
सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डिके शिवकुमार उपमुख्यमंत्री
_आम्ही तुम्हाला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ.”राहुल गांधी_
कर्नाटक: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची तर, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक विरोधी पक्षांचे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांनी आपली एकजूट दाखवली. या सोहळ्यात नितीश कुमार, एमके स्टॅलिन, तेजस्वी यादव, मेहबुबा मुफ्ती मंचावर पोहोचले. तिथे मंचावर कमल हसन, सीताराम येचुरी, फारुख अब्दुल्ला, डी राजा, दीपंकर भट्टाचार्य, सीएम अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सुखविंदर सिंग सुखू उपस्थित होते.
“कर्नाटकातील जनतेने द्वेषाचा पराभव केला. कर्नाटकाने द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले आहे. आम्ही खोटी आश्वासने देत नाही, काँग्रेसने दिलेली 5 आश्वासने कर्नाटक सरकारच्या काही तासांत होणाऱ्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मान्य केली जातील. आम्ही तुम्हाला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ.” असे राहुल गांधी म्हणाले.
*काय आहेत काँग्रेसची पाच आश्वासने*
1. 200 युनिटपर्यंत मोफत वीज
2. गरीब कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार
3. महिलांसाठी मोफत सार्वजनिक वाहतूक
4. दोन वर्षांसाठी बेरोजगारांसाठी भत्ता – पदवीधरांसाठी तीन हजार, डिप्लोमासाठी दीड हजार
5. बीपीएल कुटुंबांना दहा किलो मोफत तांदूळ