
भाजपाचे आमदार फक्त ‘बकवास’ करतात; तेजस्वी यादव
पाटणा – बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी राज्यातील विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून त्यांनी म्हटले आहे की राज्यातील विरोधकांना विशेषत: भाजपला विकासावर बोलण्यात रस नाही. तेजस्वी यादव यांच्या विरोधात रेल्वे नोकर भरती घोटाळा प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी बिहार विधानसभेत जोरदार गदारोळ करून कामकाज रोखून धरले. त्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी ही टीका केली.
आम्ही रोज विधानसभेत अशासाठी येतो की जनतेचे प्रश्न मांडता यावेत आणि राज्याच्या विकासाची कामे व्हावीत. पण विरोधी पक्षात बसलेले लोक आमदार आहेत असे वाटत नाही. विकासावर बोलण्यात त्यांना रस नाही. ते फक्त बकवास करतात असे ते म्हणाले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत विचारले असता यादव म्हणाले, “माझ्याविरुद्ध 2017 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून काय झाले ते देव जाणतो.
बिहार मधील पूल कोसळण्याच्या घटनेच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, भाजप सत्तेत असताना पहिल्यांदा पूल कोसळला तेव्हा त्यांनी काय केले? त्यांनी एकाही अभियंत्याला कामावरून काढले नाही.