
शहीद वीर जवान, देशाची शान..!; रेखा सोनारे
‘१४ फेब्रुवारी’ सतत फेसबुकवर म्हणा, की व्हाट्सएप वर व्हॅलेंटाईन दिवसाचे काही बुद्धीला न पटणारे, भावनाहीन मेसेज फिरत राहणार. म्हणजेच प्रेमाचे प्रतिक म्हणून हा दिवस ओळखल्या जातो. पण, खरंच या दिवसाची गरज आहे ? कदाचित नवीन पिढी यात जास्तच गुरफटलेली आहे. पण प्रश्न येतो कोण कसा आणि कसल्या पद्धतींनी मनवतो. याचा मुळीच अतिरेक व्हायला नको इतकंच म्हणणं.. हा प्रेमाचा दिवस आपल्या कुटुंबासोबत सुद्धा मनवू शकतो. कुणी वृद्धाश्रमात सुद्धा जाऊन हा दिवस मनवतात. प्रत्येकजण आपआपल्या पद्धत्तीने साजरा करीत असतात, त्याबद्दल माझी तक्रार नाहीच. पण यातून आपण निर्भयपणे राहू शकतो का? आजची मुलगी किती सुरक्षित आहे ? मग मुलींनी पण ठरवायचे की, काय योग्य आणि काय अयोग्य.
अशाच या भावनाहींन पोस्ट बघता बघता १४ फेब्रुवारी या आत्मघातकी भ्याड हल्ल्याची आठवण करून देणारी एखादी पोस्ट या संवेदनशील मनाला सुन्न करणारी, विचार करण्यास भाग पाडणारी नजरेस पडते. मग वाटतं किती विरोधाभास हा. दोन बाबी वेगवेगळ्या टोकांवर मग कशाला हे नाटक व्हॅलेंटाईन दिवसाचे…!! असं वाटायला लागतं मग याच व्हॅलेंटाईन दिवसाला याच वर्षीपासून वीर शहिदांच्या नावांनी संबोधल्या का न जावं..!! हीच लाल गुलाबाची फुलं प्रियकर प्रेयसीच्या हातात देण्याऐवजी आपल्या देशासाठी प्राण देणाऱ्या, जीवाची बाजी लावणाऱ्या वीर जवानांच्या समाधीवर वाहावी लागतात. किती दुःखाची गोष्ट….!! याच दिवसाला कश्मीर पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाचे ४० वीर जवान बळी पडावेत… ! काय गुन्हा केला होता त्यांनी? देशाचे रक्षण करीत होते आणि करतात हाच तर त्यांचा मोठ्ठा गुन्हा आहे असंच म्हणाव लागेल.
CRPF ची मोठ्ठी तुकडी, पाठीमागून वार करण्यात यावा..अनपेक्षित आत्मघातकी हल्ला. गनिमांना माहिती होतं तोंडाकडून वार केला तर आम्ही जागीच गतप्राण होवू मग आपल्या वीर जवानांना मारण्यासाठी हा असा कट रचावा..किती भ्याड कुटनिती..!!खरच उर भरून येतो या वीर बांधवाप्रती..! देशाच्या सीमेवर लढणाऱ्या,आपल्या मातृभूमीसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या जवानांचा परिवार सुद्धा याच देशाचा भाग याच देशाची जनता …. मग त्यांना आजच्या दिवशी आपल्या जीवलगाची बातमी कळली असेल तेव्हा त्या धाय मोकलून रडत असेल तेव्हा आम्ही इकडे काय करीत असेल तर ? हा प्रश्न विचलित करणाराच आहे..किती सुविधा झेलल्या असेल त्यांनी ?आपल्या देशाच्या रक्षणासाठी स्वतः च्या जीवाची बाजी लावणारे , कर्तव्याप्रति निष्ठा असणारे , त्यांना काही सुविधा मिळो ना मिळो पण आपले कार्य चोख पणे पार पाडत असतात. कुठेही तक्रार नाही की प्रसिद्धीसाठी रडगाणे नाही हे आपले वीर जवान आपल्या देशाप्रती , सरकार प्रती, शाहिदाप्रती प्राणाची आहुती देवून सार्थक करणाऱ्या आमच्या या वीरजवानांना कोटी कोटी प्रणाम…!! कश्मीर पुलवामात हल्ला झालेल्या सर्व वीरबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली. जयहिंद..!
रंग प्रेमाचा, रंग सुमनांचा
रंग त्यागाचा, रंग भावनांचा
रंगात रंग भरुनी शेवटी मिळतो
रंग वीरजवानांच्या क्षयाचा….!!
रेखा सोनारे,नागपूर
लेखिका,कवयित्री