
‘शहरी नद्यांची पावित्र्य जपणूक व स्वच्छता अभियान’
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: हितेश वैद्य यांनी प्रास्ताविकात अभियानाची माहिती देताना सांगितले की, ‘नमामि गंगे’ योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेले ‘ शहरी नद्यांची पावित्र्य जपणूक व स्वच्छता अभियान ‘ हा उपक्रम प्रथम देशातील 35 शहरामधून सुरू झाला. आता 75 शहरांमध्ये या कार्याचा विस्तार झाला असून येत्या वर्षात ९५ ते १०५ शहरामध्ये ‘नदी स्वच्छता अभियान’ राबविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे” असे सांगून हितेश वैद्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा संदेशाचे व्यासपीठावरून वाचन केले.
स्थानिक संस्था व स्थानिक भाषा ‘नमामि गंगे’ उपक्रमास जोडण्याच्या दृष्टीने या अभियानात विशेष प्रयत्न होत असून या अभियानाच्या अनुषंगाने “प्रज्ञाम्बू” हे हिंदी भाषेतील त्रैमासिक प्रसिध्द करण्यात येते. या त्रैमासिकाचा मराठी अनुवाद पुण्यातून प्रसिध्द होतो. या मराठी अनुवाद अंकाचे प्रकाशन मंत्रीमहोदयांच्या हस्ते परिषदेच्या व्यासपीठावरून करण्यात आले. त्यावेळी ‘स्वच्छ गंगा’ योजनेचे समन्वयक आणि ‘प्रज्ञाम्बु’ अंकाचे प्रवर्तक प्रा. विनोद तारे व्यासपीठावर उपस्थित होते.
याशिवाय नदी स्वच्छता अभियानात उल्लेखनीय काम करणा-या महापालिका आयुक्तांचा या प्रसंगी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. देशातील ४० शहरातून नगरपालीकांचे आयुक्त, पाणी विषयात काम करणा-या विविध संस्था, जलतज्ञ व शास्त्रज्ञ आणि जलशक्ती मंत्रालय आणि गंगा स्वच्छता या प्रकल्पातील सचिव तसेच उच्च पदस्थ अधिकारी , नदी स्वच्छता कार्यास जोडलेले सेवाभावी कार्यकर्ते या परिषदेस बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या सर्व प्रतिनिधींना आपापल्या गावावरून पाणी आणण्यास सांगण्यात आले होते. ते सर्व पाणी एकत्र करून एका कलशात जमा करण्यात आले व व्यासपीठावर त्या कलशाचे पूजन मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पाणी विषयक समस्या आणि शाश्वत विकासाबाबतच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार लाॅरा सस्टेरिक यांनी पाणी टंचाई, समस्या व उपाय या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. कार्यक्रमाचा समारोप करताना पुणे महापालिका आयुक्त श्री. विक्रमकुमार यांनी आभार प्रदर्शन करून नदीच्या आजच्या स्थितीचे वर्णन करणारी एक कविता सादर केली.त्यास श्रोत्यांनी मनःपूर्वक दाद दिली.
दोन दिवस चालणा-या या परिषदेत नद्यांचे संरक्षण, संवर्धन, उपलब्ध पाणीसाठ्यांची जपणुक तसेच नदीचे पावित्र्य जपण्याच्या उपाय योजना तसेच नदीत केरकचरा, सांडपाणी आणि रसायने सोडणा-या विघातक स्रोतांचे उच्चाटन या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात येणार आहे.