‘बांधिलकी’ म्हणजे कर्तव्याचे भान’; वृंदा करमरकर

‘बांधिलकी’ म्हणजे कर्तव्याचे भान’; वृंदा करमरकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेचे परीक्षण_

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी

किती अर्थपूर्ण आहे ही कविता! खरंच घर कसं असावं ते यात सांगितलं आहे. ज्या घरात प्रेम, जिव्हाळा, आपापसात मायेचा ओलावा असतो ते, खऱ्या अर्थानं घर असतं. पण आता ही संकल्पनाच कालबाह्य होत आहे की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक तर नोकरीच्या ठिकाणी घर केल्यामुळं विभक्त कुटुंब पध्दती अस्तित्वात येत आहे. त्याचप्रमाणे आपापसात न पटणे,एकमेकांवर कुरघोडी करणे यातून एकत्र कुटुंब पध्दती नष्ट होत आहे. प्रत्येक जण पैशाच्या मागं धावत आहे. मग नाती जपायला वेळ तरी कुठं आहे आणि इच्छा शक्तीचा अभाव ही आहे. सख्खी नाती दुरावत आहेत. वृध्द आईबाप आता ओझं वाटत आहेत.

बांधिलकी

आभासी दुनियेशी जोडून नाती
वृध्द आईबापांना वृध्दाश्रमी पाठवती
बांधिलकी म्हणजे काय प्रश्न पडतो?

आपण कौटुंबिक कर्तव्यं, कौटुंबिक बांधिलकी विसरत आहोत. हेच वरील त्रिवेणीतून व्यक्त होतं.आभासी दुनिया, इंटरनेट यातून “कर लो दुनिया मुठ्ठीमें” हा विचार तर पूर्णत्वास गेला. पण खरंच एकाच कटुंबातील माणसांमधील संवाद हरपला. नाती दुरावली. एकमेकांना दुखलं, खुपलं तर मदत करणं हे आपण विसरत आहोत, किंबहुना टाळत आहोत. सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक बांधिलकी प्रत्येकानं मानली पाहिजे. बांधिलकी आणि कर्तव्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

मानवाने समाज नावाची व्यवस्था निर्माण केली. त्यातूनच काही अलिखीत, लिखीत असे नियम बनले. त्या नियमाला अनुसरून एखादी व्यक्ती व्यवहार करते, ती त्याची सहज प्रवृत्ती मानली गेली. त्या नियमाला न जुमानता स्वतःच्याच हिताला प्रधान्य देऊन दुसऱ्या व्यक्तीचे अहित करून एखादी व्यक्ती व्यवहार करते, ती विकृती आणि विकृतीचं टोक गाठून अजूनही तसाच व्यवहार ती व्यक्ती करीत राहीली कि हळूहळू खाली पशुत्वाकडे पोहचते. सामाजिक भावना ज्याच्या जवळ ज्या प्रमाणात अधिक असेल, तो त्या प्रमाणात श्रेष्ठ मानला जातो. सर्व महापुरूषांच्या चरित्रांचं हेच सार आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाचं हेच गमक आहे. तो महापुरूष प्राचीन असो की अर्वाचीन, पौर्वात्य असो की पाश्चिमात्य, तो आपल्या घरापेक्षा मोठा होतो, गावात, प्रांतात, देशात, आणि परदेशातही मोठा होतो. लोकांची दुःखं दुर करतो. त्यांना सन्मार्ग दाखवितो. प्रसंगी निंदानालस्ती, मानहानी सहन करतो. बस रामदास स्वामी नी म्हटल्याप्रमाणे “चंदनाचे परि त्वां झिजावें!”. असे लोक सामाजिक बांधिलकी जपणारे असतात. बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्यासारख्या माणसांनी व्यक्तिगत सुखाचा त्याग करून समाजाशी नाळ जोडली. सामाजिक बांधिलकी जपली.

आपले सैनिक रात्रं दिवस डोळ्यांत तेल घालून आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करतात. देशवासियांप्रती, देशाप्रती असलेल्या बांधिलकीची, कर्तव्याची त्यांना सतत जाणीव असते. पण आपल्याला त्यांच्या त्यागाची जाणीव तरी असते का? सैनिकांप्रमाणे डॉक्टर, समाजसेवक, शिक्षक सेवाभावी संस्था चालवणारे संचालक हे आपापली बांधिलकी जाणून कार्य करीत असतात.

बांधिलकी

देशसेवेचे कंकण हाती
बांधिलकी यांची देशाप्रती
आम्ही निवांत घराच्या चार भिंतीत

खरंच आजच्या त्रिवेणी काव्यस्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘बांधिलकी’ हा विषय व्यापक अर्थाने विचार करायला लावणारा आहे. आपला वैचारिक दृष्टिकोन विशाल करण्यासाठी हा विषय दिला आहे. आपण बारकाईने याचा विचार करून आपापली बांधिल की जपली पाहिजे. या त्रिवेणी काव्य स्पर्धेला शिलेदारांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles