‘शेतकरीच संपला, तर शेतीही संपेल’; स्वाती मराडे

‘शेतकरीच संपला, तर शेतीही संपेल’; स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरूवारीय स्पर्धेचे काव्यपरीक्षण_

नांगरणी झाली.. रानही तापलं.. काळ्या मेघांनी आभाळ व्यापलं.. मनासारखं पडलं यंदा पावसाचं दान.. पडू लागलं भुईला हिरवं सपान.. सुरू झाली कास्तकाराची लगबग.. भरली काळ्या आईची ओटी.. सांडले बघा रानामंदी त्याच्या घामाचे मोती.. अन् हिरवं पीक आनंदात डोलू लागलं.. किती भारी वाटतं ना हे वाचताना. पण हे सगळं दुरून डोंगर साजरे हा प्रकार बरं का.

कारण बी बियाणं आणायला करावी लागते पैशापाण्याची जुळवाजुळव.. कुणी करतो उसनवार.. कुणी गाठतो सावकार.. कुणी घेतो बॅंकेकडून तारण ठेऊन ऋणभार.. तेव्हा कुठे तो भरतो काळ्या आईची ओटी.. पेरणी होते.. पाणी दिलं जातं. खुरपणी करावी लागते..मात्रा खतांची असतेच.. तेव्हा कुठं हिरवं पीक आनंदात डोलू लागतं.. पण हाय रे दैवा हे काय.. कीड आणि रोगानं कसं त्याला घेरलं.. आता आलाच का पुन्हा औषधांचा भार.. वाढता वाढता वाढतो खर्चाचा भार.. पुन्हा पैशाची जुळवाजुळव आणि कृषीवलाची धावपळ. तरीही ओढाताण करत पीक त्यानं जपलेलं.
सगळं पीक आता कसं मनासारखं जुळून आलं.. धरणी आईनं मोत्याचं दान पदरात घातलं. ही धान्याची रास बाजारात नेऊन मिळेल का त्याला धनाची रास..? पण तिथंही दैवगती आडवीच आली. अन्नधान्याचे भाव पडले अन् शेतकऱ्यालाच आडवे करून गेले. तरीही मिळेल ते पदरात घेऊन माघारी तो आला. या पिकात नाहीतर दुस-या पिकात फायदा होईल हा विचार करू लागला.

पुन्हा जोमाने कामाला लागला. यावेळी भाजीपाला केला. या पिकाला हवे होते भरपूर मजूर.. मजूर काही मिळेना.‌ दामदुप्पट देऊन ही काम काही करेना. जिवाची कसरत करत पीक आणलं.. बाजारात नेलं. माॅलमधे ब्रॅण्डच्या नावाखाली छापील किंमतीत खरेदी करणारा ग्राहकही इथं शेतकऱ्याकडे निम्म्या किमतीत मागू लागला. पण देणार नाही तो‌ शेतकरी कसला. घरचंच आहे असा विचार करून देतो. वर मापापेक्षा जास्तही घालतो. सोबत एखादं लहान मूल असेल तर एखादी काकडी, गाजर सहज त्याच्या हातावर ठेवतो पण हे सगळं करताना त्याचा व्यवहार मात्र आतबट्ट्याचाच ठरतो. त्याच्या मालाला भावमोल न करता विकत घेण्याचा सुज्ञपणा दाखवणारे कधी त्याला भेटतील काय?

पुन्हा तो नवा डाव मांडतो. तारेवरची कसरत करून सगळं जुळवून आणतो. बहरलेलं पीक पाहून हरखून जातो. पण यावेळीही नशिबाने दगा दिलाच. अवकाळी पाऊस आला आणि होतंनव्हतं ते लुटून गेला.. त्याचं सपान तर डोळ्यातच वाहिलं.. काय करू मी कसं भागवू.. ऋणभार वाढतच चाललाय.. शेतीचा मी केवळ जुगारच खेळलाय.. नाही सहन होत आता… आत्महत्या करावी का.. हा टोकाचा विचारही मनात डोकावून जातो. काहीजण तसे करतातही. शेतकरी संपतो पण त्याची व्यथा संफत नाही.

कधी कधी शासन विचार करतं कर्जमाफीचा‌. तेव्हाही काहीजण सहजपणे बोलून जातात.. काय करतो हा शेतकरी त्याला कशाला हवी कर्जमाफी.. असे म्हणणारांनी शेती एकदा करूनच बघावी. त्याशिवाय त्याच्या दु:खाचं आभाळ समजणारच नाही. अरे शेतकरीच संपला तर शेतीही संपेल. अन् मग खाणार काय आभासी जगातील आभासी अन्न..!

आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले करूणामयी चित्र पाहून ‘आत्महत्या करावी का?’ काळजाला हात घालणारा हा शेतकऱ्याचा सवाल मन हेलावून गेला. आज शेतकरी प्रश्न रचनेतून मांडण्यासाठी आपणा सर्वांची लेखणी सरसावली. सकारात्मक विचारांची पेरणी करत पुन्हा लढण्याची उभारीही दिली. जमीनदोस्त झालेलं पीक पाहून जमीनदोस्त झालेला कृषीवल तुमच्या रचनेतून वाचताना मनास हळहळ लावून गेला. खरेतर केवळ लेखणीतूनच नको तर प्रत्यक्षातही आपण शेतकरी व शेती जिवंत ठेवण्यासाठी हातभार लावूया. जय जवान जय किसान अभिमानाने म्हणतो आपण.. प्रत्येक जण देशसेवेसाठी सीमेवर जाऊन लढू शकत नाही पण छोट्या छोट्या कृतीतून देशसेवा करू शकतो. तेव्हा मोलभाव करताना व्यापा-याकडे करा पण किसानाकडे कधीही करू नका. हीच खरी कास्तकारासाठी मोलाची मदत ठरेल. सर्व सहभागी रचनाकारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

सौ स्वाती मराडे, पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles