
जनआक्रोश मोर्चात हिंदूं एकजुटीचे दर्शन
_पुण्यात विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाज व विविध हिंदू संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य
जनआक्रोश मोर्चामध्ये आज पुण्यात हिंदू एकजुटीचे दर्शन झाले. धर्मांतर,गोहत्या आणि लव्हजिहाद या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या मोर्चात हिंदू धर्मियांच्या विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भगव्या टोप्या, भगवे झेंडे, जय श्रीराम, ‘छ्त्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘छ्त्रपती संभाजी महाराज की जय’ या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. हजारोंच्या संख्येने अबालवृध्द मोर्चात सहभागी झाल्याचे दृश्य होते.
फाल्गुन अमावस्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ‘धर्मवीर दिन’ म्हणून जाहीर करावा, लव्ह जिहादप्रकरणे आणि देशाच्या अनेक भागात होणारे हिंदू धर्मियांचे धर्मांतर रोखावे, गोहत्या थांबवण्यात याव्या. त्यासाठी अशा घटनांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसह इतर आग्रही मागण्या या जनआक्रोश
मोर्चाच्या माध्यमातून सरकारपुढे ठेवण्यात आल्या आहेत.
या जनआक्रोश मोर्चामध्ये अनेक मान्यवर व प्रतिष्ठीत व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. छत्रपती घराण्याचे वंशज आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, हिंदुत्ववादी नेते धनंजय देसाई आणि तेलंगणाचे आमदार राजा सिंह उर्फ राजा भैया यांची या मोर्चात प्रमुख उपस्थिती ठळकपणे दिसली. विशेष म्हणजे ८७ वर्षांच्या ॲड. इनामदार यांचा सक्रीय सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरला.
मोर्चाची सुरुवात लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून झाली. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गाने डेक्कन जिमखान्यावर आला. तेथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चातील सहभागी मान्यवरांच्या भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने हिंदूंनी एकत्र येऊन असे एकजुटीचे दर्शन घडवणे हा शहरभर चर्चेचा विषय झाला. नुकत्याच घडलेल्या धर्मातरांच्या घटना आणि तरूणींवरील आत्याचाराच्या घटनांची पार्श्वभूमी या जनआक्रोश मोर्चाला असल्याने हिंदूंची ही एकता
लक्षवेधक ठरली.