
‘माझ्या मायभूमीत’ किल्ले रायगड
महाराष्ट्राची ओळख गडकिल्ल्यांविना पूर्ण होऊच शकत नाही. तेव्हा आजपासून पाहुया महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची माहिती.आजचे पहिले पान.. रायगडासाठी..!! सह्याद्रीच्या कुशीत वसलेला. समुद्र सपाटीपासून २७०० फूट उंचीवर असलेला हा किल्ला. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदातरी पहावा असा किल्ला म्हणजे रायगड. १०३० साली चंद्रराव मोरे यांनी बांधलेला हा रायरी किल्ला. १६५६ साली तो स्वराज्यात आला. शिवछत्रपतींनी त्याचा जीर्णोद्धार व विस्तार केला. ज्याच्या कणकणाने १६७४ मध्ये शिवराज्याभिषेक अनुभवला. नि रायरीचा रायगड झाला…तो राजाचा किल्ला… रायगड.
स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या या किल्ल्याची भव्यता समजायला, त्याची भ्रमंती करायलाच हवी. खरेतर किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था आहे. पण त्यातून केवळ वरचा भाग सपाटीवर पाहिला जातो. जेव्हा पाय-या चढून किंवा उतरून किल्ल्याची भटकंती होते. तेव्हाच त्याचं असामान्यत्व मनाला भुरळ घालतं. हे सगळं पहात असतानाच स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून ताक, पिठलं भाकरी, रानमेवा यांचादेखील आस्वाद घेता येतो.
किल्ल्यावर शिवरायांची समाधी, शिवमंदिर, राजदरबार आहे. याशिवाय किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, राणीवसा, मेणादरवाजा यांचे अवशेष.. हिरकणी बुरूज, टकमक टोक, तलाव हे किल्ल्यावर असणारे इतिहासाचे साक्षीदार.. किल्ल्यावर चढत असताना सभोवताली असणारी झाडी व आजूबाजूचे उंच डोंगर.. पावसाळ्यात गेले तर ढगांची गर्दी.. अन् हिवाळ्यात सकाळच्या वेळी दाटलेले धुके.. याचाही अनुभव मिळतो. पायथ्याशी पाचाड मध्ये जिजामाता राजवाडा आहे. शिवाय जवळच असणारे महड हे छोटे शहर. अष्टविनायकांपैकी वरदविनायकाचे स्थान. याच शहरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असून त्यात लेणी व प्राचीन वस्तू आहेत.
आठवड्यातील सातही दिवस येथे जाता येते. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम. ट्रेकिंग करणारे पावसाळ्यात हौसेने जातात. बसची सोय आहेच. दूरवरून यायचे असल्यास पुणे किंवा मुंबई या ठिकाणी विमानाने येऊन पुढचा प्रवास करता येतो. रायगड पासून ४० किमी अंतरावर पुणे मुंबई रेल्वेमार्गावरील वीर रेल्वे स्टेशन आहे. किल्ल्याची भव्यता अनुभवत असताना पदोपदी छत्रपती शिवरायांचरणी मन नतमस्तक होते. इतिहासाच्या पाऊलखुणांनी छाती अभिमानाने फुलते..जय जिजाऊ जय शिवराय.
स्वाती मराडे, पुणे
सहसंपादक, ‘साप्ताहिक साहित्यगंध’