
मारवाडी फाट्याजवळ चार चाकीची समोरासमोर धडक
_एकाचे सात दात पडले;दोन जण जखमी_
तालुका प्रतिनिधी; पुसद
पुसद: तालुक्यातील मारवाडी फाटा येथे दि.२७ जून २०२३ रोजीच्या संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान चार चाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली.त्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातात एका वयोवृद्धाचे सात दात पडल्याची घटना घडली आहे.
जखमीला येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या चार चाकी वाहन चालकाविरोधात दि.२६ जून २०२३ रोजीच्या रात्री ८.१८ वाजता विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अकोला येथील जाठरपेठ येथे राहणारे गजानन गणपतराव नालट वय ६४ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंडिगो वाहन क्र.एमएच ३० पी ४९६९ च्या चालका विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खंडाळा पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन नालट हे पत्नी व मुली सोबत त्यांचे वाहन क्र.एमएच ३०,बीएस ५९९९ या चार चाकी वाहनाने माहूर गडावर देव दर्शन घेण्याकरिता गेले होते.
दर्शन घेऊन पुसद वरून अकोलाकडे खंडाळा मार्गे संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान जात होते. अशावेळी मारवाडी फाटा येथे इंडिगो वाहन क्रमांक एमएच ३०,पी.४९६९ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालून धडक मारून पसार झाला.त्या धडके गजानन यांचे समोरील सात दात पडल्याने ते गंभीर जखमी झाले.सोबतच त्यांची पत्नी व मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे.वाहनाच्या धडकेमुळे वाहनाचे तीन लाख रुपयाचे नुकसान देखील झाले आहे. प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलिसांकडून केला जात आहे.