
गुरु महिमा
आत्मस्वरूपहा सर्व ठायी भरले
जगात दुसरे काही न उरले
असे ज्यांचे चित्र रंगले त्यासींच गुरु म्हणून कथिले !
आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. यालाच व्यासपौर्णिमा. असे म्हणतात. या दिवशी संस्कृतीचा ज्ञानकोश लिहिणाऱ्या व्यासांचे म्हणजेच संस्कृती घडविणाऱ्याचे पूजन
होते. त्यामुळेच त्यांच्या बद्दल आणि आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
|| गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||
गुरुची महती सांगायची म्हटलं तर जगातील कोणतीही उपमा दिली तरी कमीच वाटते. इतके गुरु महान असतात. सूर्याची उपमा द्यावी तर तो अस्ताला जातो. परिसाची उपमा द्यावी तर तो फक्त लोखंडाचे सोने करतो. समुद्राची उपमा द्यावी तर तो तहान भागवू शकत नाही. कल्पतरूची उपमा द्यावी तर तो फक्त इच्छिलेले फळ देतो चिंतामणीची उपमा द्यावी तर तो चिंता असणारांची चिंता घालवतो
गुरु मात्र चिंताच निर्माण होऊ देत नाही असे आहे गुरूंचे श्रेष्ठत्व आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. निदान आजच्या दिवशी कृतज्ञता तरी व्यक्त करावी. आणि म्हणावे,
गुरु हा सुखाचा सागरु
गुरु हा प्रेमाचा आगरू
असे गुरु कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रत्येकाला लाभत असतात.
निर्जीव वस्तू वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज असते, तशी
अविवेकी, दिशाहीन, पशुतुल्य बनलेल्या व्यक्तीला ध्येय, विवेक, निष्ठा व ज्ञान यांची संजीवनी देण्यासाठी गुरूंची गरज असते.
सदगुणांचा निर्माता, सद् प्रवृत्तीचा पालक दुर्गुण दुरवृत्तीचा संहारक म्हणजे गुरु.
म्हणून त्यांची पूजा म्हणजे ज्ञानाची पूजा… म्हणून प्रत्येक शिष्याने आपल्या गुरूशी असं नातं जोडावे की…
नाते गुरु शिष्याचे दृढ व्हावे असे
जसे देवघरातील समईतल्या वाती आणि ज्योतीचे
गुरुविण नाही दुजा आधार
रडता पडता कोठे अडता तोच नेत असे पार
म्हणून च आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने
आपले प्रथम गुरु आई वडील आपले सर्व गुरु आणि गुरुजन यांना शतशः वंदन…
सौ अनिता अनिल व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर