
अन् पावसासाठी लाखांदुरात लागले बाहुला बाहुलीचे लग्न
लाखांदूर: मांडव सजला, बँडबाजासह वऱ्हाडी आले, लग्न घटी समीप आली आणि भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरात गावकऱ्यांची सुरु झाली लगीन घाई. हा लग्न सोहळा खास असल्याने या सोहळ्याला खास पाहुण्याला आमंत्रित करण्यात आलंय. आणि हा पाहुणा आहे वरुण राजा.
होय पावसाला आमंत्रण देण्यासाठी लाखांदूर येथे चक्क बाहुला बाहुलीच लग्न लागले.वरून राजाला पावसासाठी साकडे घालून पावसाची प्रतीक्षा संपवावी म्हणून बाहुला बाहुली चा स्वयंवर आयोजित करण्यात आला. लग्न मंडप हिरव्यागार झाडांच्या फांद्या नी सजला. सायंकाळ झाली अन् नवरदेव रुपी बाहुला लग्न मंडपात येण्यासाठी जनवशावरून निघाला,सोबत एक दोन नव्हे चक्क शंभराच्या वर वऱ्हाडी वरातीत सामील झाले.
वरातीत वऱ्हाडी बेधुंद नाचू लागले. वाजत गाजत वरात लग्न मंडपात पोहचली अन् बाहुली नटून थटून नवरीच्या रुपात मंडपात आसनस्थ झाली. चक्क पाच मंगलाष्टके झाले आणि बाहुला बाहुलीचा लग्न सोहळा पार पडला.नंतर वऱ्हाड्यांसाठी स्वादिष्ट जीवांची सोय केली होती त्यावर पाहुण्यांनी ताव मारला .
भडाऱ्यात पावसाने हजेरी जरी लावली असली तरी लाखांदूर तालुका अध्यापाही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आता लाखांदूर वासीयांनी बाहुला बाहुलीचे लग्न लावून वरून राजाला खुश करण्याचा प्रयत्न केला अन् जोरदार पाऊस पडून बळीराजा सुखावला पाहिजे अशी विनवणी केली. आता वरून राजा बरसणार की काय याकडे लक्ष लागले आहे. असे जरी असले तरी तूर्तास गोष्ट बाहुला बाहुली च्या लग्नाचीच सुरू आहे.