
‘रक्तचंदन… बहुगुणी बहुआयामी दुर्मिळ वनस्पती…!’; वैशाली अंड्रस्कर
*_शनिवारीय काव्यस्तंभ परीक्षण_*
माझ्या आजीच्या खोलीत
होती एक रक्तचंदनी बाहुली
वीतभर बाहुलीची मग त्या
हातभर पडे छान साऊली
आजी सांगायची मज तेव्हा
रक्तचंदनाची गं ही बाहुली
असे मोठी बरं का बहुगुणी
असो डोकेदुखी वा अर्धशिशी
उगाळून लावता कपाळाला
वेदना चुटकीसरशी होई नाहिशी
आजीसवे आता कुठे हरवली
ती रक्तचंदनाची गुणी बाहुली ?
बाई आणि रक्तचंदन दोघीही
झिजून झिजून श्रांत का निमाली ?
‘रक्तचंदन’ या विषयावरील माझी ही फार जुनी कविता. आज मराठीचे शिलेदार समूहात माननीय राहुलदादा पाटील यांनी दिलेला ‘शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचा विषय ‘रक्तचंदन’ या निमित्ताने तिचे पुनरावलोकन केले आणि आठवत गेले त्या रक्तचंदनी बाहुलीला…एक बहुगुणी आयुर्वेदिक औषधी गुण असलेली ही बाहुली आजीने किती जतन करून ठेवलेली. बहुमूल्य असूनही मात्र माझ्या बालपणी आजीने मला खेळायला दिलेली. आज आजी पण नाही आणि ती बाहुली पण कुठे गेली आठवत नाही. कदाचित ‘बाई आणि रक्तचंदनी बाहुली दोघीही झिजून झिजून श्रांत का निमाली…’ या ओळींप्रमाणे दोघीही श्रांत निमाल्या…!
रक्तचंदनाला इंग्रजी मध्ये Red Sandal Wood आणि शास्त्रीय परिभाषेत ‘टेरोकार्पस सॅंटॅलीनस’ म्हणतात. दक्षिण भारताच्या पूर्व घाटातील शेषाचलमच्या पर्वतरांगांमध्ये हा वृक्ष आढळतो. याची उंची आठ ते अकरा मीटर असते. हे झाड सावकाश वाढतं त्यामुळे याची घनता जास्त असते आणि म्हणूनच इतर लाकडे पाण्यावर तरंगली तरी रक्तचंदनाचे खोड पाण्यात बुडते. हे खोड मजबूत असल्याने ह्यापासून कलाकुसरीच्या वस्तू, फर्निचर, देवाच्या मूर्ती, बुद्धिबळाच्या सोंगट्या यांसारख्या इतरही अनेक वस्तू बनवल्या जातात. त्याच्या झाडाची पाने आणि इतर अवयव यांपासून सौंदर्य प्रसाधने, औषधी लेप यांसारखे उपयोगही प्रचलित आहेत. मात्र रक्तचंदनाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणीमुळे त्याची तस्करी करून बक्कळ पैसा कमावणारे त्यासाठी रक्तपात करणारे गुन्हेगारही तयार झालेले आहेत हेही आपण नुकत्याच ‘पुष्पा – द राईज’ या दाक्षिणात्य चित्रपटातून बघितले. अशा या विविधांगी आशयावर मराठीचे शिलेदारांनी रचना करून विषयाला छान न्याय दिला. सर्वांचे खूप खूप अभिनंदन…!
परंतु आज जरा रक्तचंदनाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघू या. आपल्याकडे बऱ्याच जणांकडे पूजेअर्चेसमयी चंदनी टिळा लावण्याची प्रथा आहे. जो पांढऱ्या सुगंधी चंदनाचा असतो. काही ठिकाणी लाल चंदनाचा पण टिळा लावला जातो असे ऐकिवात आहे. पण मला वाटते मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणारे, रक्त सांडणारे शूर सैनिकसुद्धा जणू आपल्या धरणीमातेला रक्तचंदनाचा टिळा लावतात आणि म्हणूनच आपण सर्व देशवासी सुखेनैव निद्रा घेऊ शकतो. मग आपण मातृभूमीला नाही रक्तचंदनाचा टिळा लावू शकलो तरी आपल्याला जिथे शक्य तिथे आपल्या संवैधानिक कर्तव्याचे पालन करून नाही का देशसेवा करू शकत….?
*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*