‘शिक्षणाचे तीन तेरा’; ॲप रे ॲप, डोक्याला ताप!

*ऑनलाईन कामाने त्रस्त झालेला आपलाच एक शिक्षक..* 🏴 *शिक्षणाचे तीन तेरा….*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*ॲप रे ॲप, डोक्याला ताप!*

*”करेल मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे!”* असे साने गुरुजी सांगून गेले याचा शालेय शिक्षण विभागाला कदाचित विसर पडला असल्याची शंका येऊ लागली आहे कारण जरी शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया असली तरी या शैक्षणिक रथाची दोन चाके असणारे शिक्षक व विद्यार्थी या दोन्ही चाकांच्या *”कानखिळा”* काढण्याचे काम सध्या प्रशासनाकडून होताना दिसत आहे. अनेक लिंक भरणे,ऑनलाईन कामे व ॲप वर माहिती भरणे या कामामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोर जाण्यासाठी किती वेळ मिळतो यावर खरं तर संशोधन झालं पाहिजे. शिक्षकांना जर ऑनलाईन कामांमुळे विद्यार्थ्यांसमोर जाण्यासाठी वेळच मिळत नाही तर मग तो मुलांचं मनोरंजन कसे करेल? आणि त्याचे प्रभूशी नाते जडेलच कसे ? याचे उत्तर कोणाकडेही नाही.

खरंतर माणसाने वास्तवात जगलं पाहिजे परंत परंतु शिक्षणासारख्या क्षेत्रात अनेक *ॲप* आणून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आभासी जगाच्या मायाजालात अडकवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो आहे. *”Google”* च्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचंड खजिना जगासाठी खुला झाला असला तरी *गुरुजींची* जागा *गुगल* घेऊ शकत नाही हे अनेक नामवंत शिक्षणतज्ञ सांगून सांगून थकले तरीसुद्धा शासन आणि प्रशासनाच्या डोक्यातील एलईडी पेटत नाहीत. हे शिक्षण क्षेत्रासाठी निश्चित दुर्दैवी आहे असे म्हणावे वाटते.

आज शिक्षण क्षेत्रात अ‍ॅप्सचा इतका प्रचंड शिरकाव झाला आहे की या ॲपमुळे शिक्षक आणि विद्यार्थी हैराण झाले आहेत. हे *ॲप* म्हणजे *” अध्यापन झालं थोडं अन साहेबांनी धाडलं घोडं “* खरं सांगायचं म्हटलं तर ॲप,लिंक, गुगल फॉर्म हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणारे अडथळे आहेत कारण त्यात माहिती भरण्यात शिक्षकांचा मोठा वेळ खर्ची पडतो. माझ्या माहितीनुसार सध्या प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईल मध्ये *विनोबा,व्ही स्कूल,स्वाध्याय, झूम, गुगल मीट,BLO app, whatsapp, MDM, दीक्षा, सलाम बॉम्बे, टेलीग्राम, जीपीएस कॅमेरा, सरल, विद्या समीक्षा* असे ॲप डाऊनलोड असतीलच. अजून एका ॲपची डिलिव्हरी होणे बाकी आहे त्याचं एकदा सिझेरियन झालं की *”प्रशस्त”* नावाचं *ॲप* आपल्या मोबाईल नावाच्या पाळण्यात हळूचआणून ठेवलं जाणार आणि ते कधीआणून ठेवलं हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. हेही नसे थोडके तर गावागावात जे निरक्षर आहेत त्यांना साक्षर करण्यासाठी आणखी एक ॲप जन्म घेऊ पाहतेय अशी ही कुणकुण ऐकायला येते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करायचं गुरुजींनी !

