‘शुभमन गील’ने मुंबईची मैफिल लुटली!’ डॉ अनिल पावशेकर

‘शुभमन गील’ने मुंबईची मैफिल लुटली!’ डॉ अनिल पावशेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आयपीएल सिझन सोळाच्या दुसऱ्या क्वालीफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला लोळवत अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. तब्बल पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिरवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना शुभमन गिलने अक्षरशः बदडत सामना पूर्वार्धातच गुजरातकडे वळवला होता. एकहाती सत्ता मिळवणे किंवा एकहाती सामना फिरवणे काय असते हे या सामन्यातील शुभमनच्या खेळीने दिसून येते. त्याच्या शतकी दणक्याने मुंबई इंडियन्स बाजार उठला आणि उरलीसुरली कसर टायटन्सच्या गोलंदाजांनी पुर्ण करून मुंबईची फुटलेली नाव साबरमती नदीत डुंबवून टाकली.

*झाले काय तर मुंबई इंडियन्सचा संघ म्हणजे या सिझन मध्ये ओसाड गावच्या पाटीलकी सारखा होता. कलकत्ता, बंगलोर, लखनौ या संघासोबत मुंबई संघ म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी होती. मुंबई संघाने यापुर्वी आयपीएल वर जे राज्य केले त्यात पांड्या बंधू, क्लिंटन डिकॉक, कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या पाच पांडवांचे महत्वपूर्ण योगदान होते. मात्र हे पंचप्राण संघात नसल्याने मुंबईचा संघ कवचकुंडले हिरावलेल्या कर्णासारखा अगतिक होता. त्यातही प्लेऑफला शुभमनच्या कृपादृष्टीने मुंबई संघ क्वालीफायरला पोहोचला होता. मात्र याच शुभमनने त्यांना परतीचे तिकीट देत ‘दिल दिया दर्द दिया’ ची आठवण करून दिली.*

*सामन्यावर पावसाचे सावट असल्याने रोहितने नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करली. पण गुजरात संघाला धडकी बसवणारा किंवा अडचणींत आणणारा गोलंदाज खरोखरच मुंबई संघाकडे कोणता होता हा प्रश्नच होता. त्यातच मुंबई संघाचा कर्दनकाळ ठरलेल्या शुभमनला त्यांनी प्रारंभीच जीवदान दिल्याने बुडत्याचे पाय खोलात असल्याचे दिसत होते. मलालाच्या वन चाईल्ड वन टीचर वन बुक वन पेन कॅन चेंज दी वर्ल्ड प्रमाणे या सामन्यात वन झेल (गिल चा सुटलेला), वन स्पेल (मोहित शर्माचा) कॅन चेंज दी मॅच ठरला आहे.*

*अर्थातच जीवदान मिळालेल्या शुभमनने लायसन्स टू किल करत चावला ॲंड कंपनीचा चावून चोथा करून टाकला. मागेल त्याला चौकार षटकार ठोकत त्याने मुंबई संघाला पळता भुई थोडी केली. त्याने फ्लिक, पुल आणि हेलिकॉप्टर शॉटची उधळण करत धावांचे सोने लुटले. बरे झाले शोले चा गब्बर सिंग हयात नाही. अन्यथा त्याने ठाकूर ऐवजी शुभमनचे हात मागितले असते. एकीकडे शुभमनने चौकार षटकारांचा लंगर चालू केला होता तर दुसऱ्या टोकाला साई ने आपले सुदर्शन चक्र चालवत त्याला उत्तम साथ दिली होती. शुभमनने पेटवलेल्या वणव्यात हार्दिक पांड्या आणि राशिद खानने आपली पोळी भाजून घेतली. खरोखरच या डावात मुंबई गोलंदाजांची किव येत होती‌. बिच्याऱ्यांचे जो भी कदम बढे बरबादी की ओर बढे असे झाले होते.*

*अंतिम फेरीसाठी मुंबई संघाला पॉवरप्ले मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे गरजेचे होते. मात्र तिथेही नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने होती. सलामीवीर ईशान किशन जखमी होता तर रोहीतच्या बॅटने मौनव्रताचा वसा घेतला होता. याउलट टायटन्सला फायनल साठी खुल जा मो. शामी शामी वर भरवसा होता. त्यानेही सुहानी शाम मो. शामी के नाम करत दोन्ही सलामीवीरांना उडवले. या धुमश्चक्रीत कॅमरून ग्रीन आणि सूर्याने पाय रोवण्यात सुरूवात केली होती. पण हार्दिक ने ग्रीन ला जखमी केल्याने मुंबई साठी पहिला रेड सिग्नल झाला होता. मात्र त्यातही सूर्याने तिलक वर्माच्या दिमतीने घोडदौड सुरू ठेवली होती. प्रारंभीच मुंबईला हादरे देणाऱ्या मो.शामीच्या एका षटकांत तिलक वर्माने तब्बल चोवीस धावा वसूल करत मुंबईचा राजतिलक निश्चित केला होता.*

*खरेतर इथे कर्णधार पांड्या ने नेतृत्वात चतुरता दाखवली. आपला हुकमी एक्का राशिद खानला आक्रमणाला आणून त्याने तिलक वर्माची खेळी संपवली. तरीपण ग्रीन आणि सूर्याने वेगाने धावसंख्या करत सामना जीवंत ठेवला होता. पुन्हा एकदा पांड्या ने आपले जॉश नावाचे लिटिल अस्त्र बाहेर काढून ग्रीनचा त्रिफळा उडवला. ज्याप्रमाणे जॉश लिटिलने ग्रीनच्या बॅट आणि पॅड मधून चेंडू काढला, ते पाहता तो मागच्या जन्मी अचूक नेमबाज असावा असे वाटते. जॉश लिटिलने ग्रीनचा घेतलेला बळी हे टायटन्सचे विजयाच्या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल होते. एवढ्या पडझडीतही सूर्या मुंबईची वज्रमूठ बांधून होता, गरज होती त्याला कोणीतरी समर्थ साथ देत निर्भय बनो म्हणण्याची. पण इथे मुंबई संघाचे डावपेच अनाकलनीय होते.*

*त्यांच्याकडे टीम डेव्हिड सारखा दणदणीत फलंदाज असतांना विष्णू विनोदला पाठवण्याचा गंभीर विनोद त्यांनी केला. टीम डेव्हिडचे लोणचे घालुन विष्णू विनोदला मैदानात उतरवल्याने सूर्याच्या खांद्यावरचा भार वाढला‌ होता. सूर्या मैदानात धावांची कारंजी उडवतांना पाहून हार्दिकची धडधड नक्कीच वाढली होती. कारण ज्याप्रमाणे सू्र्याने मैदान झाकोळून टाकले होते ते पाहता सामना बरोबरीत वाटत होता. मात्र हार्दिकने त्याचे मायावी अस्त्र, मोहित शर्माला बाहेर काढले आणि तळपणाऱ्या सूर्याला ग्रहण लागले. मोहितने मध्यमगती गोलंदाजी करतांना स्लोअर वनचा, मंदगतीचा अफलातून प्रयोग करत मुंबई फलंदाजांना मतीमंद करून टाकले.*

*मुंबई फलंदाजीचा सूर्यास्त झाला तरी टीम डेव्हीडच्या रूपात नभात लालीमा अजूनही बाकी होती. तर तिकडे बेरक्या हार्दिकने टीम साठी राशिद खानचा सापळा रचला होता. टीमचा गेम होताच मुंबईचे उरले सुरले वर्हाड मोहितने गुंडाळून टाकले. कारण टीम डेव्हिड बाद होताच मुंबई संघ टॉक टाइम नसलेल्या परंतु व्हॅलिडीटी शाबूत असलेल्या प्लान सारखा होता. वर्हाड्यांनी जेवन केल्याशिवाय जाऊ नये, त्याप्रमाणे औपचारिकता म्हणून उर्वरित फलंदाज बॅट घेऊन फलंदाजीला आले. मात्र एकवेळ बैलाकडून दूधाची अपेक्षा करता येईल परंतु मुंबई संघाच्या शेपटाकडून विजयी पाठलागाची अपेक्षा अजिबात नव्हती. पोलार्ड, हार्दिक पांड्या चे डबल इंजिन पूर्वी मुंबईला तारून न्यायचे. मात्र आता ‘जाने कहा गये वो दिन’ होते.*

*या लढतीचे संक्षिप्त वर्णन करायचे झाल्यास टायटन्स फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मुंबई इंडियन्स पेक्षा सरस ठरले. हार्दिक पांड्याने नेतृत्वात चुणुक दाखवतांना मु़ंबईच्या प्रमुख फलंदाजाचा ॲंटीडोझ त्याने तयार ठेवला होता. मुख्य म्हणजे तो गोलंदाजांच्या बाबतीत श्रीमंत कर्णधार होता. शामीची तेजतर्रार गोलंदाजी, राशिदची भुताटकी, मोहितची मोहिनी गोलंदाजी मुंबईला भारी पडली. तर रोहितकडे आकाश मधवालचा लखनौ संघाविरूद्धचा एका स्पेलचा अपवाद वगळता दारिद्र्य रेषेखालील गोलंदाज होते. खरेतर त्याच्या भात्यातील जोफ्रा आर्चर हा बाण शोभेची वस्तू ठरला. शिवाय रोहितची एकंदरीत देहबोली आणि कर्णधार म्हणून कामगिरी अगदी साधारण होती. रखडत रखडत क्वालीफायरला पोहोचलेला मु़ंबई संघ मजबूत टायटन्ससमोर हतबल ठरला‌. एकट्या शुभमनने मुंबईची मैफिल लुटून सर्वांची वाहवा मिळवली आणि गुजरातचे टायटॅनिक दिमाखात फायनलला पोहोचले.*
**********************************
दि. २७ मे २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles