
‘घुमली कान्हाची बासुरी’; नविन मराठी शाळेत रंगले बासरीवादन
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बासरीवादक डाॅ.पं.केशव गिंडे यांच्या वयाच्या ८१ व्या सहस्रचंद्रदर्शन वर्षानिमित्त “पारंपारिक बासरी ते केशव वेणू” हा बासरीवादनाचा बहारदार द्रुकश्राव्य कार्यक्रम नविन मराठी शाळेच्या प्रांगणात नुकताच रंगला होता. प्रसिध्द बासरीवादक डॉ. पं. केशव गिंडे गुरुजी यांना वयाची ८१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने “पारंपारिक बासरी ते केशव वेणू” हा बासरीचा प्रवास सांगणारा द्रुकश्राव्य सादरीकरणासह सादर झाला. असे बासरीवादन कार्यक्रम ८१ शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याचा संकल्प त्यांचे तरूण शिष्य सिध्दांत मिलिंद कांबळे याने केला आहे. या अनुषंगाने नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष समारंभानिमित्त हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी सिध्दांत याच्या संकल्प मालेतील हे १५ वे पुष्प गुंफले गेले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या हस्ते सिद्धांत कांबळे याचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात कल्पना वाघ यांनी सिध्दांत या युवा कलासाधकाची गुरुंवरील निष्ठा अत्यंत प्रशंसनीय व आदर्श आहे , असे गौरोवदणार काढले.
सिध्दांत याने बासरी वादन सादर करताना विद्यार्थांना वादन कलेचे वैशिष्ट्य,सुरावटीचे शास्त्र व बासरीचे प्रकार यांची माहिती दिली. नविन मराठी शाळेचे विद्यार्थी या कार्यक्रमात अतिशय रममाण झालेले दिसले. बासरीच्या मधुर स्वरात शाळेचा परिसर आणि भोवतीचे सर्व वातावरण संपूर्ण सूरमयी होवून गेले. जणु ‘घुमली कान्हाची बासुरी’ असा भारावून टाकणारा अनुभव श्रोत्यांना आला.
बासरीवादक सिद्धांत मिलिंद कांबळे हा श्री शिवाजी विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात ईयत्ता अकरावीमध्ये शिकत आहे. शास्त्रीय संगीत शिकण्यास त्याने वयाच्या साडेतीन वर्षापासून सुरुवात केली. किराणा घराण्याचे गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्याकडे तो सध्या गायनाचे धडे गिरवत आहे. पाचवीत असतानाच त्याने प्रथम उभी बासरी वाजवण्यास सुरुवात केली. पुढे नववीत गेल्यावर आडवी बासरी शिकण्यासाठी प्रसिद्ध बासरी वादक पंडित केशव गिंडे गुरुजी यांच्याकडे त्याने बासरी शिकण्यास प्रारंभ केला.
पं. केशव गिंडे गुरुजी हे बासरीवादन नवीन विद्यार्थ्याने अतिशय प्रेमाने व आत्मियतेने शिकवतातच, पण त्याचबरोबर बासरीचे विविध प्रकार हाताळून त्यावर प्रयोग आणि संशोधन सुध्दा करतात. त्यांनी संशोधित केलेली ‘केशव वेणू’ ही लोकप्रिय बासरी सिद्धांत अगदी तन्मयतेने आणि खुबीने वाजवतो.
विशेष म्हणजे सिद्धांतला बासरी वादनास वर्ष २०२२-२३ या वर्षासाठी अमूल्य ज्योती ‘पंडित पन्नालाल घोष मेमोरियल ट्रस्ट’ यांच्यावतीने मानाची शिष्यवृत्ती नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. सिद्धांतने आजपर्यंत अनेक ठिकाणी बासरी वादनाचे कार्यक्रम केले असून त्यापैकी लक्ष्मी बाजार प्रतिष्ठान- पुणे येथे “दिवाळी पहाट” हा त्याचा कार्यकम खूपच गाजला. तसेच श्री दत्ताश्रम सांगवी येथे दत्त जयंती निमित्ताने संगीत महोत्सवात केलेले त्याचे बासरी वादन श्रोत्यांची विशेष दाद मिळवणारे ठरले. त्याने यापूर्वी जेष्ठ नागरिक संघ व संस्कार भारतीच्या वतीने ऑनलाइन बासरी वादनाचा कार्यक्रमही सादर केला आहे.
नविन मराठी शाळेत झालेल्या सिध्दांतच्या बासरीवादन कार्यक्रमाचे नियोजन सोनाली मुंढे ,वंदना कदम यांनी केले होते. त्याच्या या गुरू समर्पित संकल्प उपक्रमास शाळा समिती अध्यक्ष डॉ प्राची साठे,ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने व धनंजय तळपे यांनी सिध्दांतच्या संकल्पपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री हजारे यांनी केले.
अमूल्य ज्योती आणि केशव वेणू प्रतिष्ठान यांच्या वतीने येत्या 5 मार्च रोजी सहस्त्रदर्शन संगीत सोहळ्यात पं. गिंडे यांच्या सांगितिक कार्यावर आधारीत ‘नादब्रह्म’ चित्रफीतीचे उदघाटन करवीरपीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ कर्वेनगर येथील कर्नाटक हायस्कूल च्या सभागृहात आयोजित केला आहे, अशी माहिती सिध्दांत कांबळे याने यावेळी दिली.