
मायेचं वृंदावन
आई गं आई तूच
प्रेमवर्षावाची धार
तुझ्या विणा ही दुनिया
फक्त मायेचा बाजार..
तू होतीस साधी भोळी
नाही कळला कधी व्यवहार
अडाणी, अशिक्षित तरी
तूच ममतेचा सागर..
काया तुझी थकलेली
परी माया शाल उबदार
पंखाखाली घेवून आम्हा
जगविले देत आधार
चूल आणि मूल पाहताना
चाल रीत सांभाळणार
नव्हती पाहिली दुनिया
साधेपणा नित्य जपणार
भाळी लालबुंद कुंकू
टिळा मोठा शोभणार
नऊवारी लुगडयाचा
आब राखे तो पदर..
नाही दिलेस लाडू पेढे
ना बदाम काजू मटार
चुलीवरच्या भाकरीची
याला कुठे यायची सर
उघडलेस आम्हासाठी
पण शिक्षणाचे तू द्वार
आणि क्रांतीसम जीवनाचे
स्वप्न केलेस तूच साकार
थोर याहुनी नाही गं आई
दूजा कोणताही उपकार..,
साताजन्माची पुण्याई
हीच पखरण आमच्यावर../
तू मायेचं वृंदावन
सावली तुझी थंडगार
आठवणीत रमतो आता
कोण झळा उष्ण शमविणार?
परी तुझ्यासारखा कित्ता
आम्हीही गिरविणार
पिढ्या पुढच्या यापुढे
या लेकी तुझ्या घडविणार
या लेकी तुझ्या घडविणार../
संगीता पांढरे
इंदापूर, पुणे