
‘आहार,विहार, विचार व व्यायाम हीच महिलांची चतुसूत्री’; डॉ. रश्मी निकम
सिलवासा: केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेरीगोल्ड हॉस्पिटल सिलवासाच्या संचालिका व सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. रश्मी निकम या उपस्थित होत्या.
याप्रसंगी महिलांशी हितगुज साधताना डॉ.रश्मी निकम यांनी आपल्या मनोगतातून आहार ,विहार,विचार व व्यायाम यांचे महत्त्व विशद केले.प्रत्येक महिलेला सकारात्मक विचारांची गरज असून कुटुंबासाठी तर आपण करतोच सोबत स्वतःसाठी वेळ काढून आपले मानसिक आरोग्य, मुलांच्या आवडीनिवडी व आत्मविश्वास जपावा असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले .कार्यक्रमाच्या आयोजक जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे या होत्या.कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व जिजाऊंच्या प्रतिमेचे करून पुष्पहार अर्पण करण्यात आले मुख्य अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
महिला दिना विषयीच्या आपल्या मनोगतातून कोषाध्यक्ष मेघा वाघ यांनी महिला दिनाची परंपरा जोपासणे का गरजेचे आहे हे सांगून बदलत्या काळात महिलांनी अधिकाधिक सक्षम व्हावे असे आवाहन केले.
याप्रसंगी सर्व महिला भगिनींसाठी विशेष खेळांचे आयोजन करण्यात आलेले होते.यात सर्वांनी सहभाग घेऊन आनंद द्विगुणीत केला. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पहावयास मिळाला.खेळातील विजेत्यांना डाॕ.रश्मी निकम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेडच्या महासचिव विद्या कणसे यांनी केले. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून सविता पाटील ठाकरे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.