शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*ग्रामदेवता



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गावकुसावर ग्रामदेवता
वसूनी आशिश देते
साऱ्या गावाचे ही माय
सदैव रक्षण करते

रक्षणकर्ती ग्रामदेवता
साऱ्यांची तिजवर भक्ती
संकटांशी लढण्याची
देते साऱ्यांना ती शक्ती

तिला भजती श्रध्देने
पूजा अर्चन करूनी
नेम तिच्या उत्सवाचा
होई साजरा ऐक्याने

भेदभाव इथे न दिसे
विसरती वैरभाव सारे
यात्रा, जत्रा यथासांग
हर्षाला उधाण खरे

चुरशीच्या कुस्त्या होती
लोककला फड रंगती
महाप्रसादाचे आयोजन
लोकवर्गणीतून करती

ग्रामदेवतेच्या श्रध्देसाठी
ऐक्यभाव हा इथे नांदतो
भक्ती आणि परंपरेची
सदैव ग्वाही देत राहतो

रचना *वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक परीक्षक, सहप्रशासक*
सांगली जिल्हाः सांगली.
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

अशी कशी रे देवा
मोडलीस तू खोप..
काय असं आडवं
आणलेसं रे पाप….

तेहतीस कोटी देवांनो
कशी फिरवली पाठ….
चिल्या पिल्यांशी तरी
ओलवला नाही काठ…?

तू तर आख्ख्या गावाची
ग्रामदेवता आहेस ना गं..
तुलाही का नाही आली
पिलांची तिच्या दया गं..

कुण्या जल्माचं पाप
कि दिला पिल्ला शाप…
चेहरा बघण्या आधीच
कुठलं घातलसं माप…

अधुरच जीवनगाणं
सूर झाले सारे बेसूर…
काय या निरागसाचा
झाला असा कसूर…

घर,आंगण सा-यांनाच
पोरकं करून गेलीस तू..
झुंज देत देत मृत्यूशी
श्वासास विराम दिलास तू..

कशी घातली झडप
काळानं माझ्या रिंकूवर..
घरटं मोडून गेलीस
का रूसलीस आमच्यावर?
सांग का रूसलीस आमच्यावर?

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*” ग्राम देवता “*

गाव कुशीबाहेर अन् गावात
बरेच दिसतात देवांचे मंदिरे
गावाचे संरक्षण करण्यासाठी
असतात सर्वानुमते उभारले

गावात ग्रामदेवतेवर त्यांची
असते अतुट विश्वास भक्ती
करत नाही कोणी कुणाला
जबरजस्ती अन् पुजाशक्ती

दुर्गाभवानी असते कुठे तर
कुठे दिसते शंकर पार्बती ,
साईबाबा गजानन महाराज
राममंदिरासह गौरीगणपती

पंढरपूरच्या विठुमाऊलीसह
मुक्ताई नामदेव ते एकनाथी
असते ज्ञानदेव तुकोबा मंदिर
तर कुठे संत शिरोमणी मंदिर

द्रुष्टीस पडते कुठे खंडोबा ,
कुठे असतो नाग, वाघोबा
बघतो शेवटी संकटमोचन
पवनपुत्र रामभक्त हनुमान

गाव स्वच्छतेच्या पुढाकारात
भजन किर्तनातून अंधश्रद्धा
निर्मुलन जनजागृती करत..!
खरी ग्राम देवता होते राष्ट्रसंत

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

“समाजाला एकत्र बांधून
गावातील ग्रामदेवता ठेवतात ”
“प्रत्येक गावागावात एकतरी
शेंदूरफाशीत ग्रामदेवता असतात ”

“ग्रामदेवता गावात, गावाबाहेर
आपले ठाण मांडून बसतात ”
“गावातील लोक या ग्रामदेवतेची
मनापासून पूजा अर्चा करतात ”

“ग्रामदेवतेला गावांत महत्व
असून श्रद्धेचे स्थान असते ”
“दरवर्षी न चुकता ग्रामदेवतेची
यात्रा, उत्सव भरवले जाते ”

“मरीआई, यल्लमादेवी, सटवाई
अंबाबाईचे मंदिर गावांत असते ”
“गावांत रोगराई होऊ नये म्हणून
गावोगावी मंदिरे, बांधलेली असते ”

“लोकांचे रक्षण,रोगराई
मुक्त करण्याची शक्ती ग्रामदेवतेत असते ”
” गावांत हनुमान,महादेव, खंडोबा
हे ही ग्रामदैवत मानले जाते ”

*✍️श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला,* *जि :सोलापूर*
*(©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह )*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

नदीच्या पल्याड
ग्रामदेवतेचे मंदिर
वडाच्या झाडाले
लटके साजसृंगार

पिंपळाच्या बुंध्याशी
हडळीचे घर
माय माऊलीची
तिवर नजर

परसन्न तिला करण्या
गावकरी करी जागर
सुख शांती गावात
पगंतीचा भार

वाघ्या मुरळी ची
परथा अपरंपार
रात नाचून काढता
होई दैवी चमत्कार

ग्रामदेवीची असे
गावावर नजर
रोगराई न भटके
तिच्या मायेची पाखर

जागरूक आई माझी
राग लई बेकार
चूकता माकता
तिच्या पाई तक्रार

भीती साऱ्या हैवाना
पळती सुमार
बंद डोळ्यामंदीबी
आईचे हत्यार

दूर डोंगरात
तिचा ग वावर
लेकरांस लावी माया
अशी ती उदार

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

ग्रामदेवता आपली
खूप महान आहे
भक्तीभाव वाहे
गावकऱ्यांमध्ये||१||

गावकऱ्यांच्या सदैव
आहे उभी पाठीशी
बांधते गाठीशी
संकटे||२||

तुझाच धावा
आई संकटात करती
हात जोडती
भक्तीभावनेने||३||

सकल जनांना
तुझाच आधार असे
भक्ती वसे
मनामध्ये||४||

ग्रामदेवता आमची
अशी नवसाला पावते
हाकेला धावते
गावकऱ्यांच्या||५||

ग्रामदेवतेची पूजा
सारे एकत्र करूया
भक्तीभाव जपूया
हृदयामध्ये||६||

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

गडकिल्लाच्या पायथ्याशी
आई शिवाईच देऊळ बांधल
जाणता राजान शिवरायान
जगदंबेला आदी वंदिल ॥

तुळजाभवानी शक्तीशाली
ग्रामदेवता रक्षक वाली
लोक रोगराईतुन मुक्त केली
भक्तांवर मोठी कृपा झाली ॥

कुलदैवत तू मैय्या
जननी मन रमनी
दानव गणा मारीले
चौदा भुवनांची स्वामिनी ॥

मर्द मराठा वीर शिवाजी
रायरेश्वर मंदिरी शपथ घेती
तलवारीच्या धारेवर सुंदर
हिंदवी स्वराज्य निर्माण करती ॥

महाराष्ट्राची शान आहे
ग्रामदेवता समस्त दैवत
दिव्य सगुणनिर्गुण साक्षात
अगाध महिमा जागृत ॥

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

छोट्या छोट्या खेड्यांनी बनला माझा भारत देश
अनेक जाती अनेक धर्म अन अनेक इथले वेश

खेड्यामधली ही ग्राम संस्कृती अन ग्राम देवता
सगळे करिती तिची मानस पूजा

शुभकार्याच्या समयी होते तिची आराधना
आशीर्वादा साठी हात पाठीवरती जेव्हा होते प्रार्थना

अतिथींचे होते स्वागत माणुसकीचा नांदतो सुकाळ
घराघरा मध्ये पावित्र्य नांदते गर्जती मृदूंग अन टाळ

सडा रांगोळीने सजते रोजच इथले अंगण
सासुरवासिनींचे घरापुढे उभे तुळशी वृंदावन

अशी ही ग्राम देवता करिती सर्वांचे रक्षण
तिच्या शिवाय हालत नाही कुणाचे पान

*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

ग्रामदेवता वा ग्रामदेव
असे गावचे श्रद्धास्थान
हात जोडताच प्रार्थनेला
प्रयत्नांचे ते स्फूर्तीस्थान.. //

कुठे गावच्या मध्यभागी
कुठे वसे गावकुसाबाहेर
ग्रामस्थांच्या भावभक्तिचे
तेच असते मायेचे माहेर.. //

व्यथा, वेदना, दुःखाचा
जिथे होतो हलका भार
आत्म्याची परमात्म्याशी
तिथे जोडली जाते तार… //

याच्याच साक्षीने साजरी
सणवार दसरा दिवाळी
याच्याच वृंदावनात रंगते
गावाच्या एकतेची होळी.. //

सारी गुरेढोरे, लेकरे बाळे
घरदार, जल, धन दौलत
बरकत याच्याच कृपेची
आबादानी सारी मिळकत.. //

शेत शिवार पिकतय भारी
धनधान्याची खळ्यात रास
नैवेद्य रूपाने बळी अर्पितो
याच्या चरणी पहिला घास..//

आशिर्वादाचा प्रसाद हाती
राव रंक सारे सुखे नांदती
देवा चांगभलं रं चांगभलं
सुख समृद्धीचे दान मागती.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

गावाच्या सीमेवर
एक दगड मांडलेला
यथावकाश त्यालाच
शेंदूर फासलेला

वाहीली गेली
दोनचार फुले
दहीभाताचा नैवेद्य
भाग्य सारे खुले

भोळी भाबडी
आशा गावाची
करावे रक्षण
भक्ती सर्वांची

गावची भरभराट
जशी होऊ लागली
ग्रामदेवता आपली
नवसाला पावली

चढवला कुणी
झालरदार कळस
दरसाल दरवर्षी
जत्रा भरू लागली

यथावकाश गाव
नावारूपास आले
पहिला मान ग्रामदेवतेला
शिवाय तिच्या पान ना हाले

*सविता धमगाये, नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

स्वच्छता टापटीप
हीच ग्रामदेवतेची पुजा
गाव सौंदर्यीकरणाचा
मार्ग नसे दुजा

एक एक वृक्ष लावून
करू ग्रामदेवतेची सेवा
तेव्हाच चाखायला मिळेल
प्रसन्नतेचा मेवा

सुसंस्काराच्या पेरणीने
होईल ग्रामदेवता प्रसन्न
काळ्या आईच्या सेवेने
मिळेल खावयास अन्न

ग्रामदेवतेच्या कृपेने
सुख समृद्धीचा वास
गावात ठाण मांडतो
बंधुत्वाचा रहिवास

उज्ज्वल भविष्याचे
ग्रामदेवता वरदान
धनधान्याच्या भरभराटीचे
देते सदैव ती दान

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

प्रत्येक गावची असते
प्रथा परंपरा वेगवेगळी
एका गोष्टीत मात्र असते समानता
ती म्हणजे ग्रामदेवता
ग्रामदेवता म्हणजे श्रद्धास्थान
प्रत्येक कार्यात तिला प्रतिष्ठेचा मान
नवीन वाहन खरेदी असो वा लग्न
ग्रामदेवतेच्या पूजनाशिवाय सारे अपूर्ण
ग्रामदेवतेचे मंदिर बांधायला
ग्रामस्थ करतात खर्च कोटी
धनाची तमा नसते कुणाला
धनापेक्षा मनीची श्रद्धा मोठी
ग्रामदेवतेच्या नावाने
भरते गावची यात्रा
मनभावन असतो देखावा सारा
ग्रामस्थांच्या हर्षाचा
पाहायला मिळतो सोहळा
सारे स्वकीय आप्तजन होती गोळा
फेडले जातात नवस सायास
ग्रामदेवतेवर असतो भारी विश्वास
ओढावते जेव्हा दुःखाचे सावट
वा येते एखादे संकट
ग्रामदेवता एकच उपाय
ग्रामदेवतेच्या भक्तीशिवाय
जीवनात नाही तरणोपाय….
जीवनात नाही तरणोपाय…..

*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles