
‘हॅशटॅग अलक” श्रोत्यांच्या प्रतिसादात रंगला अभिनव प्रयोग
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: संस्कार भारती, साहित्य विभागाच्या वतीने नुकताच आयोजित करण्यात आलेला “हॅशटॅग अलक’ हा अभिनव साहित्य प्रयोग रसिक श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगत गेला. भारतीय विचार साधनेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या प्रयोगातून पं. राजेंद्र वैशंपायन व त्यांचे सहकारी सौरभ नाईक यांचे रसपूर्ण सादरीकरण श्रोत्यांना वेगळाच आनंदविश्वात घेऊन गेले.
चार ओळींची सुटसूटीत गोष्ट आणि कथेतून नकळत दिला जाणारा संदेश अशी वैशिष्ट्य असलेला ‘अलक’ वाचकांच्या मनाची पकड घेणारा साहित्य प्रकार आहे. त्याचा मंचीय प्रयोग श्रोत्यांना वेगळीच अनुभूती देणारा ठरला. आजपर्यंत लघुकथा हा लोकप्रिय साहित्य प्रकार आपल्या सर्वांना परिचित आहे. पण आजकाल लघुकथेचंही लघरूप, म्हणजे अति लघु कथा – अ. ल. क. ‘अलक’ हा साहित्यातला अभिनव प्रयोग सध्या खूपच लोकप्रिय होत आहे.
“तो उशीरा यायचा, ती वाट पाहत रहायची, तो
आवरून झोपी जायचा, ती वाट पाहत रहायची.. ”
अशी ‘वन लायनर स्टोरी’ म्हणता येईल असा हा प्रकार. अगदी थोडक्या शब्दांत प्रसंग वर्णन करता करता कथा सांगणे आणि कथा सांगता सांगता आशयाचा गाभा सांगून विषयाचे तात्पर्य लक्षात आणून देणे अशी ही साहित्य कला ‘अलक’ या नावे प्रसिध्द होत आहे.
‘अलक’ मराठीमध्ये रूढ करणारे पं. राजेंद्र वैशंपायन हे स्वतः सौरभ नाईक यांच्या समवेत ‘हॅशटॅग अलक’ हा प्रयोग मंचावर सादर करतात. त्याला मिळणारा वाढता प्रतिसाद श्रोत्यांमध्ये ‘अलक’ अधिकच लोकप्रिय करीत आहे. संस्कार भारतीच्या साहित्य संयोजन विधा प्रमुख, माधुरी जोशी निमंत्रक असलेल्या या कार्यक्रमात पं. राजेंद्र वैशंपायन लिखित एका पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. वैशंपायन यांच्या मातोश्री प्रा. विजयाताई वैशंपायन यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी केतकी देशपांडे यांनी ध्येयगीत सादर केले. सूत्रसंचालन आरुषी दाते यांनी केले . संस्कार भारतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच, वाचन चळवळीचे सदस्य आणि रसिक श्रोते कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.