
‘पुस्तकातील पात्र डोळ्यासमोर सचित्र उभी करणे हेच पुस्तकांचे सामर्थ्य’; तेजपाल वाघ
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: कोविड काळानंतर आपण डिजिटल मीडियाच्या अधीन गेलो आहोत, परंतु पुस्तक हातात घेऊन त्याच्या नवेपणाचा वास घेणं, त्यातली काल्पनिक पात्र डोळ्यासमोर सचित्र ऊभी करणं हा अनुभव काही वेगळाच असतो. असा सुंदर वाचन अनुभव घेण्यासाठी आपण सर्वांनी पुस्तके वाचायलाच हवीत.” असे मत सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक- दिग्दर्शक आणि ‘वाघोबा प्रोडक्शन्स’ चे संचालक श्री. तेजपाल वाघ यांनी व्यक्त केले. डॉ. क्षमा गोवर्धने-शेलार लिखित ‘बायजा’ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
सप्तर्षी प्रकाशनातर्फे जुन्नर तालुक्यातील बेल्हा गावच्या डॉ.क्षमा शेलार यांच्या ‘बायजा’ कादंबरीचे प्रकाशन पुणे येथील ‘ऑर्किड इंटरनॅशनल’ येथे ‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ या मंचावर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पुढे बोलताना तेजपाल वाघ म्हणाले, ” डॉ. क्षमा शेलार यांचे लेखन अतिशय ओघवते असून ग्रामीण जीवन त्या नेमकेपणाने रेखाटतात. त्यांचे लेखन असेच बहरत राहो आणि त्यांना साहित्यामधले सर्वोच्च पुरस्कार लाभोत” अशा शुभेच्छा व्यक्त करून ‘बायजा’ कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
अभिनेते श्री. तेजपाल वाघ यांच्या ‘लागीर झालं जी’, ‘मन झालं बाजिंद’, ‘कारभारी लय भारी’ या लोकप्रिय मालिकांमधल्या भूमिका गाजल्या असून त्यांची ‘वाघोबा प्रोडक्शन्स’ ही संस्था ग्रामीण भागातील जीवन चित्रण करणा-या मालिकांची निर्मिती करण्यात अग्रणी आहे.
या प्रकाशन सोहळ्यास माजी ‘मिसेस इंडिया ब्युटीफूल’ आणि २०२२ चा ‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ किताब विजेत्या डॉ. मेधा भावे खास उपस्थित होत्या. याशिवाय ऊर्जा फाउंडेशनच्या संस्थापक डॉक्टर प्रेरणा बेरी काटीकर आणि डॉ प्राजक्ता शाह यांची विशेष उपस्थिती होती.
‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या गाजलेल्या चित्रपटाचे गायक श्री अवधूत गांधी आळंदीकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रतिभा गोवर्धने यांनी केले. मेडीक्वीन मिसेस महाराष्ट्राच्या सर्व स्पर्धक डॉक्टर्स आणि या क्षेत्रातील मान्यवर निमंत्रित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.