
‘विचार करण्याची शक्ती फक्त वाचनातून समृद्ध होऊ शकते’; राहुल पाटील
_मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभ थाटात_
सिलवासा: आपण विचार करतो म्हणजे नेमके काय करतो? तर एखाद्या न उलगडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधतो किंवा पर्यायी निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व करण्यासाठी किमान शब्दभांडाराची गरज असते, नंतर मग बुद्धिवंत, विचारवंत, अभ्यासू वगैरे बिरूदे आपण लावू शकतो. जोपर्यंत माणसाच्या मेंदूत शब्दभांडार वृद्धींगत होत नाही; तोपर्यंत आपण विचार करू शकत नाही. शब्दांचा खजिना तयार करण्यासाठी ‘वाचन’ करणे अत्यंत गरजेचे आहे. ‘विचार करण्याची शक्ती फक्त वाचनातून समृद्ध होऊ शकते’. असे प्रतिपादन मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक राहुल पाटील यांनी केले. ते मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड, दादरा नगर हवेली तर्फे आयोजित जिजाऊ जन्मोत्सव, मराठा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा व शैक्षणिक गुणगौरव सोहळा या समारंभात विशेष अतिथी म्हणून बोलत होते. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे दिनांक 7 जानेवारी 2023 वार शनिवार रोजी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री टॉवर कम्युनिटी हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला.
ते पुढे म्हणाले, की आपण आज सर्व कौतुकास पात्र ठरले आहात. कारण फक्त वाचनानेच आपला मेंदू सुसंस्कारीत व समृद्ध झाला आहे. म्हणूनच आपली विचार करण्याची शक्ती ही अधिक गतीमान असल्याने आपण हे यश प्राप्त करू शकला. वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी दररोज किमान दोन तास तरी अवांतर वाचन करायला हवे. “आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे, जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते, आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते!.” आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत. हे जितके खरे असले तरी; सध्या आपण कुठे आहोत? किंवा आपले पुढचे भविष्य काय असेल? याचे उत्तर शोधूनही न सापडण्यासारखे आहे. कारण देश व संस्कृती टिकवण्यासाठी चाललेली धडपड ही कुचकामी ठरत असल्याचे वारंवार सिध्द होत आहे. देशातील राजकीय वातावरण अक्षरश: गढूळ झाले असून, उद्याचा सूर्य आपला असेल का? हे ही सांगता येणे अशक्यप्राय आहे. राजकारण हा आपला प्रांत नाही; परंतु आज ग्रामीण भागातील तरूणाई राजकारणात अधिकाधिक सक्रीय होत असल्याचे चित्र आहे. म्हणजेच मुत्सद्दी राजकारणी तरूणाईला या मृगजळात ओढू पाहतेय. सांगण्याचं तात्पर्य ऐवढेच की, राजकारणात भविष्य नाही.
“बुध्दीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारी लोकं चांगली असतात. कारण बुध्दीचा वापर करणारे आधी स्वत:चा विचार करतात; पण मनाचा वापर करणारी लोकं मात्र आधी दुसऱ्यांचा विचार करतात..!” मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी मनाने विचार करतात ही बाब अत्यंत अभिनंदनीय आहे. मराठा सेवा संघाचे कार्य हे उल्लेखनीय असून यापुढे स्तुत्य उपक्रमास मराठीचे शिलेदार प्रकाशनाचे सहकार्य राहणार असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.