मेहंदी..

मेहंदीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे आणि लग्न म्हटले की, सुंदर सजलेली वधू डोळ्यासमोर उभी राहते. तिचं ते सुंदर रूप आणि नक्षीदार मेहंदी काढलेले तिचे ते हात जणू त्या देहाला लागलेले कोंदणच…!
मेहंदीच्या रंगात रंगले
चित्रात प्रियाच्या रंगले
शालू मधली ती वधू नटून थटून, हातभर हिरवा चुडा घातलेली आणि हळूच त्यामधून डोकावणारा तिचा तो मेहंदी ने सजलेला हात जणू कुण्या चित्रकाराने चित्र काढून नक्षीदार जाळी रेखाटले की काय..! त्या मेहंदीत तिच्या प्रियाचे नाव लपवून, त्याला त्या मेंहदीतील नाव शोधताना खिल्ली उडवणाऱ्या तिच्या मैत्रिणी..
सख्या बावरी मी
तुला भेटण्यास
नक्षीदार ठिपके हे
तुझ्यासाठीच खास
मेहंदीच्या येणाऱ्या सुगंधाने वातावरण सुगंधित होऊन त्यामध्ये तजेला येतो.तिच्या पहिल्या वहिल्या सणाला रेखाटलेली मेहंदी जशी मंगळागौर, हरीतालिका, रक्षाबंधन, दिवाळी अशा कितीतरी सणांना मेहंदी लावून ती मिरवत असते.
सण आला रक्षाबंधनाचा
मेहंदी काढू हातावरी
सांगू मेहंदीतून भावा
किती प्रेम तुझ्यावरी
त्या छुमछुम नाऱ्या पैंजनातील तिचे ते कोमल पावलं मेहंदीच्या रंगात अजूनच खुलून दिसतात आणि साहजिकच ती छुम छुम बावरी करून सख्याला ती उन्मादीत करून मेहंदीतील एकएक प्रेम नक्षी वेचायला भाग पाडते. कुमारी मुली सुद्धा मेहंदी साठी उत्साहित असतात जणू आमचाही राजकुमार लवकरच येईल या भावी स्वप्नामध्ये गढून गेलेल्या असतात. त्या गुलाबी स्वप्नामध्ये रमून भावी जोडीदाराच्या स्वप्नकोशात रमून जातात. मेंहदीला सौभाग्याचं प्रतीक मानल्या जातं मग हनिमूनला गेलेली ती बावरी हळूच मेहंदी रेखाटलेले हात आपल्या प्रियाच्या हातात हात देऊन त्या सांजवेळी समुद्रकिनारी चालताना त्या केशर शिंपलेल्या किरणांत न्हाऊन तृप्त होत, हा क्षण कधीच संपू नये हा विचार करीत करीत स्वतःला त्याच्या खांद्यावर विसावून देते आणि तो तिचे ते मेहंदीचे हात हातात घेवून अलगद आपले ओठ ठेवून चुंबतो.

पण मेहंदी मात्र सर्वाना हक्काचे स्थान देते.ती सर्वत्र असून तिला सुवासिनी,विधवा,कुमारी,बालिका, जात, धर्म असं काहीच नसून एक जोडणारी दुवा आहे. अशी ही अनन्य साधारण मेहंदी तिचे वेगवेगळे प्रकार सर्वत्र प्रचलित आहेत केसांना लावायची मेहंदी ही वेगळीच …! ती दाह शांत करते,शीतलता तिचा गुणधर्म आहे आणि केसांना एक मुलायम रूप देऊन तिचं सौंदर्य अजूनच खुलवते. पूर्वी मेहंदी रंगली नसल्यास मैत्रिणी म्हणायच्या तुझा नवरा तुझ्यावर प्रेमच करणार नाही. कारण यामध्ये प्रेमाचा रंगच दिसत नाही आणि मग हसायला यायचं…! परंतु हल्ली मेहंदी जरा जास्तच रंगायला लागलीय की काय ? मग ते प्रेम टिकतं किंवा नाही कोण जाणे.. आता वेगवेगळ्या कोन मध्ये मेहंदी मिळायला लागली. पूर्वी आम्हाला हिरवी मेहंदीचे पाने गोळा करून मग ते वाटून, कांडून त्यामध्ये काथ आणि काही जिन्नस टाकून त्याचा तो चोथा आम्ही हातावर ठेवून ,मूठ बांधून त्यावर एक कापड बांधलं की झालं..आपला तो हात बांधला की आई कडून मग कामाला सुट्टी मिळायची. नंतर पानांना वाळवून, त्याची बारीक पूड करून वस्त्रगाळ करून ती पाण्याने भिजवून माचीसच्या काडीने किंवा प्लॅस्टिकची पुंगळी करून हातावरती नक्षी काढायचो आणि माझी मेहंदी मी खूप छान काढली आणि रंगली सुद्धा या आनंदात किती सुख मिळायचं कारण ती मेहनतीने केलेली मेहंदी असायची ना…! अशी ही मेहंदी कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येकाच्या मनगाभाऱ्यात वसलेली आहे. छोट्या पासून ते वार्धक्यात सुद्धा तिची हौस पूर्ण करण्यास मागे नसतात कारण तिला वयही नसतंय.

रेखा सोनारे, नागपूर
कवयित्री,लेखिका
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles