बदलते, कुणी त्यांचा एकेरी उल्लेख करते. उद्विग्नता येते हे सर्व पाहून, तळपायाची आग मस्तकाला भिडते. वाटतं यासाठी केला होता का महाराजांनी स्वराज्याचा अट्टाहास, त्याहीपेक्षा वाईट वाटतं तो संवेदना नसलेल्या या समाजाबद्दल …! अरे…! आपल्या देवतेवरील हे वार निमूटपणे सहन करतो आपण.
संवेदनाच नाही त्यांना बोलण्यात तरी काय अर्थ ? चेतना गमावलेल्या या समाजाची ती ‘श्रद्धा वाळकर’ पस्तीस तुकडे केलेत हो निर्दयी नराधमानं. बोकड पण कापत नसतील एवढ्या निर्देशाचा कळस केला आणि आम्ही नेहमीसारखी हातामध्ये मेणबत्ती घेऊन रस्त्यावर प्रार्थना करत राहिलो मृतदेहासाठी तेही संवेदनशील मनाने..! मागे नाशिकला पुसद यवतमाळ वरून येणारी एक लक्झरी गॅस टँकरला धडकून पेटली. बारा जणांची राख झाली जागीच. या राखेतसुद्धा कुठे किडूक मिडूक मिळतं का हे शोधणारे पाहिलेत मी आणि माझीच संवेदना गलितगात्र झाली काय करणार??
शहरी संस्कृतीचा मोठा आव आणणारे आम्ही, बाजूच्या दोन फ्लॅटमध्ये एका घरात वाढदिवसाची डिस्को पार्टी आणि दुसऱ्या घरात तरुण मुलाचा अपघाती मृत्यू. दृश्य…विदारक होतं; पण स्वीकारावच लागलं कारण संवेदना कधीच गमावल्यात ना आपण. स्वत्वाला तिलांजली कोण बरे देत???? हल्ली तर कोणी नाही. पण ती बिचारी अगदी स्वतःच्या सर्टिफिकेट वरील नावांचाही विचार न करता कुणाच्यातरी आधारावर, विश्वासावर माहेरची माणसं सोडून सासरी येते आणि लहानसहान गोष्टींवरून टाकून बोलणे, उपाशी ठेवणे, कधी कधी तर मारणे, सारं निमुटपणे सहन करते ती…!! कारण तिला माहित आहे, की मी परत माहेरी गेली तर, माझ्या आई-वडिलांची जगण्याची आशाही संपेल आणि त्यांच्या संवेदना मृत होतील. पुन्हा स्वतःला संवेदनशील समजणारा समाज आहेच नाव ठेवायला.
संवेदना…..
संवेदना….
संवेदना….
‘संवेदना’ म्हणजे नाजूक मनातील हळवा कप्पा…! संवेदना म्हणजे चुकीच्या निर्णयाचा पश्चाताप ….! संवेदना म्हणजे अपराधीपणाची टोचण….! संवेदना म्हणजे अश्रूंचे संदर्भ……! संवेदना म्हणजे आयुष्याची ओढाताण …..! आणि शेवटी संवेदना म्हणजे वैचारिक उणीव….! किती अर्थपूर्ण शब्द आहे ना संवेदना. सचेतन आणि अचेतन वस्तूंमधील साम्य आणि भेद यांचा अभ्यास करताना डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतींना संवेदना असतात हे जगाला समजावलं. आपल्याला त्या वनस्पतीची संवेदना समजली, तरी देखील स्वार्थासाठी झाडावर कुऱ्हाड चालवताना आपण जराही कचरत नाही. संवेदनाहीन होतो आणि हेच आजच्या समाजाचे वास्तव चित्र देखील आहे.
अशा संवेदना जागवणे ही काळाची गरज आहे. जेव्हा सारं काही थांबतं, तेव्हा लेखणी काम करते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जगाला समजावून सांगितलं आणि त्याच लेखणीच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव बनले. आज बुधवारी काव्यरत्न स्पर्धेसाठी ‘संवेदना’सारखा संवेदनशील विषय देऊन आदरणीय राहुल सरांनी कवी कवयित्रींना साद घातली. खूप छान व्यक्त झालात तुम्ही सर्वजण. मग स्रीभ्रूण हत्या प्रतीची संवेदना असो की, भावनांच्या मोलाप्रतीची …! मने बसलेल्या घावाची असो की गावापासून बाहेरच्या जीर्ण जगण्याची…. शेतकऱ्यांच्या दुःखाप्रतीची असो की, पक्षांच्या किलबिलीची….रक्ताच्या नात्यातली असो की संवेदनशील बाबांप्रतीच्या प्रेमाची, मनाच्या गाभाऱ्यात घर करून गेल्यात आपणा सर्वांच्या ‘काव्यसंवेदना’.
‘दया प्रेम करुणा शांती,
असे उभारायचे पुतळे ज्यातून स्रवेल संवेदना हाडामांसापेक्षाही कधी उजव्या ठरतील भावना…!
या ओळी गर्भित अर्थ…खऱ्या अर्थाने मानवी संवेदनांचे प्रतीकच होय…तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन…!
पण थोडं काही…
कवितेतील शब्दांना अर्थपूर्ण नाद असतो, ज्यामुळे ती कविता हृदयापर्यंत पोहोचते. शब्दछटा व अर्थछटा यामुळे कवितेचा गर्भित अर्थ मनाला भिडतो वापरलेल्या अलंकारांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त होते. परंतु काही विषय असे असतात, की तेथे मनातील काव्यकल्पनेला लेखणीतून भरारी घ्यावीच लागते. त्यासाठी भरकटलेलं कवीमन एकाग्र करणे गरजेचे ठरते. आज आपण पाहतो सर्वचजण भरकटत चाललेत या आभासी जगात. साहित्याची गोडी आणि त्यातील गोडवा चाखण्यासाठी साहित्याशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे हेही विसरून चाललेली ही नवोदित पीढी मराठी साहित्य क्षेत्राची हानी तर करत नाही ना असेही मनोमन वाटून जाते. ‘संवेदना’ जागृत ठेवण्यासाठी वेदना सहन कराव्या लागतात हे जरी लक्षात ठेवले तरी आपण या क्षेत्रात गगनभरारी निश्चित घेऊ शकतो, असा मला विश्वास आपल्याप्रती वाटतो. आज बऱ्याच रचना खूप सुंदर होत्या. अनेकांनी योग्य न्याय देण्याचा विश्वासपूर्ण प्रयत्न केलाय आपणा सर्वांचे मनभरून अभिनंदन आणि पुढील काव्यलेखनास शुभेच्छा…!!!
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ समीक्षक/ कवयित्री/ लेखिका/ प्रशासक/ कार्यकारी संपादक