शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कोमेजले मन*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

क्षितीजावर सांजरंग
आज का उदासले
विराणीचे सूर असे
ओठावरी उमटले

याद तुझी दाटूनिया
मनासी या छळतसे
चांदणेही पसरलेले
आज मज जाळतसे

वेड्या मना पानोपानी
होती तुझेच भास
कोमेजले मन माझे
मनाला तुझीच आस

तुझ्या विना जगणे
मजसी सोसवेना
आषाढ जरी आला
सर एक कोसळेना

येशील परतूनी तू
चांदणल्या राती
साक्ष मम मनाची
ऋतू रंगात भिजती

अजूनी तनामनांत 
तो गंध केवड्याचा
अजूनी उरात माझ्या
आवेग असोशीचा

वाटेचे तुझ्या सखया
करिते फिरूनी औक्षण
तुझ्याविना युग भासे
मजसी रे क्षण क्षण

*रचना ःवृंदा(चित्रा)करमरकर*
सांगली जिल्हाःसांगली.
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

तुझ्याविन सख्या मज
क्षण युगाचा भासतसे
काळोख मिठी भवती
एकलीच मी रे राहतसे

शिशिरातील पानगळ
नको जाहले हे जिणे
तुझ्या विरह वेदनात
नकोय आर्त विव्हळणे

जीवाची या घालमेल
कोण मला सावरी रे
याद अनावर होतीय
उदास मना आवरी रे

वैराण रान सभोवती
नसे फुलांचा दरवळ
तना मनास घेरलेली
अशी नैराश्य मरगळ

नको जरासाही आता
लवलेश मज वेदनेचा
तुझ्या मिठीत लाभू दे
क्षणोक्षण मज प्रेमाचा

कानी माळलेली कुंडलं
रे कशी गळून पडली
गळ्यातील मौक्तमाळ
निखळूनिया विखुरली

जवळी तू येताच सख्या
कोमेजले मन रे खुलले
ऐन ग्रीष्म काळात जणू
गाली गुलमोहर फुलले..

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/ प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

घरट्यात सोडूनी पिल्ले, गेली पक्षिण दूर वनी
चारा शोधता रानोमाळ, चिंता पिल्लांची मनी…//

लुकलुकते तारेच जसे , नुकतेच उघडले डोळे
गोजिरवाणे दिसे साजरे, रूपडे कितीसे भोळे..//

कायेवरती फुटू लागली, रंगीबेरंगी पिसे न्यारी
किती घ्यावे लाडाने मुके, ती चोच इवली भारी.. //

किती नाचती बागडती, किलबिल मंजुळ स्वरे
जग न्याहाळती कौतुके, किलकिली करून दारे..//

खेळत असतील आताही, फांदीला घेत झोका
मनात दचके पक्षिण, आठवून अनामिक धोका..//

धस्स होई काळजात, वैरी साधेल का हा मोका
काळजीने फिरे माघारी, कानी पिल्लांच्या हाका..//

भर उन्हात झेपावली, जीवघेण्या टाकत धापा
धीर सुटला तिचा पाहता, दूरून उध्वस्त खोपा.. //

क्षणात कळले सारेच तिचा, घुमला टाहो वनात
आर्त किंकाळी ऐकून, सारी जमली तेथे जमात..//

पिल्लासाठी शोक अनावर, अंग टाकले धरणी
कोमेजले मन मायेचे, दैवा अशी कशी रे करणी.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

शोभता सुरेख वाडा
त्या विस्तीर्ण अंगणाचा
होता नांदत परिवार
एकोप्याने माहेराचा

होता भिंतीत ओलावा
माया, ममता स्नेहाचा
हळुवार हात फिरविता
स्पर्श होत ममत्वाचा

अंगणातील रातराणी
असे सजली साक्षीला
कित्येक गुज गोष्टी होई
मनातील सांगूनी आजीला

शहरास पाय वळले
झाला वाडा भकास
नोकरीत गुंतून गेले
नातलग तेथील खास

बघून अचानक आज
खाली वाडा बघताना
नव्हती मायेची पाखरं
स्वैर स्वच्छंद बागडताना

*कोमेजले मन* माझे
स्थिती वाड्याची बघुनी
नव्हता रेशमाचा स्पर्श
भूतकाळ तो आठवूनी

*रेखा सोनारे*
तालुका जिल्हा नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*कोमेजले मन*

पाहून देशातील भ्रष्टाचार
माजलेला दुराचार
पैशांचा हव्यास
मावळत चाललेला सदाचार
कोमेजले मन…..

पाहून लोकशाहीची विल्हेवाट
स्वार्थ साधण्या राजकारण
बरबटलेले पुढारी
असहाय जनतेचा जाच
कोमेजले मन……

पाहून बुरसटलेली समाजमने
कोत्या विचारांची लक्षणे
कसे करावे समाजप्रबोधन
कशी जिंकावी मने
कोमेजले मन……

पाहून शासनाची धोरणे
गरीबांची रोज धरणे
श्रीमंताचे श्रीमंत होणे
दुर्बलांचे ते पिचणे
कोमेजले मन……

पाहून देशाचे सैन्य
दर त्यांच्या वेतनाचे
जगणे तापमानात उणे
वाळवंटी जीवनाचे
कोमेजले मन…….