खरंतर या ॲपचं नामकरण करणाऱ्या दाईला मानलं पाहिजे. ती इतकी गोंडस नाव या ॲपसाठी कुठून शोधून काढते हे देव जाणो. *”झूम”* म्हटलं की “झूम बराबर झूम…” गाण्याच्या ओळी आठवतात. *गुगल मीट* म्हटलं की *मीट* आठवायला लागतं. *विनोबाला* सुद्धा आता *नोबा* म्हणायची वेळ आली आहे. MDM अँप ची तर तऱ्हाच न्यारी! *” जसं काम तसं दाम”* तुम्ही कितीही दिवस आहार शिजवा ॲप वर नोंदवला नाही की त्या दिवसाचं *दाम* नाही. त्यात मंथली डाटा भरा, अन्युअल डाटा भरा अन्यथा बील निघणार नाही मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल. असा सज्जड दम वजा मेसेज ज्याला तांदळातला *”त”* कळत नाही अशी व्यक्ती व्हाट्सअप वर टाकते. तांदळाची कॉलिटी तर भारीच ! तांदूळ स्वच्छ करून स्वयंपाक्याने शाळेच्या अंगणात चिमण्यांसाठी टाकलेली कणी पाहून चिमणी सुद्धा नाक मुरडते अन त्याचा हिशोब 17 ठिकाणी नोंदवा. MDM म्हणजे काय तर “माझी डबल मार ” असाच कार्यक्रम चालू आहे.BLO काम करणाराचं दुःख तर विचारूच नका. घरोघर जाऊन मतदारांची नोंदणी करताकरता दमछाक होतेय बिचाऱ्यांची. अँप व्यवस्थित चालत नाही. दिवसभरात एकदोन कुटुंबाची माहिती भरून होते.हे सगळं करायचं शाळेच्या वेळेत!

*व्हाट्सअँप* ची गंमत तर लहान मुलांच्या *डायपर* सारखी झाली आहे. अर्ध्या अर्ध्या तासाला तपासून पहावं लागतं ओलं केलं की काय? केंद्राचा ग्रुप वेगळा, तालुक्याचा ग्रुप वेगळा, जिल्ह्याचा ग्रुप वेगळाच. एका वेळेला एक सांभाळायचं सोपं हो, पण हे तीळं सांभाळायचं म्हणजे कठीणच काम. ग्रुप वर मेसेज टाकणारांनाही वेळेचं भान नसतं की आपण केव्हा मेसेज टाकतो आहोत. रात्री, अपरात्री, पहाटे केव्हाही मेसेज येतो *VVIMP अर्जंट!* ताबडतोब लिंक भरा. यात माझ्या महिला शिक्षिका भगिनींची प्रचंड कुचंबना होते हे प्रशासनाच्या कसं लक्षात येत नाही कोणास ठाऊक! अनेक महिला भगिनींचे पती इतर विभागात दुसऱ्या तालुक्यात,जिल्ह्यात नोकरी करतात त्यांना जर आपले अर्धांगिनी रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन दिसली तर तो काय विचार करेल याचा प्रशासन कधीतरी विचार करेल काय?

ते *सरल* तर फक्त नावाला सरळ आहे. बाकी सारं वाकडच आहे. असं काम करताना अनेकांनी निश्चितपणे अनुभवलं असेलच.

*V School* मधील *स्कूल* समजला पण *व्ही* म्हणजे काय?हे अजूनही समजायला तयार नाही.*स्वाध्याय* ॲप सध्या *विद्या समीक्षा ॲपशी* जोडलं आहे यातील *विद्या* कोणती?आणि *समीक्षा* कोणाची? याचाच मेळ लागेना राव! जिल्हा परिषद शाळेत आता फक्त गरिबांची मुलं शिकतात हे वास्तव नाकारता येणार नाही.*विद्या समीक्षा* ॲप करिता त्यांना *अँड्रॉइड फोनची* आवश्यकता भासणार आहे. ज्या पालकांना एक वेळचं पोट भरण्याची भ्रांत आहे तो पालक कुठून आणणार अँड्रॉइड मोबाईल? आणि त्यासाठी लागणाऱ्या नेट पॅकसाठी पैसे. याचा कोणी विचार करेल काय? स्वाध्याय उपक्रम राबवताना ज्यांना अँड्रॉइड फोन नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या याद्या प्रशासनाने लिंकवर मागवून त्यांना फोन उपलब्ध करून देण्याचं गाजर दाखवलं होतं. ते फोन कोणत्या कंपनीत बनवायला दिले हे विचारायचं धाडस शिक्षक संघटनांचे नेते करतील का?

*विद्या समीक्षा* ॲप साठी मुलांच्या हातात मोबाईल द्यावा लागेल आणि त्याचे भयंकर परिणाम या कोवळ्या जीवांवर होणार आहेत हे वैज्ञानिक सत्य कोणीही नाकारू शकत नाही. मोबाईल मुळे त्यांच्या डोळ्यांवर सुद्धा भयंकर दुष्परिणाम होणार आहेत. विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जाऊन *मोबाईल ऑडिक्ट* बनल्याशिवाय राहणार नाहीत. कोरोना काळात राबवल्या गेलेल्या ऑनलाईन क्लासेस व मोबाईलवर फावल्या वेळात गेम खेळल्यामुळे *अनेक विद्यार्थ्यांना चष्मे लागले आहेत* हे सत्य नाकारता येणार नाही. मोबाईल लहान मुलांसाठी घातक आहे हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ सांगत असून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अनेक ऑनलाईन ॲपचा मारा प्रशासनाकडून केला जातो आहे. ॲपच्या बाबतीत सांगताना ॲपच्या माध्यमातून शिक्षकांची कामे कमी केली असे सांगितले जाते. वास्तविक *विद्या समीक्षा* ॲपवर ऑनलाईन शिक्षक व विद्यार्थी हजेरी भरणे व पुन्हा शाळेत ऑफलाइन हजेरी पत्रक भरणे हे काम कमी केलं की वाढवलं याचा कोणी विचार करेल काय?
*विद्या समीक्षा ॲपमध्ये* विद्यार्थ्यांसाठी *गेम* खेळण्याची सुविधा दिली आहे. त्यातून आपण विद्यार्थ्यांना मैदानी खेळापासून दूर करून *ऑनलाइन गेम* मध्ये गुंतवून त्यांच्या *शैक्षणिक आयुष्याचा गेम* तर करत नाही ना ! याचा सुद्धा विचार या निमित्ताने होणे गरजेचे आहे.

काल परवापासून सोशल मीडियावर एक बातमी सातत्याने फिरते आहे. गेल्या नऊ महिन्यात शिक्षण विभागाने *574* परिपत्रके काढली आहेत. सदरची माहिती लिंकद्वारे किंवा अँपद्वारे भरण्यास सांगितली जाते *लिंकमुळे शासन प्रशासनाशी, प्रशासन गुरुजींची लिंक झालं पण गुरुजींची विद्यार्थ्यांशी असणारी लिंक तुटली* याला जबाबदार कोणाला धरायचं ? मोफत गणवेश योजनेचा तर विचारूच नका एकच माहिती पाच पाच वेळा भरून झाली. तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या फोन नंबरसहीत याद्या मागवल्या गेल्या. ते शीट भरता भरता मुख्याध्यापकांच्या नाकी नऊ आले. आत्ता सध्या पडलेली 25 सीटची एक्सेल माहिती तर कहरच आहे.

सर्वांचा हा त्रास निश्चितपणे वाचू शकतो. यासाठी तंत्रस्नेही बंधूंनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तुमच्या संगणकीय ज्ञानाचा आम्ही नतमस्तक होऊन आदर करतो पण तेवढ्या *लिंक तयार करणे बंद करा* म्हणजे *प्रशासनाचं नाक दाबलं जाईल आणि श्वास गुदमरला की जीवाचं महत्त्व काय आहे हे प्रशासनाला समजेल.* सध्या अशी परिस्थिती आहे की, *” तंत्रस्नेही बंधू जोमात, कार्यालयीन बाबू आनंदात “* तुम्ही बनवलेल्या लिंकमुळे त्यांना पाहिजे असलेली माहिती पाहिजे त्या फॉन्ट मध्ये विनासायास प्राप्त होते आणि ते टेबलावर मस्त बसलेले असतात. तुम्ही बनवलेल्या लिंकच्या माध्यमातून अनेक सर्व्हे केले जातात आणि जी माहिती जमा करण्यासाठी शासनाला कोट्यावधी रुपये मोजावे लागले असते. ती माहिती फुकटात संकलित होते. त्यामुळे तुमचा आणि आमचाही त्रास वाचवायचा असेल तर एक विनंती आहे तुम्ही कार्यालय स्नेही तंत्रस्नेही म्हणून मिरवण्यापेक्षा विद्यार्थी स्नेही तंत्रस्नेही म्हणून मिरवा विद्यार्थी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं योगदान विसरणार नाहीत. तुम्ही प्रशासनाच्या करीता लिंक पाठवता म्हणजे तुम्ही फार मोठे काम करत नाहीत. तुमच्या योगदानाबद्दल प्रशासनाला कसलंही घेणं देणं नाही. प्रशासन तुम्हाला फक्त युज अँड थ्रो म्हणून वापरतयं ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही गेलात तुमच्याजागी नवा पर्याय प्रशासनाकडे उपलब्ध आहे.

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात हिमालयाएवढे प्रचंड काम उभे करणारे *वारे गुरुजी* निलंबित होऊ शकतात. त्यांना सुद्धा प्रशासन वाचवू शकलं नाही. भारत देशाला *क्यूआर कोड* आधारित पाठ्यपुस्तकाची देणगी देणारे तंत्रस्नेही शिक्षक बंधू *रणजितसिंह डिसले* गुरुजी प्रशासकीय व्यवस्थेला कंटाळून राजीनामा देण्याच्या मनस्थितीत येतात. तिथं तुमची आमची काय कथा. तुम्ही केलेल्या कार्यालयीन सेवेबद्दल तुम्हाला अतिउत्कृष्ट कामाचं बक्षीस मिळेलही कदाचित पण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल तेव्हा *वा रे, गुरुजी!* म्हणून कारवाई करायला प्रशासन मागे पुढे पाहणार नाही याचं सुद्धा जरूर भान ठेवा.

नऊ महिन्यात जी *574* परिपत्रके निघाली त्या परिपत्रकांची माहिती लिंकवर भरण्यासाठी सर्व शिक्षकांचे मिळून *2 लाख 80 हजार कामाचे तास वाया गेले* असे संबंधित पत्रकार बंधूंचे मत आहे. याचा सरळ अर्थ असा की, *”समोर पोरं हजार,गुरुजी ऑनलाईन कामानं बेजार!”* त्यात आता शाळा तपासणीसाठी भरारी पथक म्हणे. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या समोर जायला आणि शिकवायला जर वेळच नाही मग कशाचं करणार मूल्यमापन भरारी पथक पाठवून? आधी शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ द्या. विद्यार्थ्यांना ज्ञानाची भरारी घेऊ द्या अन मग भरारी पथक पाठवून कोणत्या विद्येची समीक्षा करायची ती करा.असं शिक्षक संघटनांचे नेते केंव्हा ठासून सांगणार आहेत प्रशासनाला? ऑनलाइन कामांमुळे शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नाही त्यामुळे गुणवत्ता पालकांना दिसून येत नाही म्हणून पालक आपल्या पाल्यांना इतर माध्यमांच्या शाळेत पाठवतात. व त्याचा परिणाम शाळांच्या पटसंख्येवर होतोय हे जळजळीत सत्य आहे. पण गरिबांच्या लेकरांचं काय?ते जर विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले तर या देशात आपण फक्त बेरोजगारांच्या फौजा शिक्षण व्यवस्थेतून निर्माण करू हे भीषण वास्तव आहे. समज आल्यानंतर हेच विद्यार्थी पुढे म्हणतील :-

*” चंद्रयान सोडून भारताच्या शिरपेचात शास्त्रज्ञांनी रोवला मानाचा तुरा,*
*बेरोजगारांच्या भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी गुरुजी तुम्हीच आता काही तरी उपाय करा. “*

या सर्व ॲपच्या भडीमाराच्या बाबतीत असे म्हणावे वाटते की,*ॲप रे ॲप, गुरुजींच्या डोक्याला ताप आणि गरीब लेकरांच्या शिक्षणात गॅप* या गोष्टीचा सर्व शिक्षक संघटना नेते गांभीर्याने विचार करतील या अपेक्षेसह……

*आपलाच :-*

*ऑनलाईन कामाने त्रस्त होऊन मेंदू ऑफलाईन झालेला आपलाच एक सहकारी शिक्षक*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles