
‘शेतकरीराजास नियतीशी जुगार खेळावा लागतो’; प्रा तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण_
उभा देह जाळणारा उन्हाचा तप्त निखारा असो किंवा जीवघेण्या पावसाच्या बरसणाऱ्या वादळी गारा असोत.. वीतभर पोटासाठी व सर्वांना अन्न देण्यासाठी झुकलेल्या खांद्यावर पुन्हा कष्टाचा नांगर पेलवतो..मागचंच पिक अतीवृष्टीत गेलेलं ..पुन्हा सावकाराचे कर्ज घेवून बियाणे घेतलं..यावेळी तर कारभारणीच्या गळ्यातलं डोरलंही गहाण ठेवलेलं.रक्ताचं पाणी होईस्तोवर कंबर कसलेली..यंदा तरी पिकणार कागदावर येणार..असे स्वप्न उराशी बाळगून,लहान लेकरागत जमिनीची मशागत पुन्हा नव्या जोमाने करतो,जपतो.पिक डोलाया लागतं.सोयाबीनच्या शेंगांनी शिवार लगडून येतं.. पण ..हाय रे..!
लहरी बाणा
पाऊस अवकाळी
डोळ्यात पाणी ..
अवकाळीने
ध्वस्त पक्व शिवार
अस्मानी वार
पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाला बळीला बळी पडावं लागतं.. अवकाळी पाऊस येतो,उभं परिपक्व पीक पाण्यात ध्वस्त होतं.तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. शेतकऱ्यांच्या डोळ्यात त्या अवकाळीच्या पाण्यागत धारा तरारतात. उभं पीक मातीमोल होतं. कर्जाचं व्याज देताना काळजाला घाव बसतात.पावसात कुजलेल्या सोयाबीन वाणाला भाव तरी कुठला असणार?आधीच अर्धपोटी असलेल्या शेतकऱ्याला पूर्णच उपासमारीची पाळी येते.सोयाबीन आधीच संवेदनशील पीक,तिफण नांगरणी खुरपणी, काकरी करून डवऱ्याच्या फेराच्या वेळी जाणोळ्याला दोरी गुंडाळून,सऱ्या पाडून घेताना या पट्टापेर पद्धतीला त्याला किती कष्ट उपसावे लागतात. सोयाबीन हे गरिबांसाठी व बळीच्या उपजीविकेसाठी मोठं स्त्रोत..
पण रोज त्याला त्यासाठी नियतीशी जुगार खेळावा लागतो. रक्त आटवून आटवून शेतात राबणाऱ्या बळीच्या घामाची किंमत त्या काळ्या मातीलाच ठाऊक!! अवकाळीचा ओला दुष्काळ असो किंवा सुका दुष्काळ बळीसाठी तो फक्त ‘काळ’च ठरतो.ढेकळं फोडताना बळीची हाडं मोडतात. ही व्यथा बघून मन विभंगून जातं..म्हणून खरंच या अस्मानी बलेला जबाबदार कोण?.. विविधता व लहरीपणा हे निसर्गाचं जरी वैशिष्ट्य असलं तरी..आजची आमची भौतिक सुखाची भूक व आधुनिकता याला जबाबदार असं मला वाटतं..वाढलेली आधुनिकता व प्रगतीशीलतेच्या नावावर आपल्याच आचरणाने निसर्गाचे संतुलन बिघडत आहे व नुकसान होत आहे.बारमाही वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडत आहेत.बेसुमार जंगलतोड झाल्यामुळे जागतिक तापमानात वाढ झालेली. कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन यामुळे प्रदूषण वाढलेले.त्याचेच दुष्परिणाम म्हणजेच बरेच अंशी अस्मानी वारास कारणीभूत..
सर्वात जास्त मरण शेतकऱ्यांचंच यात म्हणूनच उध्वस्त झालेल्या पिकांच्या शोकांतिकेपुढे व लहरीपणापुढे बळीराजा थकलाय. या काळ्या मातीच्या ध्वस्ततेचं रान काळ्या डांबरातंच माखलंय..या अवकाळीच्या फाटलेल्या आभाळरुपी आयुष्याला कष्टाच्या धाग्याने शिवू पाहणाऱ्या बळीचा कणा मात्र मोडलेला व शिवार जणू त्याच्या अश्रूंनी डबडलेलेच.. या अवकाळीची शिव कधी बांधली जाणार?या अवकाळी पावसाचं गांभीर्य,जगाच्या पोशिंद्याचं, रक्त आटवून पोटाच्या खापा झिजवत लेकरापरी वाढवलेल्या शिवाराचं, क्षणार्धात आपल्याच काही चुकांमुळे निसर्ग परिवर्तनामुळे सर्वांसाठी काळ बनू पाहणाऱ्या भयाण परिस्थितीचं वास्तव प्रस्तर रेखाटण्यासाठी कदाचित आ.राहुल सरांनी चित्र दिलेलं ..
अवकाळी व अतिवृष्टीचा अन्वयार्थ लावताना सर्वच सारस्वतांच्या लेखणीने आज पुन्हा ओल्या शिवाराची व बळीच्या भयाण विदारक संकटाची व्यथा मांडताना सर्वांची लेखणी हृदयास भिडली व पापणकाठ ओलावून गेली. सर्व प्रतिभावंतांचे हार्दिक अभिनंदन💐
सर्वच समूहातील स्पर्धांचे निकाल वाचून वेळेत फोटो पाठवण्याची विजेत्यांनी कृपया तसदी घ्यावी..आ.मुख्य प्रशासक आपल्या आनंदासाठीच कष्ट घेऊन निकाल बनवतात.
आदरणीय राहुल सर आपण मला हायकू परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल आपले हृदयस्त आभार 🙏
प्रा तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव, जि गोंदिया
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, संकलक