‘चिंतनाची दीपमाळ’; न्या.नरेंद्र चपळगावकरांचे साहित्य

‘चिंतनाची दीपमाळ’; न्या.नरेंद्र चपळगावकरांचे साहित्यपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर,पुणे

गेले काही दिवस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजत आहेत. वर्धा येथे तीन दिवसीय साहित्य संमेलनाची सर्व तयारी पूर्ण होत असल्याचे चित्र माध्यमातून सतत समोर येत होते. आज अखेर तो दिवस उजाडला आणि साहित्य महोत्वाचा शुभारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे साहित्याचे वारकरी या साहित्य पंढरीला पोहचले आहेत.
दरवेळी हे वार्षिक साहित्य संमेलन कोणत्या ना कोणत्या वादाने गाजते. पण रसिक साहित्यप्रेमी मात्र अशा कुठल्याही वादात न पडता या रम्य सोहळ्याचा मनमुराद आनंद अनुभवतात. साहित्य संमेलनाच्या विविध मंडपात भरगच्च गर्दी करतात. मनभरून आवडती पुस्तकं विकत घेतात आणि साहित्यसंमेलन यशस्वी करतात.
सामान्य रसिकजनांनी आपलासा करून ठेवलेला हा सोहळा यावर्षी विशेष लक्षवेधक ठरणार, कारण तो साजरा होतोय महात्मा गांधींच्या कर्मभूमीत.
याला जोडून एक सुंदर योगायोग जुळून आला; तो म्हणजे, वर्ध्यात होणा-या या 96 व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे आदरणीय न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर गांधी युगाचे साक्षीदार आहेत. ‘महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’ हे पुस्तक लिहीणारे चपळगावकर कर्मावर निष्ठा ठेवून सतत कार्यरत असलेले एक कर्मयोगी आहेत.
विचारवंत म्हणून ख्याती असलेल्या चपळगावकरांच्या अध्यक्षीय निवडीने वैचारिक साहित्यावर प्रेम करणा-या वाचकांना मनापासून आनंद झाला. विविध दैनिकातून, मासिकातून, दिवाळीअंकातून नित्यनेमाने विपुल लेखन करणा-या चपळगावकरांचे लेखन वाचकांना तसे परिचित आहे. नियतकालीकातून विखुरलेले हे लेख स्वरूपातले साहित्यसंचित पुस्तकाच्या रूपातही वाचकांच्या हाती सोपवण्यात आलेले आहे.
त्यांची ही सारी लेखन संपदा हाती घेतल्यावर उजेडाचा एकेक कवडसा हाती यावा तसं प्रगल्भ विचारांचा एकेक कवडसा ओंजळीत येतो. त्यांच्या या वैचारिक लेखनात कुठेही जडजंजाळ शब्दांचे ओझे नाही. उलट अगदी सहजपणे ओळीओळीतून पाझरणारी प्रसन्नेतची लहर मनाला सुखावून टाकते.
नरेंद्र चपळगावकरांच्या लेखनाला वैविध्याची झालर आहे. त्यांचे अभ्यासपूर्वक मांडलेले चिंतन जिज्ञासू वाचकांना एक दिशा देते. त्यांचे बरेचसे लेखन नैमत्तिक आहे. कुठल्यातरी निमित्तासाठी लिहीलेले लेख त्या त्या काळाची साक्ष पटवतात. त्यांचे कायदेविषयक लेखन तर माहितीचा खजिनाच आहे.
सर्वात रंजक लेखन आहे, ते न्यायमूर्ती म्हणून काम करताना समोर आलेल्या जिवंत घटनांना त्यांनी दिलेला कथेचा घाट आणि रूप. ‘न्यायाच्या गोष्टी’ या पुस्तकातल्या न्यायमूर्तींच्या प्रत्यक्ष अनुभवांनी नटलेल्या कथा एका अनोखे विश्वरूप दर्शन घडवतात. खरे तर या न्यायिक कथांनी मराठी कथादालनात एक आपला असा एक समृध्द कक्षच स्थापन केला आहे.
न्यायदानाचा तराजू तोलणारा न्यायमूर्तींचा हात, लेखनात इतक्या सफाईने फिरला आहे की, फार मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण करून ठेवल्याचे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवत आहे.
त्यांच्या पुस्तकांची खरं तर भली मोठी यादीच आहे. त्या यादीवरून नुसती नजर जरी फिरवली तरी वाचकांचे औत्सुक्य जागे होते. त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी ‘मनातली माणसं’, ‘ हरवलेले स्नेहबंध’ यातून अनेक नामवंत अलौकीक व्यक्तींच्या जीवनाचा वेध घेतलेला दिसतो.
‘आठवणीतले दिवस’, ‘कहाणी हैदराबाद लढ्याची’ यामधून स्मरणरंजनाचा रंगलेला खेळ वर्तमान आणि इतिहासाचा धांडोळा घेतो. यात वर्तमानाचे स्पष्ट चित्र आणि इतिहासाचे मुक्त चिंतन यांचा सुंदर मिलाफ आहे.
‘कर्मयोगी संन्यासी’ , ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’, ‘ तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’, याशिवाय ‘स्वामी रामानंदतीर्थ’ यांचे चरित्र वाचताना त्यांच्या बहुपेडी लेखणीची साक्ष पटते.
‘नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज’, ‘नामदार गोखल्यांचं शहाणपण’, ‘न्यायमूर्ती केशवराव कोरटकर’ या पुस्तकातून समाजमनावर वर्षानुवर्ष आधिराज्य गाजवणा-या महनीय व्यक्तींचे कार्य एका अभ्यासू निरीक्षकाच्या नजरेतून उतरले आहे. या व्यक्ती रेखाटनातून अद्वीतीव व्यक्तींच्या भोवती असलेले खास वलय अधिकच लख्खं होत जाते.
‘तुमच्या माझ्या मनातलं ‘, ‘त्यांना समजून घेताना’ या ललित लेखनातून अनुभवांचा रेशीमकाठी पदर उलगडत जातो. ‘संघर्ष आणि शहाणपण ‘ , ‘ समाज आणि संस्कृती,’ ‘ सावलीचा शोध’ यातून सामाजिक चिंतनाचे मर्म एका जाणत्या मार्गदर्शकाचे पदचिह्न ठसवून जाते.
न्यायमूरत्ती या नात्याने चपळगावकरांनी केलेले कायदाविषयक लेखन सर्वसामान्य माणसाला अत्यंत उपयुक्त आहे. किचकट कायदा सुलभ भाषेत सहजपणे लिहीणारे न्यायमूर्ती चपळगावकर यांचे ‘राज्यघटनेचे अर्धशतक’, ‘विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन’. ही पुस्तके चिरंतन मोलाची ठरावी.
‘ संस्थानी माणसं’ हे पुस्तक अतिशय रंजक असून संस्थानिकांचा वैभवी इतिहास मांडतानाच, तो ईतिहास घडवणा-या त्या काळातील माणसांचा वेधही त्यांनी साक्षेपाने घेतल्याचा दिसतो. विशेषतः या पुस्तकाची प्रस्तावना ईतिहासाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी स्पष्ट करते. त्यांच्या मते, “ईतिहास दोन पध्दतीने सांगता येतो. एक म्हणजे, महत्वाचा घटनाक्रम सांगून त्यांची कारणमीमांसा मांडणे आणि दुसरी पध्दत आहे, ईतिहास घडवणा-या किंवा ईतिहासाने घडवलेल्या व्यक्तीमत्वांचा परिचय जाणून घेणे.
त्यांच्या या पुस्तकात संस्थानिकांचे वास्तव जीवन दर्शन अगदी थेट घडले आहे. यातील ‘सत्तेचा सूर्यास्त’ या प्रकरणात हैद्राबाद संस्थानच्या अंताची कहाणी अतिशय वाचनीय आहे. याच पुस्तकातील
‘ नवाब अली यावर जंग” यांच्यावरील लेख अतिशय वेधक आहे. ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते, त्यामुळे त्यांचे किस्से वाचताना अनेक संदर्भ ओळखीचे वाटतात. एकूणच या पुस्तकात संस्थानिकांच्या मावळत्या काळातील हरवलेल्या संस्कृतिचा पट रोमहर्षकपणे वाचकाला खिळवून ठेवतो.
”दीपमाळ ‘ या पुस्तकातून अनपेक्षितपणे भाषा आणि साहित्य यांची समृध्द जाण दर्शवणारी समीक्षा आली आहे. यातले काही परामर्ष साहित्याच्या अभ्यासकांना विचार करायला लावणारे आहेत.
नरेंद्र चपळगावकर यांची ही सर्व लेखन कारकीर्द एका फार मोठ्या काळाचा दीर्घ पट मांडते, त्यावर वर्तमानाची अक्षरं उमटून भविष्याचे चित्र दाखवते.
सरळ भाषा, साधी-सोपी निवेदन शैली, घटना- प्रसंगांचे विश्लेषण, व्यक्तीचित्रणातील स्वभाव रेखाटन करतानाह तौलनिक न्यायबुध्दीचा त्यांनी केलेला वापर, हे सारे गुण अलंकार लेऊन त्यांचे लेखन एक लखलखीत विचारांचे वैभव म्हणून मराठी साहित्याचे भूषण आहे.
विद्यार्थी दशेत असल्यापासून साहित्याची ओढ असलेल्या चपळगावकरांनी मराठवाडा साहित्य संमेलनाची सर्व अध्यक्षीय भाषणे संग्रहीत केली होती. आज तेच नरेंद्र चपळगावकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष
पदावरून आध्यक्षीय भाषण करतील. त्यांचे प्रांजळ मुक्त चिंतन ऐकायला साहित्याचा दरबार उत्सुक आहे.
प्रगाड विद्वत्ता, प्रगल्भ विचारशैली, अनुभवांचे ज्येष्ठत्वं हे सारे पैलू अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय पद अधिकच विभूषित करणारे आहे. चिंतनाची ही दीपमाळ तेजाळताना पहाणे, हा एक चिंतनानंद आहे. तो अनुभवायला हवा.

amruta.khakurdikar@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles