Home अमरावती अकोला ‘भावनांना रूप देई, हसरी पापणी’; वैशाली अंड्रस्कर

‘भावनांना रूप देई, हसरी पापणी’; वैशाली अंड्रस्कर

145

‘भावनांना रूप देई, हसरी पापणी’; वैशाली अंड्रस्करपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शनिवारीय काव्यस्तंभ परीक्षण_

*डोळे हे जुल्मी गडे*
*रोखूनी मज पाहू नका*
*जादूगिरी त्यात पुरी*
*येथं उभे राहू नका..‌!*
*हे भावगीत असो…वा..*
*पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यांवरती*
*ही नजर उधळते काळजातली पिरती*
‘पिंजरा’ चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री स्व. संध्या शांताराम अभिनित ही लावणी असो…मनाला भुरळ पाडणारी ही गीते फक्त गीतेच नाहीत तर भावनांना साद घालणारी अजरामर कलाकृती आहेत.

मानवाला ज्ञान देणाऱ्या पंचेंद्रियांपैकी डोळे, नयन, चक्षू, अक्ष, लोचन अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या इंद्रियाला आपल्या साहित्यविश्वाने मात्र भावनेच्या लाटेवर तरंगत ठेवले…ऑंखो ही ऑंखो में इशारा हो गया…बैठे बैठे जीने का सहारा हो गया…नुसतं बघण्यापासून जीवनाचा आधार होण्याचं कर्तृत्व ह्या डोळ्यांचं…मग या डोळ्याची किलकिलणारी पापणी कशी बरे दूर राहिल भावनेपासून….?

ही पापणी कधी ओलावते, कधी हसते तर कधी लाजते…भीतीने कधी गच्च बसते…पण हिच्या नजाकतीने भावनांची जी देवाणघेवाण होते ना त्याला तोड नाही. ‘हॅपी जर्नी’ नावाचा मध्यंतरी एक मराठी चित्रपट येऊन गेला. बहीण-भावाच्या नात्यांतील सुंदर अनुबंध मृत बहीण आणि खस्ता खात वाढलेल्या भावातील जगायचे राहून गेलेले क्षण फॅंटसी रूपात चित्रित केले गेले…त्यातील…

तारका का रेंगाळल्या, तुझ्यासाठी पहिल्यांदा पापण्या ओलावल्या, तुझ्यासाठी पहिल्यांदा. का सांग ना…….मी पुन्हा नवा कसा…….!

बहिणीच्या हट्टास्तव भावाचे नव्याने जगणे आणि त्याच्या पापण्यांचे ओलावणे…खरेतर सुख आणि दुःखाची ही भेळ जीवनाचे सार सांगणारी…!

‘हसरी पापणी’ हा शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचा विषय माननीय राहुल पाटील यांनी दिला. या हसरी पापणीच्या निमित्ताने मानवी मनाचा तळ किती खोल आणि वैविध्यपूर्ण असतो ते कळाले. बाळाच्या मिटमिट पापण्यांपासून तर सुखासमाधानाच्या हसऱ्या पापणीपर्यंतचा प्रवास नजरेच्या टप्प्यात आला…या हसऱ्या पापण्यांतील मिश्किल भाव आपणा सर्वांना जगण्याची नवी उर्मी देवो…हीच शुभेच्छा…छान व्यक्त झालात कविता चारोळींमधून…सर्व शिलेदारांचे हार्दिक अभिनंदन….!

टिप : आरंभी आपण एका लावणीचा उल्लेख केलेला…या लावणी संगीतप्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे, तिला ठसकेबाज, खट्याळ आणि डोईवरचा पदरही ढळू न देता घरंदाजपणा मिळवून देण्याचं श्रेय ज्यांना जातं..त्या लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना ताई चव्हाण यांचे आज १० डिसेंबर २०२२ ला वृद्धापकाळाने निधन झाले…हसरी पापणी ठेवून रसिकांचे दुःख हरण करणाऱ्या आदरणीय सुलोचनाताईंना मराठीचे शिलेदार समूहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…!

➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह
♾️♾️♾️♾️🔖🌸🔖♾️♾️♾️♾️