
‘स्त्री पुरुष समानता….!!’;राधा खानझोडे
कुटुंबरूपी रथ मुख्यत्वे दोन गोष्टींच्या आधारावर सुरळीत चालत असतो. पहिला पुरुष, ज्याला आपण सारथी म्हणू आणि दुसरी स्त्री, ती या रथाचे चाक या रथाचे चाकच भक्कम नसेल, तर त्याच्या कुशलतेला फारसे महत्त्व नसते. सांगायचे तात्पर्य म्हणजे, संसार किंवा समाजाचा रथ सुरळीत चालण्यासाठी पुरुष जितका महत्त्वाचा आहे तितकीच महत्त्वाची स्त्री आहे. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे आधिपत्य स्वीकारतांना किंतु परंतु आजही आपण पाहतो. मागे कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्स पासून ते बहीण, मुलगी, पत्नी आणि आई म्हणून समाज आणि कुटुंबाला टिकविण्याचा जो पुरुषार्थ तिने केला. तो फक्त तीच करू शकते. प्रत्येक आव्हानांना पेलण्याचे अवघड काम ती करते. आज, पती-पत्नी दोघेही पैसे कमवायला लागले. या महागाईच्या काळात ते जरुरी झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया, मुली आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडताना दिसतात. असं कुठलं क्षेत्र नाही, तिथे स्त्रिया नाहीत. चित्र पार बदलून गेलं आहे; पण आजही स्त्रीला दुय्यम दर्जा का देतात? मोठ-मोठ्या पदावर आज स्त्रिया आहेत पुरुषांचा दृष्टिकोन बदलला का? सगळेच पुरुषांच्या असे असतात असे नाही निष्ठावंत पुरुषही बरेच असतात ते स्त्रियांची जाण ठेवतात तिला समानतेने वागवतात.
त्या काळात स्त्रियांच्या समानतेच्या हक्कासाठी लढा दिला. ते प्रथम पुरुष होते ज्योतिबा फुले. आपल्या देशात पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्या सावित्रीबाई फुले. त्यांनी त्या काळातही विरोधकांना न जुमानता सावित्रीबाईंना शिक्षण क्षेत्रात खेचून आणले तो भाग वेगळा. पण आज स्त्री शिक्षित आहे, मोठ्या मोठ्या पदावर आहे. पण, तिची घरी होणारी ससेहोलपट आपण बघतोच. बहुतेक घरात स्त्री-पुरुष दोघेही नोकरी करतात. संध्याकाळी दोघेही परत येतात. तेव्हा आपण काय बघतो पुरुष म्हणतो, अगं थकलो फार चहा कॉफी काहीतरी घेऊन ये येताना पाणी पण आण बरं का? पत्नीला ऑर्डर सोडतो. पण तिची अवस्था काय तिचा विचार केला का कोणी? ती मूळी थकलीच नाही. कारण ती स्त्री आहे. तिला किचन सांभाळण्याचा पूर्ण अधिकार आहे नाही का? तिची विचारपूस कोण करणार? घरी आल्यावर नवरा सोफ्यावर आडवा होतो व ती किचनकडे वळते.
सोबतीला तिला बिलगलेली लहान मुलं, म्हातारे सासू-सासरे सर्वांची जबाबदारी पार पाडत ती एक दिवस पुढे ढकलत असते. तिच्या मनाचा विचार करायला कुणाजवळ वेळ आहे.? सगळ्यांना माहीतच आहे ते तीचच काम आहे. कारण ती एक स्त्री आहे. तिलाही वाटतं हे माझंच काम आहे. पण तिथे तिला म्हणतो का? कि तू पण ऑफिस मधून आली आहे. थकली असेल बैस थोडा वेळ. ‘मी करतो मदत’, काळजी करू नको. असे सगळेच पुरुष असतात असे नाही पण हे चित्र घराघरात दिसून येतं. मग स्त्री पुरुष समानता कसे म्हणता येईल. ती चालती बोलती घरातली मशीनच ना तिला मन आहे ना भावना. पण लक्षात ठेवा आज स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे “स्त्री बिना घर सूना”स्त्रिया घराची शोभा नाही शोभिवंत मूर्ति नाही तर ती एक जीती जागती लक्ष्मी आहे तिचा आदर करा समानतेचा दर्जा द्या तिचा सन्मान करा.
‘संसाराचा गाडा आपण
ओढू दोघे मिळूनी,
साथ तुझी नि माझी
घेऊ समानतेने जुळूनी’
राधा खानझोडे, नागपूर
ज्येष्ठ लेखिका, कवयित्री