
घडविण्या सक्षम पिढी….कोमेजलेली मने फुलवू या…! वैशाली अंड्रस्कर
_शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण_
*गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या*
*का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या..*
*उभय पितरांच्या चित्तचोरटीला……*
*कोण माझ्या बोलले गोरटीला…….*
ज्येष्ठ कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी ‘बी’ यांच्या कवितेतील ह्या ओळी म्हणजे मैत्रिणींनी हिणवल्यामुळे हिरमुसलेल्या लेकीची समजूत काढणाऱ्या पित्याचे आर्जव…आज ‘कोमेजले मन’ या शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने आठवले.
टवटवीत फुले बहर ओसरला की कोमेजतात, म्लान होतात… सकाळी ताठ मानेने फांदीवर झुलणारी फुले संध्याकाळी सुकली की माना टाकतात. हा निसर्गनियच त्यांचा…असंच काहीसं आपल्या मनाचही असतं. मात्र ही मने कोमेजायला आंतरिक इच्छा आकांक्षेसोबतच कधी कधी बाह्यघटक जसे, नातेसंबंध, आर्थिक ताणतणाव, आजारपण, नैराश्याची भावना हेही कारणीभूत ठरतात.
आज मराठीचे शिलेदार समूहातील रचनांचा आढावा घेताना सहचराचा विरह, प्रेमीजनांतील ताणेबाणे, बा विठ्ठलाच्या नामस्मरणाने कोमेजलेल्या मनास आलेले नवचैतन्य या रचनांबरोबरच काही वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रचनाही नजरेस पडल्या.
रेखाताई सोनारे, नागपूर यांचे मन भकास वाड्याला बघून कोमेजते तर शर्मिला देशमुख -घुमरे, बीड सद्यस्थितीतील भ्रष्टाचार, शासनाची डळमळीत धोरणे या सर्व गोष्टींनी कोमेजलेल्या मनाला व्यक्त करतात. ज्योती कार्लेवार, चंद्रपूर नोकरीमुळे कुटुंबातील माणसांचा दुरावा, भेटीगाठीच्या मर्यादा यांमुळे व्यवसाय करण्यासाठी धमक जागविण्याचा आणि सहवासाने कोमेजले मन फुलविण्याचा प्रयत्न करतात. मायादेवी गायकवाड, मानवत, परभणीहून शिक्षण करिअर यांच्या धबडग्यात सूर हरवलेल्या मुलांना आशा अपेक्षांचे ओझे न बाळगता योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा देतात, तर वसुधाताई नाईक, पुणे यांची लेखणी मैत्रीची वाट कोमेजलेले मन फुलविण्यासाठी कशी साह्यभूत ठरते हे सांगून जातात. तसेच छत्रपती संभाजीनगरहून विष्णूदादा संकपाळ यांची उध्वस्त झालेल्या घरट्यातील पिलांसाठी विलाप करणारी कोमेजलेल्या मनाची पक्षिणी ह्दय पिळवटून टाकते. मीता नानवटकर, नागपूरहून लिहिते….!
नैराश्य तिमीरी हरवून
खचले मन जेंव्हा
आशावाद शिकवणारा
झाला शिक्षक तू तेंव्हा
आशावाद शिकविणारा शिक्षक…खरेच शिक्षक म्हणजे फक्त अक्षरओळख करून देणारा, अंक आकड्याची मोजदाद शिकविणारा व्यावसायिक नसून तो बालकाच्या मनाचा ठाव घेऊन त्याच्यातल्या सुप्त गुणांना चालना देणारा, त्यांच्यातील न्यूनता शोधून मनी आशावाद जागवणारा खरा शिक्षक असतो. कवी ‘बी’ यांनी वर्णिलेल्या पित्याप्रमाणेच तो गुरू असतो. आज आपण बघतो कितीतरी बालके घरातील वादविवाद, गरिबी, आप्तजनांकडूनच होणारे शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचार यांमुळे कोमेजून जातात. लहान वयामुळे कोणी त्यांचे ऐकूनही घ्यायला तयार नसतात. मात्र हे सर्व कुठेतरी थांबायला हवे. तरच उद्याची सक्षम पिढी तयार होईल. त्यासाठी घर, समाज आणि शासन या सर्व स्तरांवर कार्य अपेक्षित आहे. चला कुठेतरी आपणही या कार्याला हातभार लावू या आणि कोमेजलेली मने परत फुलवू या… सर्वांना शुभेच्छा…!
*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*