‘नवीन वर्षात दुसऱ्यांच्या ओल्या पापण्या कधीतरी पुसून पहा’; अनिता व्यवहारे

‘नवीन वर्षात दुसऱ्यांच्या ओल्या पापण्या कधीतरी पुसून पहा’; अनिता व्यवहारेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुलाबी थंडीचा डिसेंबर महिना सुरू झाला आणि नव्या वर्षाचे वेध लागले. ‘पळ क्षणांची पाखरं दाही दिशांना उडाली, दिस चालले चालले मास चालले चालले, कुणी न येथे कुणासाठी थांबली. प्रत्येकाला आयुष्यात मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे जाण्याची घाई झालेली असते. म्हणून भूतकाळात रममाण होण्यापेक्षा वर्तमान काळात आनंद मिळविण्यात आणि भविष्याची तरतूद करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी करून नववर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक असतो. कारण आपल्याला माहित आहे की काळ जशी जखम करतो, तशीच तो फुंकर ही घालतो. यातना देऊन त्याचा विसरही तोच पडतो. छळांची काहिली जसा काळ तसा मायेची सावली देणारा ही काळच असतो.

नकोच सारा गुंता, म्हणून आयुष्याच्या गणितातले हे समीकरण सोडवताना सुखाच्या क्षणांची बेरीज आणि दुःखाच्या क्षणांची वजाबाकी करायची. तरच जीवनाचा ताळेबंद सोईस्कर, समतोल होतो. माझ्या मते ही गणितं आपल्या संपूर्ण जीवन प्रवासात वारंवार करावी लागतात.
‘खेळ जुना युगायुगांचा, रोज नव्याने खेळणाऱ्यांचा’, म्हणत आपण आपल्या अवतीभवती असलेल्या भूत भविष्याचा विचार करीत आत्ताचा क्षण ही सजवायला हवा. जेणेकरून त्याचा सुगंध भविष्यातही दरवळत राहिला पाहिजे. पण त्या साठी वेगळं काही करायची गरज नसते. बागेतील एखाद्या सुंदर वेलीवरचे फुल जितक्या सहजतेने उमलते तितक्या सहजतेने तुम्ही जीवनाकडे पाहिलं तरच ‘जीवन सुंदर आहे.’ याची प्रचिती येईल आणि तुम्हालाही वाटेल, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’. कारण या जीवनाची जिथून सुरुवात होते आणि त्याचा जिथे शेवट होतो.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हातात फुले घेऊन उभे राहा. पण, त्याचवेळी दुसऱ्यांच्या ओल्या पापण्या जरा कधीतरी पुसून पहा. मनात दुसऱ्याला थोडीशी जागा देऊन पहा. आणि अनुभवा मग आयुष्याचं कसं नंदनवन होईल आणि हो जसे या जगन्नियंत्याचे उपकार मानता तसे जन्मदात्यासाठीही थोडेसे कृतज्ञताभाव मनी ठेवा. कारण त्यांच्यामुळेच आपण हे जग पाहिले आहे, पहात आहोत.
त्याच बरोबर आपली ही “भूमाता ‘जन्मजन्मांतरीचे ऋण तिचें न फेडताच आपण जग सोडून जातो. या वर्षी तिलाही जरा शुभेच्छा देऊन पहा.

कारण आज सकाळी जेव्हा शुभेच्छांच्या संदेशासाठी माझ्या फोनचा खणखणाट होत होता तेव्हा माझ्या मन मंदिरातून आवाज आला. त्याने मला विचारलं. नवीन वर्षाचा सूर्योदय पाहिलास का? काय म्हणाला तो तुला? तेव्हा स्वतःला सावरून मी त्या तेजपुंज सूर्याकडे पाहिलं नि माझे डोळे दिपले. इकडे तिकडे फिरवली नजर… कोवळ्या पानांवर, वेलीवर. निळ्या डोंगरावर.. गोठ्यातल्या गाईच्या आणि दारातल्या कुत्र्याच्या डोळ्यात… पण मला कुठेच दिसेना नववर्ष…. आणि मी भांबावून गेले… दारात आले… पृथ्वी मातेला हात जोडले… ती पाहत होती माझ्याकडे, त्याच भावशून्य नजरेने….. क्षणभर वाटलं अरे हिच्यात तरी किती झाले बदल.. भूकंपाचे झटके… ज्वालामुखीचे उद्रेक.. नद्या-नाल्यांना आले पूर… वणवे ही पेटले सर्वदूर…. पण हिने कधीच नाही केली तक्रार. ज्या नववर्षाचे आपण स्वागत करतो त्यासाठी हिने तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पुरी केली आणि आपल्याला नव किरणांची यांची भेट दिली. या संपूर्ण चराचराला नव वर्षाच्या शुभेच्छा !!!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles