
भ्रूणहत्या
भ्रूणहत्या करू नका
नका चुरगळू कळी
हिन लेखता नारीला
असे कल्पना खुळी…!!१!!
हवा मुलगा सर्वांना
सारा का हो अट्टाहास
आली मुलगी जन्माला
शोभा घराची ती खास…!!२!!
कुलदीपक वंशाचा
मुलगाच म्हणतिया
सांगा कशातच ती कमी
घ्यावे आता जाणुनिया…!!३!!
लेक आलीया घराला
आनंदाने स्वीकारावे
नका करू ना अव्हेर
जीवनास आकारावे…!!४!!
नरनारी सारखेच
विधात्याची जुळवणी
येता उदरी मानवा
तीच तुझी रे जननी…!!५!!
झाशी राणी, दुर्गा तूच
भारताची आहे शान
खुडू नका हो कळीला
सारखाच द्यावा मान..!!६!!
अंगणात तुळस ही
शोभा आहे दाराची
नारी जातीचा सन्मान
शान आपल्या घराची…!!७!!
सौ. राधा खानझोडे नागपूर
========