
“वाट बघण्यापेक्षा, आपल्यातील कर्तृत्वाने यशाची बाग फुलवा”; वैशाली अंड्रस्कर
स्वप्ने विकत घेण्या न बघावी वाट काळोखाची…उजाडलेल्या माळरानी आस नको गवतफुलांची…!
किती बघावी वाट…? किती साधासोपा प्रश्न…पण मनाला खोलवर ढवळून टाकणारा. कधी प्रिया-प्रियतमेची आतुरता, कधी नोकरीसाठीची तगमग, द्वैत-अद्वैताच्या पल्याड लागलेले कधी वेध तर एकजीवतेची जाण असूनही वाट बघण्याची मनी कायम हूरहूर. मातृत्वाच्या ओढीने नऊ महिने नऊ दिवस उत्सुकता वाट बघण्याची तर वार्धक्यकाळी दूरदेशी गेलेल्या पाखरांसाठी तगमग…अखेर आम्हीच आता तुम्हाला विसरणार ही स्वतःचीच परखडपणे काढलेली समजूत, सीमेवर लढणाऱ्या जवानाची सहचारिणीचे वाट बघण्यात सरत चाललेले आयुष्य…एका फोन कॉल च्या प्रतिक्षेत सुखाची परिसीमा गाठणे आणि दिवाळसणाला भाऊरायाची आतुरतेने माहेरवाशीणने वाट बघणे ते पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत स्त्रियांना मानसन्मान मिळण्याची बघावी लागणारी वाट…ते कळीचे फुलांत रूपांतर होऊन सक्षमपणे जगण्याची आस पासून मातीत पेरलेल्या बी चे पावसाच्या थेंबांची…बा विठ्ठलाच्या सगुण दर्शनासाठी आतुर भक्तिरसात डुंबलेला भाविक…अगदी अथपासून इथपर्यंत समूहात नजर टाकली तेव्हा या आणि अनेकविध आशयांच्या रचना वाचायला मिळाल्या.
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय मुख्य प्रशासक राहुलदादा पाटील यांनी दिलेला ‘किती बघावी वाट ?’ या विषयाला अनुसरून आलेल्या सर्वच रचना भावगर्भित, शब्दसौंदर्याने नटलेल्या, मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देताना जणू आसवांचे पाट वाहताना…!
पण जरा आवडीचा विषय म्हटला की, अर्थात आवडीचा यासाठी की बऱ्याच जणांना या विषयाने तारूण्यात डोकावायला लावले. कोणी अगदी मजनू होऊन तर कोणी रांझा होऊन आपल्या प्रियतमेला आळवत राहिले. यात मात्र शब्दसंख्या वाढत गेली. शब्दसंपदा आवश्यकच पण भावना नेटक्या शब्दांत आणि ह्रदयात घर करणारी हवी. त्याचबरोबर आशयाकडे दुर्लक्ष नको. एक रचना एकाच आशयावर असली की प्रभावी होते. अनेक आशय एकत्र आले की ती जोडजंतर वाटते म्हणून रचनाकारांनी एकाच विषयावर अनेक आशयाच्या वेगवेगळ्या रचना केल्या तरी चालतील. परीक्षण आणि संकलन आम्ही आमच्या नियमानुसार करू पण तुम्ही काव्यरचनेची लय बिघडू देऊ नका. तुमच्या कडे भरपूर शब्दसाठा, अनुभव आणि आशय आहेत…त्याचा नक्कीच उपयोग करा…सर्वांना शुभेच्छा…!
आरंभी मी उल्लेखिलेल्या ओळी खरेतर स्वप्ने बघण्यासाठी काळोखाची गरजच नाही ….कारण भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटलेच आहे “स्वप्ने ते नाही जे आपण झोपेत पाहतो , स्वप्ने ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत.”
तसेच उजाडलेल्या माळरानी अर्थात आपल्या मरगळलेल्या मनावर यशाची फुले कशी उमलणार… फक्त वाट बघितल्याने नाही तर आपल्यातील कर्तृत्वाने यशाची बाग फुलवा आणि इतरांनाही मदत करा…!
परीक्षण बरंच लांबतयं…पण एक अनुभव इथे आपणासोबत हितगुज करावासा वाटतो… डिसेंबर महिन्यात एका वृद्धाश्रमाला भेट देण्याचा योग आला. साधारण अठ्ठावीस तीस ज्येष्ठ नागरिक तिथे वास्तव्यास आहेत. माझ्यासारखेच इतरही काही तरुण तरुणी तिथे भेटीस आले होते. आमच्या सोबत काही भेटवस्तू आणि खाऊ होता. मात्र त्या सर्व वृध्द मंडळींना त्या खाऊ आणि भेटवस्तू पेक्षा आम्ही त्यांना भेटायला आलोय याचेच अप्रूप होते. त्यांची नजर आणि शब्दही सांगत होते… आम्हाला हे नाही आणले तरी चालेल पण भेटायला या…किती बघावी वाट…? या प्रश्नातील हा मन हेलावणारा प्रसंग मी प्रत्यक्ष अनुभवत होते. परत भेटीला येण्याचे मनापासून त्यांना आश्वासन देत होते…चुका तर सर्वांच्याच हातून होतात कधी ज्येष्ठांच्या तर कधी तरूणाईच्या पण कुठेतरी धागा जोडून ठेवणे आवश्यक….यातच माणुसकीचे बीज आहे…. नाही का…चला तर कुठल्यातरी चांगल्या कार्याची सुरुवात करून वाट बघण्यातली आतुरता संपवू या…शुभस्य शीघ्रम….!
✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह