
किलबिल शाळेत’परीक्षे पे चर्चा’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण
_पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: परीक्षा म्हणजे ताण तणाव, असे समीकरण सध्या रूढ झाले आहे.. गुणांची वाढती स्पर्धा, हव्या त्या शाखेस प्रवेश मिळवण्यासाठी लागणारी जास्तीची टक्केवारी या सर्व गोष्टींचा दबाव विद्यार्थ्यांवर आणि पालकांवरही वाढत चाललेला जाणवतो. याच पार्श्वभूमीवर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळा-शाळा मध्ये परीक्षार्थींशी थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला.
परीक्षेच्या तणावाचा सामना सहजपणे कसा करावा आणि अभ्यास करणे व पेपर सोडवणे यातला आनंद कसा घ्यावा याबद्दल हलक्या फुलक्या शब्दात मोदीजींनी मुलांशी संवाद साधला. पंतप्रधानांच्या या ‘परीक्षे पे चर्चा’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गोखलेनगरमधील किलबिल शाळेत आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या थेट प्रक्षेपणाबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील यशस्वी मुलांना आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन किलबिल शाळेचे प्राचार्य रफिक सौदागर आणि शिक्षकवर्ग यांनी केले होते. गोखलेनगर-जनवाडी भागातील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.