
जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रा.पं.सदस्यास निवडणूक निर्णय अधिकारीचे अभय
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: तालुक्यातील पन्हाळा ग्रामपंचायतीची निवडणूक १८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आली होती. ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार सहा महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.परंतु पन्हाळा येथील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याने आज तागायत आपले जात वैधता प्रमाणपत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात दाखल केलेलेच नाही. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या ग्रामपंचायत सदस्य वर अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून तक्रार कर्त्याचे वतीने करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक आरक्षित जागेवर निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामांकन पत्र भरते वेळेस सहा महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतची हमी दिलेली असते. या नियमाला तिरंजली देत ग्रामपंचायत पन्हाळा येथील इतर मागास प्रवर्ग महिला करीता आरक्षित असलेल्या जागेवर निवडून आलेल्या सदस्य सौ. उषा किशोर चव्हाण यांनी आज तागायत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेली नाही.
संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे गावातील काही सुज्ञ नागरिकांनी वारंवार जात वैधता प्रमाणपत्र का देण्यात आलेले नाही याबाबत विचारणा केली असता अशा नागरिकांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उडवा उडवी ची उत्तरे देऊन ग्रामपंचायत सदस्य यांना अभय देत असल्याचा आरोप तक्रारदरानी आपल्या निवेदनामध्ये नमूद केला आहे.
जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यास अपात्र घोषित करण्यात यावे.जात प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुदतीचे आत संबंधित उमेदवाराकडून घेतले नाही. संबंधित ग्रामपंचायत सदस्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही केलेली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी हे संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार प्रस्थापित करून संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांना अभय देत असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यावर सुद्धा दंडात्मक तथा शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी.अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे तक्रारदराचे लक्ष लागले आहे.