पाहून शिक्षणाचा बाजार
शिक्षकांवर इतर कामाचे थोपणे
अथ् पासून इति पर्यंत
शिकवणे सोडून गुंतवणे
कोमेजले मन…….

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

पाहताच तुला तिच्या मिठीत
सख्या कोमेजले मन
तुजसाठी केलेला शृंगार
पार गेले उतरुन

तुज ओठावरी
तिचेच नाव असे
आठव तीची येता
तू तिच्यासाठीच भासे

घरदार गेलास विसरूनी
असा कसा रे भाळलास
क्षणभर घे विसावूनी
ती नाही रे तुझी खास

बायको पोरांसाठी
तू तिच्या जाळ्यात अडकला
कर्ज घेऊ व्यवसायासाठी
पण लाथाड अशा “नोकरीला”

कोमेजल्या मनास
दे प्रेमाचा झरा
आहे माझा ठाम विश्वास
तू चमकशील बनून यशस्वी हिरा

*सौ ज्योती सुधीर कार्लेवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

विठ्ठला तुझ्या नामस्मरणाने
बहरलं कोमेजले मन
भाव भक्तीच्या प्रेमात
फुलले आनंदाचे क्षण

कसे आणि किती वर्णावे
या सावळ्या सुंदर रुपाला
मुखावरची स्मित बघूनी
भुरळ पडते या मनाला

पावसाच्या पहिल्या सरीने
गंध मातीचा दरवळतो
तुझ्या भजन कीर्तनात
मन भक्तिरंगात उसळतो

तुझे नाम घेता विठ्ठला मिळे
जिभेस खडीसाखरेची चव
कोमेजले मन तृप्त होऊन
देही पडती संजीवनीचे दव

जगजेठी माझा पांडुरंग
शरण घे या पामराला
तुझ्या भक्तीचा हा लळा
असाच फुलवीत राहो मनाला

*कुशल गो. डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

देखणे ग रूप तूझे
पाहता मन होई वेडे
सांगावे वाटे खूप तूला
पण शब्द ओठीच अडे

पुस्तकातून पाठवावा का
वाटला एखादा संदेश
वाचून रागे विचारशील
काय रे हा नवा वेश

गुलाबाचे फुल कधी
ठेवावे तूझ्या बाकावर
पाहून मुरडशील उगा
नेहमी राग तव नाकावर

भेटलीस कधी रस्त्यावर
व्हावे वाटले वाटाड्या
भाऊ तूझे चिडतील
उगाच नको काही काड्या

कसा द्यावा सांग प्रिये
प्रेम संदेश प्रीतीचे धन
अव्यक्त राहील विचारानेच
क्षणातच कोमेजले मन

*सविता धमगाये*
*नागपूर*
*जि. नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

मन माझ आनंदी मोकाट
जस भिरभिरणारे पाखरू
फिरे कसं ठाई ठाई वाटा
अनंत स्वप्ना मागे भिरभिरू

मन आकाशी स्वतंत्र उडणार
स्वतःच्या धुंदीतच जगणार
मन हिमालया परि हळवं
जराशा उबेन कधी वितळणार

मन आठवणीचा हिंदोळा झुलणार
कुणा टोकण्याला न जुमानणार
कटू गोड आठवणीना गोजारणार
मन पक्षाच्या थव्या परि उडणार

मन माऊली च विशाल न्यायलय
अक्षम्य गुन्हे सहज माफ करणार
मन शरीराचा रिमोट कंट्रोल
हवं तसंच वागवून घेणार

पण मन आज खूप उदास आहे
मनी झाली अंतरी खूप घालमेल
का कुणास ठाऊक कसा समजेल
मनी भावनांचा अती तो गोंधळ

मन यातनांनी जड ते झालेलं
तुझ्या बदलत्या त्या वागण्यानं
काळानी देखील कुरतडलेलं
उरले फक्त आता कोमेजले मन

मन भरून आले असे की
दुःख पेलता पेलत नाही
एवढं मोठ संकट येऊनही
ह्रदय उसवता उसवत नाही

उरली नाही कसली श्वासपूर्ती
कुठे मिळेना ती कुस मायेची
शेवटी आता कोमेजले मन
भेटली नाही मांडी हक्काची..

