
‘रेशमी घरटे’ मायेचा वर्षाव अन् नात्यांंची गुंफण; वृंदा करमरकर
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
खोपा इनला इनला
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा
ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या काव्यओळी किती अर्थपूर्ण आहेत. सुगरण पक्ष्यांच्या घरट्याचं वर्णन वरील काव्यपंक्तीत बहिणाबाई यांनी केलं आहे. या निसर्गात इवले इवले पक्षी काडी-काडी जोडून, वनस्पतींचे धागे,कापूस असं काही -बाही साहित्य वापरून ही घरटी बांधतात. ही घरटी तर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे असं म्हणतात. पक्षांपासून प्राण्यांपर्यंत सर्व आपापल्या ताकदीनुसार निवारा निवडतात. माणूस तरी त्याला कसा अपवाद असेल. माणसे कष्टातून, पै पै साठवून घर बांधतात. अर्थात आपल्या ऐपतीप्रमाणे. ज्या घरात आपले मायपिता,भावंडे आजी आजोबा, नातेवाईक असतील ते घर आपले असते. अगदी हक्काचे. कारण या घरात प्रेम आपुलकी, माया, मिळते. घर झोपडी असो वा बंगला….. पण तिथं जर आपलेपणा असेल तरच ते हवंहवंसं वाटतं.
“घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती|
तिथे असावा प्रेम, जिव्हाळा
नकोत नुसती नाती|
“या काव्यपंक्ती किती अर्थपूर्ण आहेत. नाती सुध्दा प्रेमानं, मायेनं फुलतात. अशा घरांत आपुलकी मिळते.
आज मराठीचे शिलेदार समूहाच्या बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी आपल्या आदरणीय राहुल सर यांनी
दिलेला “रेशमी घरटे” हा विषय वरवर साधा, सोपा वाटत होता. पण त्या विषयाला अनेक पैलू आहेत. बुधवारीय स्पर्धेत माझ्या रचनेची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केल्याबद्दल तसेच मुख्य प्रशासक राहुल सर व मुख्य परीक्षक सवू यांच्या छायाचित्राचे उत्कृष्ट सन्मानपत्र दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. खरे तर आभार मानणे हा साहित्यिकांचा धर्मच असायला हवा असे तरी मला वाटते.
बुधवारीय स्पर्धेच्या विषयपोस्ट मध्ये ‘परीक्षण कुणी लिहणार का’? अशी सूचना वाचून आधी मला सवूची आठवण आली. वाटले सरांनी असे का लिहले असावे? नक्कीच ‘सवू’ आजारी असावी असा अदमास मनी बांधून घेतला. तसेच फोनही तिचा खराब असल्याने काही समूह तात्पुरते सोडल्याचेही वाचले. म्हणून जरा धसकी घेतली. पण असो… सरांनी दिलेल्या विषयास नानाविध पैलू असले तरी, पक्ष्यांची घरटी, तसेच आपली घरे आहेतच. पण जेंव्हा काही सेवाभावी संस्था उभारल्या जातात, शिक्षण संस्थां सारख्या संस्थाही यात येतात. त्या अनुषंगाने आपल्या राहुल सरांनी ज्या मराठी भाषेच्या संवर्धनाच्या तळमळीतून निर्माण केलेला ‘मराठीचे शिलेदार समूह’ असाच घरकुला सारखा आहे. त्या समूहाचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याच्या उभारणीसाठी एक ध्यास, एक ध्येय घेऊन खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. त्याची निर्मिती त्यानंतरच झाली आहे. हे एक कुटुंब आहे असे म्हणावेसे वाटते. कारण रक्ताची नाती जेवढी घट्ट नसतील; तितकी आपली आपापसातील नाती दृढ आहेत. अशा कुटुंबातील जेव्हा काही सदस्य घर सोडून जातात. तेंव्हा, ज्यांनी समूहाची निर्मिती केली ते किती व्यथित होत असतील, त्याची कल्पना करताना ही मन भरून येते. असो…!
प्रत्येक स्पर्धेस परीक्षकांची लेखणी आपल्या परीक्षणातून सदस्यांना परिपक्व करीत असते. हे याच समूहात पहायला मिळते. सर्वच परीक्षक म्हणजे सवूताई, वैशालीताई, स्वातीताई, तारकाताई या सर्व महिला परीक्षकांनी मराठीचे शिलेदार समूहास खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले असल्याने, मला खरच त्यांचा अभिमान वाटतो.वटवृक्ष हा असाच रहावा त्याची ख्याती अधिकाधिक वाढत जावी. अशी मनोमन प्रार्थना करते. आज माझ्या रचनेस सर्वोत्कृष्टचा मान दिल्यामुळे मी पुनश्च मुख्य प्रशासक, संपादक राहुल सरांची आभारी आहे.
सौ.वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली, जिल्हाः सांगली.
©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह