
‘दहशतवादाची तीव्रता नक्की कमी होईल’; स्वाती मराडे
कितीही सैनिक असू देत सीमेवर तैनात.. त्यांचीही पलटण असतेच तयार.. घुसखोरी करून..फितुरांना सामील होऊन.. बाॅम्बचा वापर करून..हातात रायफल घेऊन.. त्यांच्या म्हणण्याला विरोध करणारा कोणी भेटलाच तर त्याचा जीवही घेणार.. मग तो लहान असो की मोठा पर्वा न त्याची करणार.. रेल्वे रूळ उखडणं.. विमान अपहरण करणं.. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी बाॅम्बस्फोट घडवून आणणं.. हल्ली तर काही ठिकाणी शाळांवर पण हल्ले झालेत.. एकच ध्येय दहशत पसरवणंं.. धमकावणं, जिवे मारणं.. हा तर नित्याचाच खेळ.. आक्रोश, आरडाओरडा पाहून छद्मी हास्य उमटतं.. काय या दहशतवाद्यांचं मन मेलेलंच असतं..?
आपण का आणि कशासाठी हे करतोय याचा कधी विचारच येत नसेल का डोक्यात.. नको त्या गोष्टीच्या मागे लागून स्वतःचंही आयुष्य पणाला लावून.. आणि इतरांचंही जीवन धोक्यात घालून काय मिळत असेल.. फक्त विकृत समाधान..? हा दहशतवाद संपविण्यासाठी त्यांचे मनपरिवर्तन करता येईल का.. मनात रूजलेल्या या बीजास कोंब फुटण्याआधीच ते खुडून टाकले तर.. तर दहशतवाद थांबेल का..?
खरेतर निरूत्तर करणारा हा प्रश्न. कारण सीमेवर असणारा हा दहशतवाद कधी देशभर पसरला हेदेखील समजले नाही. फक्त आपलाच नव्हेतर जागतिक पटलावरचा हा प्रश्न. सर्व दहशतवादविरोधी देश एकत्र आले अन् त्यांनी ही कीड रोखण्यासाठी प्रयत्न केले तर.. तर दहशतवाद थांबेल का..? कदाचित संपणार नाही. पण ही समस्या निरपेक्ष व कठोर भूमिका घेऊन सोडवली तर फोफावणारी ही कीड आटोक्यात नक्कीच येईल.
कुठल्याच निरागस बालमनात दहशतवादी विचार असणार नाहीत. मग ही कोवळी मने व नाजूक पावले मोठी झाल्यावर दहशतवादाकडे कशी वळत असतील.. हळूहळू भोवतालच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा.. धार्मिक वातावरणाचा परिणाम होऊन.. चुकीचे आदर्श व चुकीच्या मार्गदर्शनामुळे हिंसेकडे धावत असतील का ? तणावपूर्ण आयुष्य जगत असताना आपले म्हणणे कुणीतरी ऐकून घ्यावे यासाठी दहशतीचा मार्ग चोखाळला जात असेल का ? न्याय्य व योग्य मागण्या शासनाने समजून घेऊन योग्य ती तजवीज केली तर.. तर हा सामाजिक दहशतवाद थांबेल का..?
कोणताच धर्म हिंसेचं समर्थन करणार नाही. परंतु स्वार्थी व संधीसाधू लोक धर्माचं भांडवल करून तरूणांच्या मनात विष कालवतात. परिणामस्वरूप हेच लोक प्राणार्पण करायला व जीव घ्यायलाही मागेपुढे पहात नाहीत.. पण धर्माचं योग्य आकलन करून सर्वधर्मसमभावाची भावना मनात रूजली तर हा धार्मिक दहशतवाद संपुष्टात येईल का..?
सगळ्याच शक्यता पूर्णपणे दहशतवाद संपवतील असे नाही पण तीव्रता नक्कीच कमी करतील. हेच विचारप्रवर्तन करायला लावणारा आजचा चित्र चारोळी स्पर्धेचा विषय… हरत-हेचे प्रश्न विचारून मूळ प्रश्नाची उकल करण्यासाठी केलेले लेखन अवलोकन करण्यासारखेच. सीमाभागातील दहशतवाद ते अंतर्मनातील दहशतवादापर्यंत विचारमंथन झाले. दहशतवादाच्या परिणामांवर हळहळणारी ते कठोर पावले उचलण्याची हमी देणारी लेखणी.. सर्वांना चारोळीत सामावण्याचा प्रयत्न खूपच छान.. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏
स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक,कवयित्री लेखिका