*श्रीमती वर्षा मोटे*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह…*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

मन कोमजले आता तुझ्या
आठवणीच्या काहूरांनी
परत येशील का?माझ्या
आठवणीच्या बहारांनी॥१

सोडून गेलास तू….
परत कधी न येण्यासाठी
पण हे वेडं मन….
तु येण्याची आस बघण्यासाठी॥२

एके दिवशी परत तु येशील
मिठीत तु घट्ट घेशील
तुला डोळे भरून बघायचे
मला खुप खुप रडायचे॥३

तुझी आठवण नि दुरावा
मनाला खुप छळतो
कोमेजले मन माझे
आठवणींच्या मागेच पळतो॥4

भिजलेल्या पाऊलवाटा
वाहून नेल्या लाटांनी
उरल्या नाही पाउलखुणा
उरले मात्र ठसे आठवणीचे
कोमेजले मना॥५

*रंजना ब्राम्हणकर*
*अर्जुनी/मो. जि.गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

कोमेजले मन आहे
कोमात आंतरमन
हौस मौज नाही कसली
चैतन्यावर रुसव विरजण //

लहानसे तोंड चिमले
गमामधे केविलवाणे
पहावेनासे झाले रुप
दुर्लक्षच केले सर्वाने //

मनाविरूद्ध झाल्या गोष्टी
किरकोळ त्रागा उगीच बाऊ
मानसन्मानाला डिवचले
अपमानास्पद बोले आगाऊ //

भावना नव्हे जळाऊ
हसतमुख रहा मनमिळाऊ
आनंदरहस्याला बहर यावे
शतदा जीवनगाणे गाऊ //

कमकुवत कोमेजले मन
मनस्वी आभार मानेल का ?
सोकली वाळली चाफा सुमने
दाहिदिशा सुगंधेल का ? //

*प.सु. किन्हेकर*
*वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

गुंतता हृदय उमलली प्रीतफुले
प्रितीच्या हिंदोळ्यावर मन माझे झुले

मन पाखरू होऊन भिरभिरू लागले
अंतरीतले भाव मला आता उमगले

या वेड्या मनास तुझाच ध्यास
तुला भेटण्याची लागली आस

कसा समजावू या वेड्या मनास
दिनरात विरहात जाळीतो तनास

मनात माझ्या अस्तित्व तुझे
हरवून बसलो स्वत्व माझे

तुझीच छबी सदा मनात माझ्या
कोमेजले मन माझे प्रतरणेने तुझ्या

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

अबोल माझे मन
घेते तुझाच ठाव
भेटण्यास तुला
येते तुझ्या गाव

मनाला या माझ्या
असते तुझाच ध्यास
तुझ्याच नावाने
चालते माझा श्वास

वेडे माझे मन
झुरते तुझ्याचसाठी
तरसते माझे मन
तुझ्या त्या स्पर्शासाठी

तू दिसताच क्षणी
कोमेजले मन खुलते
हातात हात घेता
मन चाफावाणी फुलते

तुझ्या त्या स्पर्शाचा
गंध चोहीकडे दळवळते
तुझ्यासवे चालतांना
कशाचीच तमा नसते

चालता चालता अचानक
हातातल्या हात निसटला
नजरेआड होताच कोमेजले मन
ये ना परतूनी कंठात प्राण आला

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

सांभाळू कशी प्रीत वेडी,
डोळ्यातून वाहत राहते
आठवण येताच तुझी बघ,
मी माझी मला हरवून बसते

निवडूंगावर फुलले फुल बघ,
चैत्र पालवीने ही मान वर केली
उठला उन्हाचा धुरळा पुन्हा,
मनाची धरणी अतृप्त राहिली

दूर दूर वाटेकडे डोळे लागले,
पुन्हा सांजवेळ कशी दाटून आली
परसदारी मोगरा फुलला एकटा,
अन तुझ्याविना जीवची लाही झाली

पुन्हा आठवणींचा पसारा मांडून,
पिले मी डोळ्यातले खारे पाणी
एकटीच समजावत बसले मनाला,
करत होते हृदयातून तुझी आळवणी

कोमेजले मन घेऊन उराशी,
रात्र चंदेरी अशीच सरून जाईल
पुन्हा एक वेडी आस घेऊन मनी,
आशाळलेली सोनेरी पहाट होईल.

*सौ.सविता वामन ठाणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*.
➿➿➿➿💛💟💛➿➿➿➿
*कोमेजले मन*

पहिली ओळख मग मैत्री
नंतर प्रेम आमुचे बहरले
गळून पडता अनोळखीपण
अंतर दोन मनातील सरले

त्याच्या न् माझ्या प्रेमाचे
ना जुळणारे दोन किनारे
अंतर वाढविण्या दोघातील
आले जातीयतेचे वादळ वारे

देहाने दूर झालोत
जरी आम्ही दोघे नन्तर
किती सोसला जीवनताप
पडले ना नात्यात अंतर

एकाने साद घालावी
दुसऱ्याच्या काळजास कळावी
शब्दाचे माध्यम नको
मनोमिलन ती घडावी

घायाळ काळीज माझे
आणि कोमेजले मन
तुझंविण वेचलं आयुष्य सारं
आठवून ते प्रेमाचे सुगंधी क्षण.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी, जि चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles