
हंपी येथे तिसऱ्या जी 20 संस्कृती कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन संपन्न
नवी दिल्ली: कर्नाटकात हंपी येथे आयोजित तिसऱ्या जी 20 संस्कृती कार्यगटाच्या (सीडब्ल्यू ) बैठकीचे उद्घाटन सत्र आज आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या उद्घाटन सत्राला संबोधित केले.
“आपण चार प्राधान्यक्रम निश्चित करण्यापासून ते कृतिशील शिफारशींवर सहमती मिळवण्यापर्यंत प्रगती केली असून धोरण निर्मितीच्या केंद्रस्थानी संस्कृती ठेवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.”, असे सहभागी प्रतिनिधींना संबोधित करताना प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
सांस्कृतिक संपदेचे संरक्षण आणि या संपदेला पूर्वस्थितीत आणणे ; शाश्वत भविष्यासाठी परंपरागत वारशाची यापुढेही जोपासना करणे ; सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन; आणि संस्कृतीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, ही या कार्यगटाची चार प्राधान्यक्षेत्र आहेत.
या चार प्राधान्यक्षेत्रांबद्दल बोलताना जोशी यांनी सांगितले की,ही प्राधान्य क्षेत्र सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेले तरीही जेथे सांस्कृतिक वारसा भूतकाळाचा आधारस्तंभ आणि भविष्याचा मार्ग आहे असे एकसंध असे जग दाखवतात.
लंबानीया प्रकारातील भरतकाम कलाकृतींचे सर्वात मोठे प्रदर्शन भरवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचे संस्कृती कार्यगटाचे उद्दिष्ट आहे. या प्रयत्नामध्ये लांबानी समुदायातील 450 हून अधिक महिला कारागिरांचा समावेश आहे, या महिला जी 20 कार्यक्रमांमध्ये त्यांच्याद्वारे बनवलेल्या सुमारे 1300 लंबानी भरतकामाच्या कलाकृती प्रदर्शित करणाऱ्या संदूर कुशल कला केंद्राशी जोडलेल्या आहेत.
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या विजय विठ्ठल मंदिर, रॉयल एन्क्लोजर आणि हंपी स्मारक समूहाच्या येदुरू बसवण्णा संकुल यांसारख्या वारसा स्थळांची सफरही जी 20 प्रतिनिधींसाठी आयोजित केली आहे.